त्वचेच्या बुरशी संसर्गाचे (‘फंगल इन्फेशन’चे) दुर्लक्षित कारण जाणून त्याच्या दुष्टचक्रातून बाहेर पडा !
‘एकदा बुरशी संसर्ग झाला की, रुग्णाच्या त्वचेचे आरोग्य बिघडते. यासाठी रुग्णाला बरीच बुरशी संसर्ग प्रतिरोधक (अँटी फंगल) औषधे पोटात घेण्यास, तसेच त्वचेवर लावण्यास दिली जातात. तसेच त्याला त्याचे कपडे डेटॉल अथवा गरम पाणी यांचा वापर करून धुण्यास आणि उन्हात वाळत घालण्यास सांगितले जाते. असे सगळे केले, तरी या दुष्टचक्रात अडकलेल्या रुग्णाची यातून सहजासहजी सुटका होत नाही.
या सर्वांत एक महत्त्वपूर्ण कृती दुर्लक्षित रहाते किंवा विसरली जाते आणि ती अनेकदा बुरशी संसर्ग नियंत्रणात न येण्याचे कारण ठरते. ती म्हणजे प्रतिदिन स्नानानंतर वापरलेले अंगपुसणे (टॉवेल) न धुणे.
बर्याच वेळा वापरलेले कपडे डेटॉल इत्यादींनी धुतले जातात; परंतु अंगपुसणे धुण्याचे लक्षात येत नाही. त्यामुळे प्रतिदिन अंगपुसणे गरम पाण्याने आठवणीने धुऊन उन्हात वाळवावे आणि दुसर्या दिवशी स्नानानंतर ते स्वच्छ अन् कोरडे अंगपुसणे वापरावे; कारण कितीही महागाचे साबण किंवा मलम त्वचेसाठी वापरले, तरी अस्वच्छ म्हणजे वापर केल्यावर न धुतलेले (इन्फेक्टेड) अंगपुसणे स्नानानंतर तसेच वापरल्याने त्या अंगपुसण्यामध्ये असलेला बुरशी संसर्ग परत रुग्णाच्या शरिराला होतो. यातून त्या रोगाचे दुष्टचक्र चालू रहाते. अशा प्रकारे बुरशी संसर्ग पुनःपुन्हा होणे टाळण्यासाठी या कारणावर असल्यास त्यावर उपाय केल्यास रुग्णाला लाभ होतो.
पावसाळ्यामध्ये अंगपुसणे वाळण्यास अधिक कालावधी लागतो; म्हणून त्या काळात २ – ३ अंगपुसणे समवेत ठेवावेत; मात्र प्रतिदिन अंगपुसणे गरम पाण्याने आठवणीने धुऊन वाळवून मगच वापरावे. असे केल्यास त्वचेच्या बुरशी संसर्गाचे एक दुर्लक्षित कारण टळून रोगाच्या दुष्टचक्रातून बाहेर पडता येईल.’
– वैद्य समीर मुकुंद परांजपे, खेर्डी, दापोली, रत्नागिरी. (१०.१२.२०२२)