हिंदूंची श्रद्धास्थाने आणि राष्ट्रपुरुष यांचा अवमान आता सहन करणार नाही ! – मनोज खाडये, हिंदु जनजागृती समिती
गडहिंग्लज येथील हिंदु राष्ट्र-जागृती सभेला ७ सहस्र हिंदूंची उपस्थिती !
गडहिंग्लज (जिल्हा कोल्हापूर), १० जानेवारी (वार्ता.) – आज कुणीही उठतो आणि हिंदूंच्या श्रद्धास्थानांवर टीका किंवा, चिखलफेक करतो. ज्या छत्रपती संभाजी महाराज यांनी असंख्य यातना सोसून प्राणार्पण केले; मात्र धर्म पालटला नाही, अशा छत्रपती संभाजी महाराज यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अजित पवार ‘छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर नसून त्यांना स्वराज्यरक्षक म्हटले पाहिजे’, असे विधान करतात. त्यांच्यातीलच लोक ‘छत्रपती शिवाजी महाराज हे जाणता राजा नव्हते’, ‘धर्मांध औरंगजेब क्रूर नव्हता’, अशी विधाने जाणीवपूर्वक करत आहेत. काँग्रेसचे नेते सिद्धरामय्या ‘मी हिंदू आहे; मात्र हिंदुत्वनिष्ठ नाही’, अशी विधाने करत आहेत. केवळ राजकीय लाभासाठी अशी विधाने केली जात आहेत. या विधानांना सामान्यांमधून विरोध झाल्यावर सारवासारव केली जाते. तरी येणार्या काळात हिंदूंची श्रद्धास्थाने आणि राष्ट्रपुरुष यांचा अवमान आम्ही कोणत्याही परिस्थितीत सहन करणार नाही, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे पश्चिम महाराष्ट्र, कोकण, गोवा आणि गुजरात राज्य समन्वयक श्री. मनोज खाडये यांनी केले. ते गडहिंग्लज शहरात म.दु. श्रेष्ठी विद्यालय येथे १० जानेवारी या दिवशी आयोजित हिंदु राष्ट्र-जागृती सभेत बोलत होते. या प्रसंगी सनातन संस्थेच्या सद्गुरु स्वाती खाडये आणि हिंदु जनजागृती समितीचे अधिवक्ता संघटक अधिवक्ता नीलेश सांगोलकर यांनीही मार्गदर्शन केले.
मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाल्यावर वेदमूर्ती ऋषिकेश कापशीकर-जोशी यांनी वेदमंत्रपठण केले. समितीच्या कार्याचा आढावा श्री. आदित्य शास्त्री यांनी मांडला. सूत्रसंचालन आणि आभारप्रदर्शन श्री. विपुल भोपळे यांनी केले.
हिंदूंच्या सर्वांगीण उत्कर्षासाठी हिंदु राष्ट्रच हवे ! – सद्गुरु स्वाती खाडये, सनातन संस्था
आज भारतात इस्लाम आणि ख्रिस्ती, तसेच अन्य अल्पसंख्यांक पंथ यांना विशेष संरक्षण दिले गेले आहे; पण देशातील बहुसंख्यांकांच्या, म्हणजेच हिंदु धर्माला कोणतेही राजकीय संरक्षण प्राप्त नाही. त्यामुळे भारतात अल्पसंख्यांकांच्या विरुद्ध अन्याय घडल्यास ‘अल्पसंख्यांक आयोग’ असतो. अल्पसंख्यांकांच्या विकासासाठी स्वतंत्र ‘अल्पसंख्यांक विकास मंत्रालय’ असते किंवा ‘सच्चर आयोग’ आदी बनवले जातात. बहुसंख्यांक हिंदूंना मात्र कुठलेही राजकीय संरक्षण नसल्याने ना त्यांच्या अन्यायाविषयी ‘बहुसंख्यांक आयोग’ आहे, ना त्यांच्या विकासासाठी ‘बहुसंख्यांक विकास मंत्रालय’ आहे. त्यामुळे ही परिस्थिती पालटण्यासाठी आणि हिंदूंच्या सर्वांगीण उत्कर्षासाठी आपल्याला हिंदु राष्ट्रच हवे !
धर्मांतर रोखण्यासाठी देशव्यापी कठोर कायदा करा ! – अधिवक्ता नीलेश सांगोलकर
हिंदु जनजागृती समितीचे सर्व कार्य कायद्याच्या चौकटीतच चालते. असे असतांना हिंदु जनजागृती समितीच्या फेरीसाठी पोलीस प्रशासनाने सर्व गाड्यांची अनुज्ञप्ती (लायसेन्स) मागितली. पोलीस प्रशासनाने या ठिकाणी कायदा पाळण्याची जी तत्परता दाखवली, तीच तत्परता पोलीस प्रशासनाने येथील अवैध भोंगे आणि त्याद्वारे होणारे ध्वनीप्रदूषण यांविषयी दाखवावी. सर्वोच्च न्यायालयाने ध्वनीप्रदूषणाच्या संदर्भात जो आदेश दिला आहे, त्याचे पालन पोलीस प्रशासनाने करावे. विविध प्रकारची आमीषे दाखवून धर्मांतर केले जात आहे, ते रोखण्यासाठीही पोलीस प्रशासनाने कायद्याचा वापर करावा. केवळ हिंदूंवर कारवाई करण्याची दुटप्पी भूमिका पोलीस प्रशासनाने घेऊ नये.
क्षणचित्रे
१. या सभेच्या प्रचारासाठी ६० गावांमधील धर्मप्रेमींनी उत्स्फूर्तपणे विशेष प्रयत्न केले.
२. सभेच्या प्रारंभी मान्यवर वक्त्यांचे वाजत-गाजत मिरवणुकीद्वारे सभास्थळी आगमन झाले. या प्रसंगी गजरगाव येथील लेझीम झांज मर्दानी पथकाच्या (वस्ताद दशरथ पाटील) कार्यकर्त्यांनी लेझीम खेळाद्वारे हिंदूंची मने जिंकली. याच समवेत सव्यासाची गुरुकुलम’च्या वतीने मर्दानी खेळांची प्रात्यक्षिकेही सादर करण्यात आली.
३. आत्याळ गावातील भजनी मंडळ टाळ वाजवत सभेसाठी उपस्थित झाले, तसेच कौलगे गावातील महिला ४ गाड्यांमधून एकाच रंगातील साड्या परिधान करून सभेसाठी उपस्थित होत्या.
४. हलकर्णी गावातील ५ गाड्या भरून तरुण हिंदू युवक-युवती घोषणा देत सभास्थळी उपस्थित राहिले.
धर्मवीरांचा सत्कार
सातत्याने राष्ट्र आणि धर्म जागृतीच्या कार्यात सहभागी असणारे सव्यासाची गुरुकुलमचे प्रधान आचार्य श्री. लखन जाधव, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे कार्यकर्ते आणि राज स्पोर्टसचे मालक श्री. राजू मोरे, धर्मप्रेमी श्री. सर्जेराव चव्हाण, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे श्री. राहुल शिंदे यांचा हिंदु जनजागृती समितीचे श्री. मनोज खाडये यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
उपस्थित मान्यवर
वारकरी महासंघाचे जिल्हाध्यक्ष मत्तीवडे (बेळगाव) येथील ह.भ.प. भाऊसाहेब पाटील, भाजपचे श्री. संदीप नाथबुवा यांसह विविध हिंदुत्वनिष्ठ संघटना, पक्ष, संप्रदाय यांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.