१ सहस्र वर्षांपासून युद्ध लढणारे हिंदू आक्रमक होणे नैसर्गिक ! – सरसंघचालक
नवी देहली – विदेशी आक्रमणे, विदेशी प्रभाव आणि विदेशी कट यांविरोधात गेल्या १ सहस्र वर्षांपासून हिंदु समाज युद्ध लढतो आहे. त्यामुळे हिंदु समाज जागा झाला. युद्ध लढणारे आक्रमक होणे, हे नैसर्गिक आहे. आता हिंदु धर्म, हिंदु संस्कृती आणि हिंदु समाज यांच्या विरोधातील हे युद्ध बाहेरच्यांशी नाही, तर आपल्यातच असलेल्या शत्रूंच्या विरोधात आहे. आता परकीय आक्रमक नसले, तरी त्यांचा प्रभाव आणि कारस्थाने आहेत. हे युद्ध असल्यामुळे थोडा अतीउत्साह असला, तरी आक्रमक भाषा वापरणे योग्य नाही, असे प्रतिपादन प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी ‘द ऑर्गनायझर’ आणि ‘पांचजन्य’ या नियतकालिकांना दिलेल्या मुलाखतीत केले.
‘जाग रहा हिन्दू समाज, मुस्लिमों को छोड़ना होगा शासक वाला भाव’: RSS प्रमुख भागवत ने कहा- LGBTQ की निजता का हो सम्मान#RSS #MohanBhagwathttps://t.co/tNgah4ERkc
— ऑपइंडिया (@OpIndia_in) January 11, 2023
सरसंघचालक म्हणाले की, हिंदु आक्रमक नसलेला एकमेव समाज आहे. त्यामुळे आक्रमक नसणे,अहिंसा, लोकशाही आणि धर्मनिरपेक्षता या गोष्टी जतन करण्याची आवश्यकता आहे. भारत पूर्वी अखंड होता; पण इस्लामी आक्रमण आणि इंग्रज यांमुळे या देशाची फाळणी झाली. आपल्याला पुष्कळ भोगावे लागले. हे सर्व आपण हिंदु भावना विसरल्यामुळे घडले.
मुसलमानांनी आपणच सर्वोत्तम असल्याची हेकेखोर धारणा सोडावी !
सरसंघचालक पुढे म्हणाले की, भारतात रहाणार्या मुसलमानांना कोणताही धोका नाही. त्यांना त्यांच्या रूढी पाळायच्या असतील, तर ते त्या पाळू शकतात. त्यांना त्यांच्या पूर्वजांच्या रूढी पुन्हा स्वीकारायच्या असतील, तर ते त्याही स्वीकारू शकतात. हा पूर्णत: त्यांचा निर्णय आहे. हिंदु समाज एवढा ताठर नाही; मात्र त्याच वेळी मुसलमानांनी आपणच सर्वोत्तम असल्याची हेकेखोर धारणा सोडली पाहिजे. ‘आपण उच्च कुळातील आहोत, आपण पूर्वी या देशावर राज्य केले आहे आणि पुन्हा करू शकतो, केवळ आपला मार्ग योग्य आहे, इतर चुकीचे आहेत, आपण वेगळे आहोत आणि त्यामुळे आपण इतरांसमवेत राहू शकत नाही’ हे ग्रह त्यांनी (मुसलमानांनी) बाजूला ठेवले पाहिजेत. तसा विचार करणारा एखादी हिंदु व्यक्ती असेल, तर तिलाही हे सोडावे लागेल. कम्युनिस्ट असेल, तर त्यालाही ही गोष्ट सोडावी लागेल.
हिंदूंच्या उत्थानात सर्वांचे उत्थान
लोकसंख्येच्या धोरणाविषयीच्या एका प्रश्नाला उत्तर देतांना सरसंघचालक म्हणाले की, सर्वप्रथम हिंदूंनी आपण बहुसंख्य आहोत आणि आपल्या उत्थानानेच या देशातील सर्वजण सुखी होतील, हे समजून घेतले पाहिजे. लोकसंख्या एक ओझेही आहे आणि उपयोगी गोष्टही आहे. या प्रकरणी एक दूरगामी आणि सखोल विचाराअंती एक धोरण बनले पाहिजे. हे धोरण सर्वांसाठी समानपणे लागू झाले पाहिजे. यासाठी कोणतीही बळजोरी होता कामा नये. यासाठी समाजाला शिक्षित करावे लागेल. लोकसंख्येचा असमतोल अव्यवहार्य आहे; कारण जिथे असंतुलन झाले तिथे देश कोसळला. जगात सर्वत्र असे घडले.
समलैंगिक व्यक्तींनाही जगण्याचा अधिकार !
समलैंगिकतेविषयी सरसंघचालक म्हणाले की, समलैंगिक असणार्यांनाही जगण्याचा अधिकार आहे. आपण मानवतेच्या दृष्टीकोनातून त्यांना सामावून घेण्याचा मार्ग कोणताही गोंगाट न करता निर्माण केला. आपल्याकडे तृतीयपंथी समाज आहे. आपण त्याकडे समस्या म्हणून बघत नाही. त्यांचे स्वत:चे वेगळे देव आहेत. आता तर त्यांचे स्वत:चे महामंडलेश्वर आहेत. कुंभमेळ्यात त्यांना स्वतंत्र स्थान आहे. अनेक प्राण्यांमध्येही समलैंगिकतेचे गुणधर्म आढळले आहेत. हे संपूर्णत: जीवशास्त्रीय आहे.