महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने कर्णावती (गुजरात) येथील आयडीबीआय बँकेत ‘मानसिक आरोग्य आणि भावनिक संतुलन’ या विषयावर व्याख्यान
कर्णावती (गुजरात) – ‘आयडीबीआय बँके’च्या कर्णावती विभागीय प्रशिक्षण केंद्राच्या वतीने ‘निरोगी रहाणीमान आणि यशस्वी व्यावसायिक अन् वैयक्तिक जीवन’ (Wellness Programme on Healthy Living and Leading a successful professional and personal life) या विषयावर ‘ऑनलाइन’ प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमात महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने डॉ. (सौ.) सायली यादव यांनी ‘मानसिक आरोग्य आणि भावनिक संतुलन’ (Mental Health & Emotional Balance) या विषयावर बँकेच्या तृतीय आणि चतुर्थ श्रेणीच्या कर्मचार्यांना मार्गदर्शन केले. ‘मानसिक आरोग्य म्हणजे काय ? शारीरिक आणि मानसिक आरोग्य प्राप्त करण्याच्या दृष्टीने अध्यात्माचे काय महत्त्व आहे ? बुध्यांक (आयक्यू Intelligence Quotient ) आणि भावनांक अधिक चांगला होण्यासाठी अध्यात्म अन् साधना कशी मार्गदर्शक आहे ?’, आदी विषयांवर डॉ. (सौ.) सायली यादव यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. या वेळी त्यांनी ‘स्वतःमध्ये पालट करणे, हाच अध्यात्माचा केंद्रबिंदू असून त्यासाठी प्रतिदिन साधना करणे आवश्यक आहे’, असे सांगितले.
या कार्यक्रमानंतर उपस्थित बँक कर्मचार्यांनी ‘हा विषय आवडला, तसेच या विषयाची सूत्रे, तसेच मांडणी अतिशय प्रभावी होती’, असे सांगितले. तसेच या कार्यक्रमानंतर प्रशिक्षण अधिकारी श्री. अनुप भारद्वाज यांनी महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या गोवा येथील संशोधन केंद्राला भेट देण्याची इच्छाही प्रदर्शित केली. या कार्यक्रमानंतर बँकेच्या वतीने चांगले गुण मानांकन देण्यात आले.