मुलावर लहानपणापासून साधनेचे संस्कार करणारे सांगोला (जिल्हा सोलापूर) येथील श्री. संतोष पाटणे आणि सौ. शुभांगी पाटणे !
मुलावर लहानपणापासून साधनेचे संस्कार करणारे आणि त्याला पूर्णवेळ साधना करण्यासाठी पाठिंबा देणारे सांगोला (जिल्हा सोलापूर) येथील श्री. संतोष पाटणे (वय ४७ वर्षे) आणि सौ. शुभांगी पाटणे (वय ४४ वर्षे) !
पौष कृष्ण पंचमी (१२.१.२०२३) या दिवशी सौ. शुभांगी पाटणे यांचा ४४ वा वाढदिवस आहे. त्यांचा मुलगा श्री. दीप पाटणे रामनाथी आश्रमात राहून पूर्णवेळ साधना करतो. त्याला आई (सौ. शुभांगी पाटणे) आणि वडील (श्री संतोष पाटणे) यांची लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.
सौ. शुभांगी पाटणे यांना ४४ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा !
१. मुलाला नामजपाचे महत्त्व प्रेमाने सांगून त्याच्याकडून नामजप करून घेणे
‘मी लहानपणापासून साधना करावी’, असे आई-बाबांना नेहमी वाटत असे. ते माझ्याकडून प्रतिदिन किमान १ घंटा नामजप करून घेत असत. मी बर्याच वेळा नामजप करण्याचा कंटाळा करत असे. त्या वेळी ते मला नामजपाचे महत्त्व प्रेमाने समजावून सांगून माझ्याकडून नामजप करून घेत असत. मी नामजप करण्यास टाळाटाळ केली, तर मला ते नामजप लिहायला सांगत असत. माझा नामजप लिहून झाल्यावर ते मी लिहिलेला नामजप तपासत असत.
२. मुलगा रुग्णाईत असतांना त्याच्या प्रकृती स्वास्थ्यासाठी त्याच्या वडिलांनी मध्यरात्री प.पू. भक्तराज महाराज यांच्या छायाचित्राला प्रदक्षिणा घालणे
मी तिसर्या इयत्तेत शिकत असतांना माझे आंत्रपुच्छाचे (‘अपेन्डीक्स’चे) शस्त्रकर्म झाले. त्या वेळी मी प्रथम पंढरपूर आणि नंतर मिरज येथे रुग्णालयात भरती होतो. त्या वेळी मध्यरात्री मला वेदना होत असतांना ‘माझा त्रास न्यून व्हावा’, यासाठी माझे बाबा प.पू. भक्तराज बाबांच्या (प.पू. भक्तराज महाराज यांच्या) छायाचित्राला प्रार्थना करून प्रदक्षिणा घालत असत.
३. मुलाच्या साधनेला प्राधान्य देणे
आई-बाबा प्रचारसेवेसाठी दिवसभर बाहेरगावी जात असत. ते घरी आल्यावर मला ‘आज नामजप किती केलास ? कोणत्या सेवा केल्यास ?’, असे विचारत असत.
४. मुलाला घरातील प्रत्येक काम सेवा म्हणून करण्यास शिकवून त्यात स्वावलंबी बनवणे
आई-बाबांनी मला घरातील सर्व लहान मोठी कामे सेवा म्हणून करण्याची सवय लावली, उदा. केर काढणे, लादी पुसणे, भांडी घासणे, स्वयंपाकघर आणि ओटा आवरणे, स्नानगृह अन् प्रसाधनगृह यांची स्वच्छता करणे इत्यादी. त्यामुळे मला बाहेर ही कामे करतांना जड जात नसे. ‘बाबा अशी सर्व कामे करतात’, हे पाहून आमच्या बर्याच नातेवाइकांना आश्चर्य वाटायचे. आई प्रचारसेवेसाठी बाहेरगावी जातांना माझ्या जेवणाचे व्यवस्थित नियोजन करून जात होती.
५. मुलाला राष्ट्र आणि धर्म यांवर होत असलेल्या आघातांविषयी सांगून साधनेचे महत्त्व मनावर बिंबवणे
बाबा मला ‘राष्ट्र आणि धर्म यांवर होत असलेल्या आघातांविषयी सांगून ‘साधना करणे का महत्त्वाचे आहे ?’, हे माझ्या मनावर बिंबवण्याचा प्रयत्न करत असत.‘मला साधनेची गोडी लागावी’, यासाठी त्यांनी मला मिरज आश्रमात ठेवण्याचा निर्णय घेतला. त्या वेळी माझा पुष्कळ संघर्ष झाला. बाबाही ‘मी दूर जाणार, म्हणून पुष्कळ दुःख होऊन रडले; पण ‘मी आश्रमात राहिल्याने माझे चांगलेच होणार आहे’, हाच विचार त्यांनी डोळ्यांसमोर ठेवला.
