राज्यातील ६६६ ‘सी.बी.एस्.ई.’ शाळांच्या प्रमाणपत्रांची पडताळणी !
बनावट प्रमाणपत्रे टाळण्याच्या प्रयत्नांसाठी शिक्षण आयुक्तांची माहिती
पुणे – शहरातील केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सी.बी.एस्.ई.) शाळांना बनावट ‘ना हरकत प्रमाणपत्र’ देण्याची घटना नुकतीच समोर आली आहे. त्या अनुषंगाने ‘युडायस’ प्रणालीमध्ये भरलेली माहिती न जुळणार्या राज्यातील ६६६ शाळांची (सी.बी.एस्.ई.) पडताळणी करण्यात येणार असल्याची माहिती शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी दिली. मंत्रालयातील उच्चपदस्थ अधिकार्यांची नावे आणि बनावट स्वाक्षर्या करून शाळांना बनावट ‘ना हरकत प्रमाणपत्र’ देणारी टोळी कार्यरत असल्याचे आणि त्यासाठी लाखो रुपयांचे व्यवहार झाल्याची प्राथमिक माहिती पुणे जिल्हा परिषदेच्या अधिकार्यांनी केलेल्या चौकशीतून निष्पन्न होत आहे.
शिक्षण आयुक्त सूरज मांढरे म्हणाले की, बनावट प्रमाणपत्र प्रकरणी पोलिसांकडे तक्रार प्रविष्ट करण्यात आली आहे. राज्यातील ६६६ शाळांची माहिती जुळत नसल्याने संबंधित शाळांच्या मान्यतेच्या संदर्भातील कागदपत्रे पडताळण्याचे आदेश शिक्षणाधिकार्यांना देण्यात आले आहेत. त्यांचा अहवाल सादर झाल्यानंतर पुढील कार्यवाही केली जाईल. तसेच प्रत्येक शाळेने शाळा मान्यतेचा क्रमांक दर्शनी फलकावर स्पष्टपणे नमूद करावा आणि त्याचे प्रमाणपत्र पालकांना दिसेल अशा पद्धतीने लावणे आवश्यक आहे.