इतरांना साहाय्य करणार्या आणि तीव्र शारीरिक अन् आध्यात्मिक त्रासांतही तळमळीने साधना करणार्या सौ. कल्पना मारुति पाटील !
इतरांना साहाय्य करणार्या आणि तीव्र शारीरिक अन् आध्यात्मिक त्रासांतही तळमळीने साधना करणार्या अत्याळ, तालुका गडहिंग्लज, जिल्हा कोल्हापूर येथील सौ. कल्पना मारुति पाटील (वय ६० वर्षे) !
अत्याळ, तालुका गडहिंग्लज, जिल्हा कोल्हापूर येथील साधिका सौ. कल्पना मारुति पाटील यांची मोठी बहीण आणि भाचा यांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
१. सौ. विजया निंबाळकर (मोठी बहीण, आध्यात्मिक पातळी ६२ टक्के), उंचगाव, जिल्हा कोल्हापूर.
१ अ. अभ्यासू वृत्ती : ‘माझ्या आईला ६ मुले आणि आम्ही दोघी मुली आहोत. सौ. कल्पना सर्वांत लहान आहे. मी आणि सौ. कल्पना सनातनच्या मार्गदर्शनानुसार साधना करत आहोत. सौ. कल्पना अभ्यासू आहे. तिचा सनातनशी संपर्क आल्यानंतर तिने अत्यंत बारकाईने ग्रंथांचा अभ्यास केला आणि तिला हाच मार्ग सर्वाेत्तम असल्याचे लक्षात आले. तिने तात्काळ साधनेला प्रारंभ केला. ती तत्त्वनिष्ठ आहे. त्यामुळे ती चुकांचा अभ्यास चांगला करते. मलाही ती आवश्यकतेनुसार सर्व मार्गदर्शन करते. मला चुकांच्या मुळाशी जायला जमत नाही, तर ती मला ते शिकवते. ती इतरांमध्येही नामजपादी उपायांचे गांभीर्य निर्माण करते.
१ आ. सौ. कल्पनाची शारीरिक स्थिती चांगली असतांना तिने केलेले साधनेचे प्रयत्न !
१. साधना समजताच अल्पावधीतच सौ. कल्पना ग्रंथांचा अभ्यास करून सत्संग घेऊ लागली. तिने अनेक सेवा अल्पावधीत शिकून घेतल्या आणि ती परिणामकारकपणे धर्मप्रचार करू लागली. श्री गणेशमूर्तीच्या विसर्जनासारख्या मोहिमांमध्येही ती पुढाकार घेऊन सेवा करत असे.
२. तिने तिच्या आणि शेजारच्या गावातील लोकांना साधना करणे आणि सत्पात्री अर्पण करणे, यांचे महत्त्व सांगितले असून अनेक जण गुरुपौर्णिमेनिमित्त स्वतःहून धन अर्पण करतात.
३. सौ. कल्पनाचे पती श्री. मारुति पाटील हे लेखापरीक्षक (ऑडिटर) आहेत. त्यांच्याकडे अनेक मोठमोठ्या आस्थापनांचे लेखापरीक्षण असते. त्यानिमित्ताने घरी येणार्या मोठ्या आस्थापनांच्या उच्चपदस्थ अधिकार्यांनाही सौ. कल्पनाने साधना सांगितली आहे. त्यांच्यापैकी अनेक जण नामजप करतात, सनातनची सात्त्विक उत्पादने घेतात आणि धन अर्पण करतात.
४. सौ. कल्पनाने सनातनमध्ये आल्यानंतर तिचे यजमान श्री. मारुति यांच्या मनाची सिद्धता करून घेतली. त्यानंतर त्यांनी पूर्वजांच्या संबंधित तिथीला श्राद्ध करणे चालू केले. त्यानंतर तिने सत्संगातील साधकांना समवेत घेऊन गावातील अन्य लोकांनाही पितृपक्षाचे महत्त्व सांगितले. आता गावातील ८० टक्के लोक पितृपक्षात श्राद्ध करतात.