६. आई-बाबा शहरातील नामांकित शिकवणीवर्ग घेत असूनही प्रचारसेवेत विविध सेवा करणे
आई-बाबा शिकवणीवर्ग घेत होते. ते वर्गातील विद्यार्थ्यांना अधूनमधून साधनेविषयी सांगत असत. आई-बाबा घेत असलेला शिकवणीवर्ग सांगोला तालुक्यातील नामांकित शिकवणीवर्ग होता. आई-बाबा अर्पण मिळवणे, सात्त्विक उत्पादने वितरण करणे, जिज्ञासूंना संपर्क करून सत्संगात जोडणे आदी सेवा आनंदाने करत असत. ज्या विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती हालाखीची आहे, अशा बर्याच जणांना आई-बाबांनी विनामूल्य शिकवले.
७. मुलाची साधना व्हावी, याची तळमळ
मला दूरचित्रवाणीवरील कार्यक्रम पहाण्याची पुष्कळ आवड होती. ते कार्यक्रम पहाण्यात माझा पुष्कळ वेळ जात असे. मला लागलेली अयोग्य सवय पाहून मी ९ व्या इयत्तेत शिकत असतांना बाबांनी दूरदर्शनसंचाची जोडणीच (‘कनेक्शन’) काढून टाकली. ‘माझी संगत चांगली आहे ना ?’, याकडेही आई- बाबांचे पुष्कळ लक्ष असायचे. एकदा मला परीक्षेत अल्प गुण मिळाले. तेव्हा ते मला म्हणाले, ‘‘तुला अल्प गुण मिळाले, तरी काही हरकत नाही; पण तू साधना आणि सेवा कर. ते आमच्यासाठी पुष्कळ आहे.’’ त्या दोघांचा नेहमीच माझी साधना होण्याकडे कल असायचा. ‘मी उच्च शिक्षण घ्यावे, नोकरी करावी किंवा आणखी काही करावे’, असे आई-बाबांना कधीच वाटले नाही.
८. सनातन संस्थेचे साधक या नात्याने बाबांनी शाळेच्या संस्थापकांचा विश्वास संपादन करणे
बाबा एका शाळेत शिकवण्यासाठी जाऊ लागले. त्या वेळी ‘ते सनातनचे साधक आहेत. त्यामुळे चांगलेच काम करणार’, असा त्या शाळेच्या संस्थापकांना विश्वास होता. त्यांनी बाबांना अवघ्या २ – ३ मासांत मुख्याध्यापक बनवण्याचा निर्णय घेतला.
९. बाबा शाळेचे मुख्याध्यापक असूनही त्यांनी विद्यार्थ्यांची पादत्राणे व्यवस्थित ठेवणे
एकदा बाबा एका ठिकाणाहून शाळेत जात असतांना त्या ठिकाणी मुलांनी पादत्राणे अस्ताव्यस्त ठेवली होती. त्या वेळी बाबांनी ती पादत्राणे व्यवस्थित ठेवली. तेव्हा बाबांनी ‘मी या शाळेचा मुख्याध्यापक आहे. मी पादत्राणे कशी व्यवस्थित ठेवू ?’, असा विचार केला नाही.
१०. मुलगा पूर्णवेळ साधना करणार असल्याचे समाधान असणे
आम्ही तिघांनी पूर्णवेळ साधना करण्याचा निर्णय घेतला. आम्ही रामनाथी आश्रमात साधना करण्यासाठी आलो. कौटुंबिक अडचणीमुळे आई-बाबांना घरी परत जावे लागले. ‘मी आश्रमात राहून पूर्णवेळ साधनारत आहे’, याचे त्यांना समाधान आहे.
११. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी आई-बाबांचे कौतुक करणे
एका सत्संगात आईने तिचे प्रयत्न आणि स्थिती यांविषयी परात्पर गुरुदेवांना सांगितले. त्या वेळी गुरुदेव तिला म्हणाले, ‘‘तुम्ही असेच प्रयत्न चालू ठेवले, तर तुम्ही लवकरच प्रगती कराल.’’ नंतर गुरुदेव मला म्हणाले, ‘‘तू भाग्यवान आहेस. तुला असे आई-बाबा लाभले.’’
‘हे गुरुमाऊली, हीच जाणीव माझ्या मनात खोलवर रुजू दे आणि याच जाणिवेतून माझ्याकडून साधनेचे प्रयत्न होऊ देत’, हीच तुझ्या कोमल चरणी याचकभावाने प्रार्थना करतो. आपल्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’
– श्री. दीप संतोष पाटणे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२८.९.२०२२)