धुळे जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालये येथील देवतांच्या प्रतिमा काढण्याविषयीचा आदेश शिक्षणाधिकार्यांकडून रहित !
भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष रोहित चांदोडे यांनी आंदोलनाची चेतावणी दिल्याचा परिणाम !
धुळे, ११ जानेवारी (वार्ता.) – धुळे जिल्ह्यातील शाळा आणि महाविद्यालये येथील देवतांच्या सर्व प्रतिमा काढून तेथे राष्ट्रपुरुषांच्या प्रतिमा लावाव्यात, असा आदेश येथील जिल्हा परिषदेतील माध्यमिक शिक्षणाधिकारी एम्.एस्. देसले यांनी जिल्ह्यातील सर्व मुख्याध्यापकांना ६ जानेवारी या दिवशी पत्र पाठवून दिला होता; मात्र याला येथील भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अधिवक्ता रोहित चांदोडे यांनी तीव्र आक्षेप घेतला. हा आदेश रहित न केल्यास आंदोलन करण्याची चेतावणी श्री. चांदोडे यांनी दिली. त्यानंतर शिक्षणाधिकार्यांनी हा आदेश त्याच दिवशी रहित करून तसे पत्र सर्व मुख्याध्यापकांना पाठवले आहे. (माध्यमिक शिक्षणाधिकार्यांच्या धर्मद्रोही निर्णयावर आक्षेप घेत हा आदेश रहित करण्यासाठी लढा देणारे भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अधिवक्ता रोहित चांदोडे यांचे अभिनंदन ! यातून बोध घेऊन समाजात हिंदु धर्म आणि देवता यांच्या विरोधात अशा घटना घडत असतील, तर त्याला हिंदूंनी असाच विरोध केला पाहिजे ! – संपादक)
हिंदु देवतांच्या प्रतिमा काढण्यासाठी महात्मा फुले समता परिषदेचे शिक्षण उपसंचालकांना पत्र !
शाळा आणि महाविद्यालये येथे हिंदु देवतांच्या प्रतिमा काढून ज्योतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील, छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज आणि सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा लावाव्यात, अशी मागणी येथील अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे अध्यक्ष पवन कोराटे यांनी नाशिक येथील शिक्षण उपसंचालकांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली होती. या अनुषंगाने धुळे जिल्ह्यातील शाळा आणि महाविद्यालये येथील देवतांची छायाचित्रे (उदा. सरस्वतीदेवी आणि शारदादेवी) काढून राष्ट्रपुरुषांची छायाचित्रे लावावीत, असे पत्र माध्यमिक शिक्षणाधिकारी एम्.एस्. देसले यांनी ६ जानेवारी या दिवशी जिल्ह्यातील सर्व मुख्याध्यापकांना पाठवले होते. या पत्रावर देसले यांची स्वाक्षरीही आहे.
उर्दू आणि कॉन्व्हेंट शाळांतील प्रार्थना अन् बुरखा पद्धतीवरही बंदी घालावी !
शिक्षणाधिकार्यांच्या या पत्रामुळे हिंदूंमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या. काही शिक्षक आणि विद्यार्थी यांनी अधिवक्ता रोहित चांदोडे यांच्याकडे याविषयी तक्रारी करून आक्षेप नोंदवला. त्या तक्रारी आणि पत्र यांची नोंद घेत अधिवक्ता चांदोडे यांनी शिक्षणाधिकार्यांची भेट घेऊन त्यांनाही एक पत्र दिले. या पत्रात त्यांनी म्हटले की, सर्व उर्दू आणि कॉन्व्हेंट शाळांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज, वीर सावरकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रतिमा लावण्याची विनंती आणि सक्ती करावी, तसेच शाळांमध्ये धार्मिक चिन्हांवर, उदा. क्रॉस, धार्मिक प्रतिमा आणि प्रार्थना यांवरही बंदी घालावी. विविध शाळांमध्ये बुरखा आणि हिजाबसारख्या धार्मिक वेशभूषेवरही त्वरित बंदी आणावी. तसा आदेश काढावा, अन्यथा समस्त हिंदु समाज शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर ९ जानेवारीपासून आंदोलनास प्रारंभ करेल, अशी चेतावणी दिली.
अधिवक्ता चांदोडे यांच्या मागणीचा धसका घेत शिक्षणाधिकारी देसले यांनी हे पत्र आणि आदेश त्याच रात्री तडकाफडकी रहित केले. तशा आशयाचा आदेश सर्व शाळा आणि महाविद्यालये यांना दिला. अधिवक्ता रोहित चांदोडे यांनी घेतलेल्या भूमिकेचे राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक वर्तुळातून कौतुक होत आहे.
दैनिक ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीशी बोलतांना अधिवक्ता रोहित चांदोडे म्हणाले, ‘‘शाळा आणि महाविद्यालये येथे हिंदु देवतांची प्रतिमा लावण्याची पूर्वीपासूनची परंपरा आहे. विद्येची देवता म्हणून शाळेत सरस्वतीदेवीची प्रतिमा लावली जाते. त्यामुळे याला विरोध करण्याचे काहीच कारण नाही. उर्दू आणि कॉन्व्हेंट शाळांमधील प्रतिमा काढून तेथील प्रार्थना बंद करण्याविषयीही, तसेच राष्ट्रपुरुषांची प्रतिमा लावण्याविषयी सक्ती करावी, अशी मागणी केली. त्या वेळी माध्यमिक शिक्षणाधिकारी एम्.एस्. देसले यांनी स्वतःची चूक मान्य करून क्षमा मागितली, तसेच सर्व शाळा आणि महाविद्यालये यांना पत्र पाठवून आदेश रहित केला.’’ |
संपादकीय भूमिका
|