५. सौ. कल्पना तिच्या गावातील सामाजिक कार्यातही सहभागी असते. ती हळदी-कुंकू समारंभात साधना सांगायची. तिने गावात एक स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्ग चालू करण्यात पुढाकार घेतला होता.
१ इ. पूर्णवेळ साधना करणार्या भाच्याच्या खंबीरपणे पाठीशी उभी रहाणारी आणि बहिणीलाही चांगली साधना करायला प्रवृत्त करणारी सौ. कल्पना ! : माझा मुलगा श्री. सागर वर्ष २००१ मध्ये सनातनच्या माध्यमातून पूर्णवेळ सेवा करू लागला. तेव्हा माझे अनेक नातेवाईक त्याच्याविषयी आमच्याकडे तक्रार करायचे. ते आम्हाला ‘मुलाला एवढे शिकवून काय उपयोग झाला ? या वयात त्याने असे कशाला करायचे ?’, असे जिवाला लागेल, असे बोलायचे; मात्र सौ. कल्पना श्री. सागरच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली. तिने माझी समजूत घातली. तिने मला सांगितले, ‘‘सागर चांगली साधना करील. आपणही चांगली साधना करूया. साधनेमुळे आपल्यासारख्या सामान्य जिवांचा उद्धारच होईल.’’ त्यानंतर माझी श्रद्धा दृढ झाली. मला साधना करतांना देवाने अनेक अनुभूती दिल्यामुळे तिचे बोल खरे झाल्याचे लक्षात आले.
१ ई. सौ. कल्पनाला होत असलेले शारीरिक आणि आध्यात्मिक त्रास अन् तिने त्याविरुद्ध गुरुकृपेच्या बळावर दिलेला लढा !
१ ई १. स्वतःला आध्यात्मिक त्रास होत असतांना सौ. कल्पनाने तिच्या मुलाला नामजपादी उपाय करायला शिकवणे : वर्ष २००७ मध्ये कोल्हापूर येथे पहिली हिंदु राष्ट्र-जागृती सभा होती. सौ. कल्पनाने त्यासाठीची सिद्धता १ मास आधीपासून केली होती. ती या सभेला तिच्या सत्संगातील २० साधकांना घेऊन उपस्थित होती. सभेच्या ठिकाणी सौ. कल्पनाला त्रास देणार्या अनिष्ट शक्तीला त्रास होऊ लागला. तिच्यावर कुणीतरी करणी केल्याचेही स्पष्ट झाले. त्यानंतर तिने नामजपादी उपाय न डगमगता केले. ती त्यांच्या कुटुंबात एकटीच साधना करणारी होती. तिला त्रास देणार्या अनिष्ट शक्तीला त्रास होऊ लागल्यावर ती तिचा मुलगा मिलिंद (तेव्हाचे वय १३ वर्षे) याला सात्त्विक उदबत्तीने त्रासदायक आवरण काढायला सांगायची. ती त्याला विभूती फुंकरायला सांगायची. नंतर मिलिंदनेही ‘नामजपादी उपाय कसे करायचे ?’, हे शिकून घेतले.
१ ई २. सकारात्मक राहून ६ वर्षे शारीरिक त्रासांवर उपचार घेणे : वर्ष २००८ मध्ये तिला संधीवाताचा तीव्र त्रास चालू झाला. तिला स्वयंपाकही करता येईनासा झाला. तिच्यावर मुंबई-पुणे येथील आधुनिक वैद्यांचे उपचार करण्यात आले. तिच्या यजमानांनी तिला प्रत्येक वेळी सहकार्य केले. वर्ष २०१४ पर्यंत तिला पुष्कळ औषधोपचार करावे लागले; मात्र सौ. कल्पना कधी थकली नाही. तिची परात्पर गुरु डॉक्टरांवरील श्रद्धा कधीही डळमळीत झाली नाही.
