नागपूर येथे विवाहितेशी अश्लील संभाषण करणार्या पर्यवेक्षकाला पोलिसांसमोरच मारहाण !
अटक करण्यास पोलिसांकडून विलंब
नागपूर – जिल्ह्यातील मौदा तालुक्यात पोलीस ठाण्यासमोर नागरिकांनी विनयभंग प्रकरणातील आरोपी रघुवेंद्र उपाध्याय याला ८ जानेवारी या दिवशी मारहाण केली. आरोपी उपाध्याय याला पोलिसांनी अटक केली आहे.
१. तक्रारदार पती आणि पत्नी काम करत असलेल्या आस्थापनातच पर्यवेक्षक म्हणून रघुवेंद्र उपाध्याय काम करतो. त्यानेे पीडित महिलेला विवाहाची गळ घातली; मात्र तिने विवाहित असल्याने त्याला नकार दिला. काही दिवसांनी रघुवेंद्रने ‘व्हिडिओ संपर्क केला नाहीस, तर तुझ्या पतीला जिवे मारेन’ अशी धमकी दिली. त्यामुळे तिने घाबरून व्हिडिओ संपर्क केला.
२. हा प्रकार त्याने भ्रमणभाषमध्ये चित्रीत केला. त्यानंतर आरोपीने महिलेला ब्लॅकमेल केल्याने तिने याविषयी पतीला सांगितले. आरोपीने ३० डिसेंबर २०२२ या दिवशी अश्लील चित्रफीत प्रसारित करण्याची धमकी दिली.
३. ४ जानेवारीला त्याने महिलेसमवेत असभ्य वर्तन केल्याने दांपत्याने त्याची तक्रार केली; मात्र पोलिसांनी गुन्हा नोंद करण्यास विलंब केला. (अशा पोलिसांना बडतर्फच केले पाहिजे. – संपादक)
४. पोलिसांनी आरोपी विरोधात विनयभंगाचा गुन्हा नोंद केल्यानंतरही त्याला अटक केली नाही. अटकेच्या मागणीसाठी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष नरेश मोटघरे यांच्या नेतृत्वाखाली ठिय्या आंदोलन करण्यात आले. ‘तक्रार न घेणार्या पोलीस अधिकार्यावर कारवाई करावी आणि आरोपीला अटक होत नाही, तोपर्यंत हलणार नाही’, अशी भूमिका पीडितेच्या नातेवाइकांनी घेतली.
५. पोलीस आरोपीला अटक करून पोलीस ठाण्यात आणत असतांना पोलिसांच्या तावडीतून आरोपी रघुवेंद्र याला खेचून आणत भाजपचे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नागरिक यांनी त्याला मारहाण केली.