सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले, श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्याप्रती अपार भाव असलेले श्री. मदनप्रसाद जयस्वाल !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले, श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्याप्रती अपार भाव असलेले फोंडा (गोवा) येथील श्री. मदनप्रसाद जयस्वाल (वय ६३ वर्षे) !
श्री. मदनप्रसाद जयस्वालकाका (वय ६३ वर्षे) यांचे फोंडा (गोवा) येथे फळ आणि भाजी विकण्याचे छोटेसे दुकान आहे. काका १० वर्षांपासून सनातन संस्थेच्या संपर्कात आहेत. ते हिंदी भाषिक असूनही नियमितपणे मराठी दैनिक आणि साप्ताहिक ‘सनातन प्रभात’ वाचतात. त्यांच्याविषयी साधकांना जाणवलेली सूत्रे, काकांना आलेली अनुभूती आणि काकांच्या संदर्भात संत अन् साधक यांना आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.
१. श्री. कृष्णा आय्या, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
१ अ. आर्थिक स्थिती बेताची असूनही आश्रमातील साधकांसाठी फळे अर्पण देणे : ‘श्री. मदनप्रसाद जयस्वालकाका यांची आर्थिक परिस्थिती बेताची आहे, तरीही काका आश्रमातील साधकांसाठी फळे अर्पण देतात. फळे अर्पण दिल्यानंतर काकांना पुष्कळ आनंद होतो आणि काका ‘माझे जीवन धन्य झाले’, असे म्हणतात.
१ आ. ‘परात्पर गुरु डॉक्टर हे प्रत्यक्ष दत्तगुरुच आहेत’, असा भाव असणारे श्री. जयस्वालकाका ! : काका प्रतिदिन ‘संक्षिप्त गुरुचरित्र’ या ग्रंथातील एक अध्याय वाचतात. काकांंनी मला तो ग्रंथ दाखवला आणि म्हणाले, ‘‘श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी गुरुपौर्णिमेच्या दिवशी परात्पर गुरु डॉक्टरांची दत्तरूपात पूजा केली आणि तेव्हापासून परात्पर गुरु डॉक्टर हेच माझे दत्तगुरु झाले.’’ ‘परात्पर गुरु डॉक्टर हे प्रत्यक्ष दत्तगुरुच आहेत’, असा काकांचा भाव आहे.
१ इ. श्री. जयस्वाल यांना आलेली अनुभूती
१ इ १. श्री. जयस्वालकाका यांच्याकडून फळे घेण्याचा विचार मनात येणे आणि अन्य फळविक्रेत्याकडून घेतलेली फळे त्याला परत देऊन काकांकडून फळे घेणे : ‘४.१०.२०२२ या दिवशी मी मडगाव येथून रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात येत असतांना वाटेत एके ठिकाणी फळे विकत घेतली. मी त्या फळांचे पैसे देणार, इतक्यात माझ्या मनात विचार आला, ‘फोंडा येथील श्री. मदनप्रसाद जयस्वालकाका यांच्याकडून फळे घेऊया.’ त्यामुळे मी त्या फळविक्रेत्याकडून घेतलेली फळे त्याला परत केली आणि श्री. जयस्वालकाका यांच्याकडे जाऊन फळे घेतली.
१ इ २. ‘श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ याच कुलदेवी आहेत’, असा काकांचा भाव असल्याने त्यांनी दसर्याच्या दिवशी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदाताई यांना ओटी अर्पण करण्याची इच्छा व्यक्त करणे : काकांकडून फळे घेऊन निघतांना काका आणि माझ्यामध्ये पुढील संभाषण झाले.
श्री. जयस्वालकाका : एक विचारू का ?
मी : हो. विचारा.
श्री. जयस्वालकाका : मी गेल्या ४० वर्षांपासून नवरात्रीचे उपवास करत आहे; परंतु या वर्षी आम्हाला सुतक आल्याने मी उपवास केले नाहीत. दसर्याच्या दिवशी, म्हणजे ५.१०.२०२२ या दिवशी आमचे सुतक संपेल. मी प्रतिवर्षी दसर्याच्या दिवशी कुलदेवीच्या मंदिरात जाऊन देवीला ओटी अर्पण करतो; पण या वर्षी मला श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांना ओटी अर्पण करण्याची इच्छा आहे. त्यासाठी तुम्ही मला साहाय्य करा. आश्रमाच्या बाहेरील प्रवेशद्वारापाशीही पूजा अर्पण करण्याची माझ्या मनाची सिद्धता आहे. मी असे केल्यास चालेल का ?