१ ई ३. सौ. कल्पनाने आध्यात्मिक त्रासांविरुद्ध दिलेला लढा ! : वर्ष २००८ ते २०१४ या काळात तिला सत्संगाला जाता येत नव्हते. तिच्या गावात २ – ३ दिवसांचे ‘सनातन प्रभात’ एकत्र मिळायचे. ते वाचून त्यातील सूचनांचे तंतोतंत पालन करून ती जमतील ते प्रयत्न करायची. तिला होणार्या आध्यात्मिक त्रासामुळे कधी-कधी तिला स्वयंपाक करायला शक्य होत नसे. तिला दोन-दोन दिवस अंथरुणावरून हलताही येत नसे. एखादी मूठ चुरमुरे आणि एक बाटली पाणी घेऊन ती दिवस काढत असे. तिला कितीही त्रास होत असला, तरी ती शक्य तितके सर्व नामजपादी उपाय मनोभावे करत असे.
१ उ. सौ. कल्पनाची जाणवलेली अन्य गुणवैशिष्ट्ये
१ उ १. आनंदी : तिची एखाद्या समारंभात भेट झाली, तर तिच्या तोंडवळ्यावरून ‘तिला इतका शारीरिक आणि आध्यात्मिक त्रास असेल’, असे लक्षात येत नाही.
१ उ २. इतरांना साहाय्य करणे : सौ. कल्पना हिने आवश्यकतेनुसार मला, तसेच माझ्या भावांनाही आर्थिक साहाय्य केले आहे. तेव्हाही तिचा ‘स्वतःची साधना व्हावी’, असाच विचार असतो.
१ उ ३. निर्णयक्षमता : तिची निर्णयक्षमता चांगली आहे. तिने वर्ष १९९७ मध्येच कोल्हापूर शहरातून अत्याळ या गावी जाऊन रहाण्याचा निर्णय घेतला. साधना, नोकरी, संगणक इत्यादी शिकणे, मुलाचा विवाह आदी गोष्टींच्या संदर्भात तिने घेतलेले निर्णय योग्य ठरले आहेत.
‘हे श्रीकृष्णा, ‘सौ. कल्पनाच्या माध्यमातून तू मला केवळ एक बहीण नाही, तर एक आध्यात्मिक मैत्रीणही दिलीस. माझ्या कुटुंबातच मला एक साधकही दिल्यामुळे माझ्या साधनेला बळ मिळाले’, त्यासाठी तुझ्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’
२. श्री. सागर निंबाळकर, (भाचा, मोठ्या बहिणीचा मुलगा), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
२ अ. साधकाला स्वतःच्या मुलाप्रमाणे शिकवणे : ‘सौ. कल्पना पाटील या माझ्या मावशी आहेत; पण माझ्या मामांची मुले त्यांना आत्या म्हणतात. त्यामुळे मी आणि माझी बहीण त्यांना आत्याच म्हणतो. वर्ष १९९० मध्ये मला आत्यांनीच सुवाच्च अक्षर काढायला शिकवले. ‘माझे इंग्रजी सुधारावे’, यासाठी त्यांनी मला शब्द पाठ करायला शिकवले. त्यांनी मला अभ्यास अधिक चांगला करण्यासाठी अनेक गोष्टी शिकवल्या. त्यांनी मला त्यांचा मोठा मुलगाच मानले आहे.
२ आ. भाच्याला पूर्णवेळ साधनेसाठी पाठिंबा देणे : मी वर्ष १९९८ मध्ये साधनेत आलो. त्यानंतर २ – ३ वर्षांनी आत्या साधनेत आल्या. वर्ष २००१ मध्ये मी पूर्णवेळ झाल्यानंतर काही नातेवाइकांनी विरोध केला; मात्र आत्यांनी मला दूरभाष करून सांगितले, ‘‘तू चांगला निर्णय घेतला आहेस. तुला ज्या गोष्टीत अधिक आनंद मिळेल, ती तू कर. तुला नक्कीच यश मिळेल.’’
