केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाकडून कळसा आणि भंडुरा प्रकल्पांची पहाणी
म्हादई जलवाटप तंटा
पणजी, १० जानेवारी (वार्ता.) – केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान पालट मंत्रालयातील अधिकार्यांनी १० जानेवारी या दिवशी कर्नाटक येथे म्हादईचे पाणी वळवण्यासाठी उभारण्यात येणार असलेल्या कळसा आणि भंडुरा प्रकल्पांना भेट दिली. कर्नाटक सरकारने कळसा आणि भंडुरा प्रकल्प उभारून म्हादईचे पाणी मलप्रभा नदीत वळवण्यासाठी केंद्राकडे अनेक दाखल्यांची मागणी केली आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय पर्यावरण मंत्रालयातील अधिकार्यांनी ही भेट दिली आहे.
म्हादईवर धरणप्रकल्प उभारण्यासाठी वीजवाहिन्या ओढाव्या लागणार आहेत. म्हादई हा विभाग वन्यजीव अभयारण्यामुळे अतीसंवेदनशील क्षेत्र म्हणून ओळखले जाते. यामुळे प्रकल्प उभारतांना कर्नाटकला प्राणी संवर्धनाला कोणतीही हानी होणार नाही, असे प्रमाणपत्र मंत्रालयाला द्यावे लागणार आहे. मंत्रालयाने अशी सूचना कर्नाटक वन खात्याच्या मुख्य वन्यजीव संरक्षकांना केली आहे. प्रकल्पासाठी भूमीगत वीजवाहिनी ओढण्याची सूचनाही मंत्रालयाने कर्नाटकला केली आहे.
कळसा आणि भंडुरा प्रकल्पांवरून अनुसरून केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने उपस्थित केलेल्या सर्व प्रश्नांना कर्नाटक सरकारकडे उत्तर असल्याचा दावा कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी केला आहे.
_____________________________________________________________________________
♦ ‘म्हादई जलवाटप तंटा’ या संदर्भातील आजपर्यंतच्या घडामोडी पाहण्यासाठी क्लिक करा ♦
_____________________________________________________