सर्व प्रशासकीय यंत्रणांनी उत्तम समन्वय राखत ‘जी २०’ परिषदेचे आयोजन यशस्वी करावे ! – चंद्रकांत पाटील, पालकमंत्री
पुणे – ‘जी २०’ परिषदेच्या निमित्ताने पुणे, महाराष्ट्र आणि देश यांची क्षमता दाखवण्याची संधी मिळाली आहे. प्रशासकीय यंत्रणांनी समन्वय राखत परिषदेचे आयोजन यशस्वी करावे, असे निर्देश पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले. परिषदेच्या सिद्धतेच्या संदर्भात त्यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठकीचे आयोजन केले होते. या वेळी विभागीय आयुक्त सौरभ राव, महापालिका आयुक्त विक्रमकुमार, पोलीस आयुक्त रितेश कुमार, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, अतिरिक्त महापालिका आयुक्त डॉ. कुणाल खेमनार, विकास ढाकणे उपस्थित होते. ‘परिषदेला ३७ देशांतील १५० हून अधिक प्रतिनिधी येणार असल्याने सुरक्षाविषयक, तसेच शिष्टाचारासंबंधी सर्व काळजी घ्यावी. पुणे आणि महाराष्ट्राची औद्योगिक क्षमता, गुंतवणुकीची क्षमता संपूर्ण कौशल्याने प्रदर्शित करावी’, असेही पाटील यांनी सांगितले.