शासकीय इमारतीचे साहित्य चोरणार्यांवर फौजदारी गुन्हा नोंद करावा ! – आमदार शशिकांत शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस
सातारा, १० जानेवारी (वार्ता.) – कोणतीही प्रशासकीय निविदा न घेता शासनाच्या कह्यात असलेली वैद्यकीय महाविद्यालयाची इमारत पाडली गेली, तसेच त्याचे कोट्यवधी रुपयांचे भंगार चोरीला गेले. हे शासकीय अधिकार्यांच्या संमतीनेच विकले गेले आहे का ? असे असेल, तर शासकीय इमारतीचे साहित्य चोरणार्यांवर फौजदारी गुन्हे नोंद करण्यात यावेत, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषदेचे आमदार शशिकांत शिंदे यांनी सभागृहात केली होती. (हे गंभीर सूत्र आहे. या प्रकरणी संबंधितांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करणे आवश्यक आहे. – संपादक)
सरकारी इमारतीचे साहित्य विकणाऱ्या संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा !
संपूर्ण प्रकाराबाबत मंत्री गिरीश महाजन यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. सरकारी तिजोरीवर डल्ला मारत संबंधित इमारत साहित्य विकणाऱ्या विरोधात कडक कारवाई व्हावी !https://t.co/XDmSCkEWab#WinterSession pic.twitter.com/yM32Jp8bce
— Shashikant Shinde (@shindespeaks) December 30, 2022
सभागृहात लक्षवेधी मांडतांना आमदार शशिकांत शिंदे म्हणाले की, अद्यापपर्यंत कोणतीही निविदा प्रक्रिया न करता २३ इमारती पाडण्यात आल्या आहेत. प्रस्तावित वैद्यकीय महाविद्यालयाला हस्तांतरीत करण्यात आलेली इमारत पाडण्यात आली. याविषयी सार्वजनिक बांधकाम विभाग, सिंचन विभाग आदींनी उडवाउडवीची उत्तरे दिली. तसेच वैद्यकीय महाविद्यालयानेही या प्रकरणी आमचा काहीही संबंध नाही, असे म्हणून हात वर केले आहेत. २३ इमारती पाडल्यानंतर पुन्हा १९ इमारती पाडण्यात आल्या आहेत. या प्रकरणी उपयोगात आणले गेलेले पोकलेन यंत्र, भंगार विकत घेणारी व्यक्ती आणि हे सर्व कारस्थान करणार्या व्यक्ती यांची नावे मी पुराव्यानिशी जाहीर करतो. या प्रकरणी अनेक तक्रारी केल्या, सर्वसामान्य नागरिक उपोषणाला बसले; मात्र चोरी होऊनही तक्रार घेतली जात नाही किंवा कोणताही विभाग त्याचे उत्तरदायित्व स्वीकारत नाही, हे दुर्देवाचे आहे. या प्रकरणाच्या सखोल चौकशीचे आदेश मंत्री गिरिष महाजन यांनी दिले असून दोषींवर कडक कारवाईचे आश्वासन दिले आहे.