मी : तुम्ही प्रतिवर्षी मंदिरात जाऊन पूजा करता. मग ‘या वर्षी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदाताईंना पूजा अर्पण करायची आहे’, असे का म्हणता ?
श्री. जयस्वालकाका : मी प्रतिदिन दैनिक ‘सनातन प्रभात’ वाचतो; म्हणून ‘श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदाताई याच माझी कुलदेवी आहेत’, असे मला वाटते. मी प्रतिदिन श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदाताई यांना प्रार्थना करतो. त्यामुळे मला दसर्याच्या दिवशी त्यांना पूजा अर्पण करण्यासाठी साहाय्य करा.
१ इ ३. काकांमधील भाव आणि तळमळ यांमुळे त्यांचे श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ अन् श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांना ओटी अर्पण करण्याचे मनोरथ पूर्ण होणे : काकांशी बोलणे झाल्यानंतर माझ्या मनात विचार आला, ‘मी काकांना काय साहाय्य करणार ?’, तरीही काकांमधील भाव आणि तळमळ पाहून ‘त्यांना साहाय्य करूया. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या इच्छेनुसार जे योग्य आहे, ते होईल’, असे मला वाटले. त्यानंतर देवाने सुचवल्याप्रमाणे मी प्रयत्न केले आणि ५.१०.२०२२ या दिवशी, म्हणजे दसर्याच्या दिवशीच श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ अन् श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांची काकांशी भेट झाली आणि काकांचे श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांना ओटी अर्पण करण्याचे मनोरथ पूर्ण झाले.
या प्रसंगातून ‘देवाने मला मडगाव येथे फळे न घेता फळे घेण्यासाठी काकांकडेच का पाठवले ?’, हे माझ्या लक्षात आले.
१ ई. काकांकडील परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवानिमित्त प्रसिद्ध केलेले ‘सनातन प्रभात’चे विशेषांक पहातांना तेथे परात्पर गुरु डॉक्टरांचे अस्तित्व जाणवणे : काकांनी मला त्यांच्याकडील परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवानिमित्त प्रसिद्ध केलेले दैनिक आणि साप्ताहिक ‘सनातन प्रभात’चे विशेषांक दाखवले. ते विशेषांक पहातांना मला ‘परात्पर गुरु डॉक्टर प्रत्यक्ष तिथे आहेत आणि ते हसत आहेत’, असे सूक्ष्मातून दिसले. त्या ठिकाणी मला प.पू. गुरुदेवांचे अस्तित्व जाणवले.’
२. श्री. नीलेश वानखडे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
२ अ. भाव
१. ‘श्री. जयस्वालकाका रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात आले होते. त्या वेळी आश्रम दाखवत असतांना मी त्यांना आश्रमाविषयीची माहिती सांगत होतो. त्या वेळी काका प्रत्येक सूत्र नम्रतेने आणि भावपूर्णरित्या ऐकत होते. ‘आश्रम म्हणजे वैकुंठ आहे’, असा काकांचा भाव आहे.
२. काका हिंदी भाषिक आहेत, तरीही ते मराठी भाषेतील दैनिक ‘सनातन प्रभात’ नियमितपणे वाचतात. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी याविषयी काकांना विचारल्यावर ते म्हणाले, ‘‘परात्पर गुरु डॉक्टरांच्या आणि तुमच्या कृपाशीर्वादामुळेच मला मराठी वाचता येतेे.’’
३. काकांनी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांना ओटी अर्पण केली. तेव्हा ‘त्या दोघींच्या रूपात साक्षात् कुलदेवतेचे दर्शन झाले’, असा त्यांचा भाव होता.
२ आ. काकांच्या संदर्भात आलेल्या अनुभूती
१. काकांनी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांना ओटी अर्पण केली. तेव्हा त्या दोघींनाही कुंकवाचा सुगंध आला.
२. हे पहात असतांना माझी भावजागृती होत होती.’
३. श्री. महेश चव्हाण, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
अ. ‘रामनाथी आश्रमातील महाप्रसाद ग्रहण करण्याची आणि आश्रमात चालू असलेला देवी याग पहाण्याची संधी मिळाल्याने काकांंना पुष्कळ कृतज्ञता वाटत होती’, असे मला जाणवले.’
(लेखातील सर्व सूत्रांचा दिनांक : ९.१०.२०२२)
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या आणि संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक
सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे सूक्ष्म. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या सूक्ष्म संवेदना जाणवतात. या सूक्ष्माच्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत. |