वंदनगडावर वाढवण्यात येत आहे इस्लामचे धार्मिक प्रस्थ !
दैनिक ‘सनातन प्रभात’च्या संकेतस्थळावर लेखमालिका वाचा !
|
(टीप : मजार म्हणजे इस्लामी पीर किंवा फकीर यांची समाधी)
गेल्या काही वर्षांत महाराष्ट्रातील गड-दुर्ग यांवर एखादे थडगे किंवा मजार बांधणे, तेथे ऊरूस चालू करणे आणि त्यानंतर दर्गा बाधून तेथे धार्मिक स्थळ निर्माण करणे असे प्रकार एका ठराविक पद्धतीनुसार चालू आहेत. गड-दुर्ग इस्लामची धार्मिक केंद्रे बनवून छत्रपती शिवरायांचा पराक्रम झाकोळून हिंदूंना तेजोहीन करण्याचे हे नियोजित षड्यंत्र असल्याचे दिसून येत आहे. सध्याचे महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राज्यातील गड-दुर्ग यांवरील अतिक्रमण हटवण्याची केलेली घोषणा स्वागतार्ह आहे. या इस्लामिक अतिक्रमणाची भयावहता लक्षात यावी, यासाठी दैनिक ‘सनातन प्रभात’ मधून याविषयीची माहिती क्रमश: प्रसिद्ध करत आहोत. या गड-दुर्गांवरील अतिक्रमणही राज्यशासनाने हटवावे, अशी समस्त दुर्गप्रेमींची मागणी आहे.
भाग ९.
(भाग ८. वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/643758.html)
ठाणे जिल्ह्यातील नाथपंथीय साधू मलंगबाबा यांच्या समाधीवर दर्गा उभारून त्याचा उल्लेख ‘पीर मलंगगड’ असा प्रचलित करण्यात आला. तसाच प्रकार सातारा जिल्ह्यातील वंदनगडावर होत आहे. हा गड वनविभागाच्या अखत्यारित आहे. वाई तालुक्यातील बेलमाची गावातील वंदनगडावर पद्धतशीरपणे नियोजनबद्ध इस्लामचे धार्मिक प्रस्थ वाढवण्यात येत आहे. भोजकालीन प्रवेशद्वार, खंदक, पाच तलाव, काळूबाई मंदिर, राजवाडा, बालेकिल्ला आदी हिंदु संस्कृती दाखवणार्या ऐतिहासिक वास्तू गडावर असूनही या गडाचा उल्लेख जाणीवपूर्वक ‘पीर’ असा करण्यात येत आहे.
अल्पसंख्यांकधार्जिणा वनविभाग !
वंदनगडावर प्राचीन शिवपिंड आहे. ‘शिववंदनेश्वर महादेव’ या नावाने हे स्थान ओळखले जाते. या पिंडीवर दुर्गप्रेमींनी स्वखर्चाने पत्र्याची शेड उभारली; परंतु ती अवैध ठरवून वनविभागाकडून शेड तात्काळ हटवण्यासाठी दुर्गप्रेमींना नोटीस पाठवण्यात आली. एका मुसलमानाच्या तक्रारीवरून वनविभागाने ही कारवाई केली. एवढ्यावर न थांबता नोटिसीमध्ये गडाचा उल्लेख ‘पीर वंदनगड’ असा करण्यात आला होता. स्थानिक हिंदुत्वनिष्ठांनी जिल्हाधिकार्यांकडे तक्रार केल्यानंतर ही चूक अनावधानाने झाल्याची सारवासारव वनविभागाकडून करण्यात आली. गडावरील दर्ग्याच्या रंगाप्रमाणे गडाच्या महाद्वाराजवळील श्री गणेशाच्या मूर्तीला जाणीवपूर्वक पांढरा चुना फासण्यात आला होता; मात्र हिंदुत्वनिष्ठांनी मूर्तीला पुन्हा भगवा रंग दिला. गडावरील वरच्या भागातील जीर्ण झालेल्या शिवकालीन समाध्या व्यवस्थित करून त्यांच्यावर चादर चढवून त्यांचे मजारीत रूपांतर करण्याचा धक्कादायक प्रकार करण्यात आला आहे. गडावरील सुर्ख अब्दालसाहब दर्ग्यामध्ये फरशी बसवण्यात आली आहे. शिवपिंडीवर पत्र्याची शेड उभारली म्हणून शिवप्रेमींना नोटीस पाठवणार्या वनविभागाने समाध्यांचे कबरीत रूपांतर केल्यावर आणि दर्ग्यात फरशी बसवल्यावर मात्र कारवाई केली नाही.
(समाप्त)