कॉ. पानसरे हत्या प्रकरणात १० संशयितांवर दोष निश्चित : संशयितांकडून दोष अमान्य !
कोल्हापूर, ९ जानेवारी (वार्ता.) – कॉ. पानसरे हत्या प्रकरणातील १० संशयितांवर ९ जानेवारीला कोल्हापूर येथील न्यायालयात दोष निश्चिती करण्यात आली. सचिन अंदुरे, शरद कळसकर, डॉ. वीरेंद्रसिंह तावडे, अमोल काळे, वासुदेव सूर्यवंशी, भारत कुरणे, अमित डेगवेकर, अमित बद्दी, गणेश मिस्कीन आणि समीर गायकवाड अशी त्यांची नावे आहेत. या सर्वांवर ठेवण्यात आलेले दोष अमान्य असल्याचे सर्व संशयितांना सांगितले. या प्रकरणाची पुढील सुनावणी २३ जानेवारीला होणार आहे. ही सुनावणी जिल्हा आणि सत्र न्यायाधीश एस्.एस्. तांबे यांच्यासमोर चालू असून संशयितांच्या वतीने अधिवक्ता समीर पटवर्धन हे काम पहात आहेत.
या खटल्यात एकूण १२ संशयित असून त्यांतील २ संशयित पसार आहेत, असे सरकार पक्षाचे म्हणणे आहे. वरील १० संशयितांपैकी समीर गायकवाड हे सध्या जामिनावर आहेत. या प्रकरणी माहिती देतांना सरकारी वकील शिवाजीराव राणे म्हणाले, ‘‘हे अन्वेषण आता आतंकवादविरोधी पथकाकडे (‘ए.टी.एस्.कडे) वर्ग करण्यात आले आहे. आतंकवादविरोधी पथकाचे न्यायालय सोलापूर आणि मुंबई येथे आहे. त्यामुळे हा खटला नेमका कुठे चालवायचा ?, याविषयी निश्चिती नव्हती. या प्रकरणी सरकारने विशेष अधिसूचना काढून हा खटला कोल्हापूर येथेच चालेल, असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे या खटल्याची नियमित सुनावणी कोल्हापूर येथेच होईल.’’