भाजपचे माजी नगरसेवक प्रकाश गंगाधरे आणि ‘ईगल ब्रिगेड फाऊंडेशन’ या संस्थेचे संस्थापक विश्वनाथ बिवलकर यांची देवद (पनवेल) येथील सनातन आश्रमाला भेट !
देवद (पनवेल), ११ जानेवारी (वार्ता.) – येथील सनातन संस्थेच्या आश्रमाला मुलुंड (पू.) येथील भाजपचे माजी नगरसेवक श्री. प्रकाश गंगाधरे यांनी, तसेच कला, क्रीडा आणि मुलाखत यांसाठी मुलांना मार्गदर्शन करणार्या ‘ईगल ब्रिगेड फाऊंडेशन’ या संस्थेचे संस्थापक अन् कोलशेत (ठाणे) येथील श्री. विश्वनाथ बिवलकर यांनी ९ जानेवारी या दिवशी भेट दिली. एका सोहळ्याच्या निमित्ताने ते आश्रमात आले होते. या वेळी आश्रमात चालणार्या सर्व सेवांविषयी त्यांनी जाणून घेतले. श्री. प्रकाश गंगाधरे आणि श्री. विश्वनाथ बिवलकर यांनी ‘आश्रम पाहून चांगले वाटले’, असे या वेळी सांगितले.
श्री. प्रकाश गंगाधरे हे सनातनच्या विविध उपक्रमांमध्ये साहाय्य करतात. सनातनचे ग्रंथ समाजापर्यंत पोचवण्यातही त्यांचा पुढाकार असतो. सनातनच्या विविध कार्यक्रमांनाही ते उपस्थित असतात. त्या कार्यक्रमांसाठी सभागृह विनामूल्य उपलब्ध करून देण्यातही त्यांचे सहकार्य लाभते. अर्पण आणि विज्ञापन देणे या माध्यमांतूनही त्यांचे साहाय्य लाभते. श्री. विश्वनाथ बिवलकर हे पोलिसांसाठी ध्यानधारणा, शासकीय आणि अशासकीय कर्मचार्यांसाठी ‘प्राणिक हिलिंग’नुसार उपचारही करतात.