महाराष्ट्रात ‘प्रिव्हेंशन ऑफ कट प्रॅक्टिस कायदा’ तत्परतेने लागू करावा !
मुंबई, १० जानेवारी (वार्ता.) – राज्यात ‘कट प्रॅक्टिस’द्वारे रुग्णांची उघडपणे लुटमार चालू आहे. अन्य क्षेत्रांत ज्याप्रमाणे संघटित गुन्हेगारी चालते, त्याप्रमाणे आरोग्याच्या क्षेत्रात ‘कट प्रॅक्टिस’द्वारे संघटित गुन्हेगारी चालू आहे. त्यामुळे आरोग्य क्षेत्रातील ही संघटित गुन्हेगारी रोखण्यासाठी सरकारने ‘प्रिव्हेंशन ऑफ कट प्रॅक्टिस कायदा’ तत्परतेने लागू करावा, अशी मागणी बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे मुख्य प्रतोद श्री. भरतशेठ गोगावले यांनी वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली.
निवेदनात पुढे म्हटले आहे की, महाराष्ट्र सरकारने जुलै २०१० मध्ये ‘महाराष्ट्र प्रिव्हेंशन ऑफ कट प्रॅक्टिस’ कायदा सिद्ध करण्यासाठी तज्ञांची एक समिती नियुक्त केली होती. या समितीने एका मासामध्ये याविषयीचा अहवाल सरकारकडे सादर केला आहे. वर्ष २०१७ पासून ‘कट प्रॅक्टिस’ कायद्याचे विधेयक सिद्ध केलेले असूनही कायद्यात रूपांतरित झालेले नाही.