२ इ. स्वतःच्या कुटुंबियांवरही साधनेचे संस्कार करणे : आत्यांचा मुलगा मिलिंद याने त्याच्या वयाच्या १२ – १३ व्या वर्षापासूनच त्याच्या आईची मनोभावे सेवा केली. तो आत्यांसाठी नामजपादी उपायही करत असे. शिक्षण पूर्ण झाल्यावर त्याला बंगळुरू किंवा पुणे येथे मोठ्या वेतनाची नोकरी लागली असती; मात्र आईची काळजी घेण्यासाठी त्याने कोल्हापूर येथे राहून लहानसा व्यवसाय चालू केला. एखाद्या ग्रंथामध्ये काही तांत्रिक माहिती हवी असल्यास मी त्याला रात्री १२ वाजताही संपर्क करतो. त्या वेळी तो मला साहाय्य करतो. त्याला त्याच्या विषयाच्या संदर्भातील एखादी समस्या विचारल्यावर तो आवश्यकतेनुसार सविस्तर अभ्यास करून सेवा म्हणूनच ती समस्या सोडवण्याचा प्रयत्न करतो. आत्यांनी त्याच्यावर केलेल्या साधनेच्या संस्कारांमुळेच तो हे करत आहे.
आत्यांनी त्यांचे यजमान, म्हणजे माझे काका श्री. मारुति पाटील यांनाही साधना सांगितली. त्यांनीही आत्यांच्या आजारपणाच्या काळात अत्यंत संयमाने, प्रेमाने, सर्व परिस्थिती स्वीकारून आत्यांची सेवा केली. आत्यांनी त्यांची स्नुषा सौ. वैष्णवी हिलाही साधनेचे महत्त्व सांगितले असून तिच्याकडून नामजप, प्रार्थना होण्यासाठी त्या प्रयत्न करत आहेत.
२ ई. प्रेमभाव : आत्यांनी गुरुपौर्णिमा महोत्सवांमध्ये सर्व साधक सदरा आणि पायजमा परिधान करत असल्याचे पाहिले. त्यांनी वर्ष २००२ मध्ये ‘माझ्याकडे सदरा आणि पायजमा नाही’, हे हेरले. तेव्हा त्यांनी लगेचच मला १ सहस्र रुपये देऊन ‘एक उत्तम सदरा अन् पायजमा घेऊन ये’, असे सांगितले.
२ उ. भाच्याच्या विवाहाच्या वेळी धार्मिक विधींचा लाभ घेण्यासाठी पूर्णवेळ उपस्थित रहाणे : वर्ष २००७ मध्ये माझा कोल्हापूर येथे विवाह झाला. त्यासाठी रामनाथी आश्रमातील साधक पुरोहित पाठशाळेचे संचालक श्री. दामोदर वझे आणि अन्य साधक आले होते. ‘विवाहाप्रसंगी होणार्या धार्मिक विधींचा अधिकाधिक लाभ व्हावा’, यासाठी शारीरिक त्रास सहन करूनही आत्या सर्व विधींना २ दिवस उपस्थित राहिल्या. विधी चालू असतांना त्या मधून मधून प्रार्थनाही करायच्या.
२ ऊ. आत्यांमध्ये जाणवलेले पालट
१. त्यांच्यातील सकारात्मक विचारांचे प्रमाण वाढले आहे.
२. त्यांच्याशी बोलतांना पूर्वीच्या तुलनेत ‘त्या अधिक आनंदी आहेत’, असे जाणवते.
३. आत्यांना नातेवाइकांकडून असलेल्या अपेक्षा न्यून झाल्याचे जाणवते. आता त्या सर्वांना निरपेक्षपणे साधना सांगतात.
४. त्यांना होत असलेल्या किंवा त्यांनी यापूर्वी भोगलेल्या शारीरिक आणि आध्यात्मिक त्रासांविषयी आता त्यांना काहीच वाटत नाही. त्यांना ‘अधिकाधिक नामजप, प्रार्थना आणि कृतज्ञता व्यक्त करूया’, असे वाटते.
२ ए. कृतज्ञता : ‘परात्पर गुरु डॉक्टर, मी वर्ष १९९८ मध्ये साधनेत आलो. असे असले, तरी त्यापूर्वीही माझ्या सभोवती असलेल्या आत्यांसारख्या साधक वृत्तीच्या नातेवाइकांच्या माध्यमातून आपणच माझ्यावर सुसंस्कार केलेत. आपल्या या कृपेसाठी आणि मला आतापर्यंत आत्यांकडून शिकायला मिळालेल्या विविध सूत्रांसाठी आपल्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’
(६.१०.२०२०)
|