अंतर्मन घडवणारी हिंदी पाक्षिक ‘सनातन प्रभात’संबंधी सेवा !
‘सनातन प्रभात’ नियतकालिकांच्या माध्यमांतून गेल्या अनेक वर्षांपासून समाजप्रबोधन केले जात आहे. ‘सनातन प्रभात’ नियतकालिकांतून ‘राष्ट्र आणि धर्म यांच्यावर होणारे आघात, संतांचे मार्गदर्शन, साधकांना आलेल्या अनुभूती, सूक्ष्म ज्ञान’ यांसंबंधी विविध लेखांच्या माध्यमातून समाजातील व्यक्तींना दिशा दिली जाते अन् त्यांना साधनाप्रवण केले जाते. दैनिक ‘सनातन प्रभात’ मराठीत ४ आवृत्या, साप्ताहिक ‘सनातन प्रभात’ मराठी आणि कन्नड, पाक्षिक ‘सनातन प्रभात’ हिंदी आणि इंग्रजी या भाषांत प्रकाशित केले जाते. गुरुकृपेने मला जवळजवळ ७ वर्षे हिंदी पाक्षिक ‘सनातन प्रभात’शी संबंधित सेवा करण्याचे सौभाग्य प्राप्त झाले.
या लेखात कु. रेणुका कुलकर्णी यांना शिकायला मिळालेली सूत्रे जाणून घेऊया.
१. विविध विषयांशी संबंधित हिंदी पाक्षिक ‘सनातन प्रभात’च्या विशेषांकांशी संबंधित सेवा करतांना अनेक गोष्टींविषयी माहिती मिळणे आणि विचारांत व्यापकता येणे
हिंदी पाक्षिक ‘सनातन प्रभात’मध्ये राष्ट्र-धर्म यांच्याशी संबंधित विविध लेख प्रकाशित होतात. ‘गोमाहात्म्य, ज्योतिष, इतिहास पुनर्लेखन, आपत्कालीन सिद्धता, संगीत, आयुर्वेद, प्राचीन भारतीय तंत्रज्ञान, औषधी वनस्पतींची लागवड, हिंदुत्वनिष्ठांचे मार्गदर्शन’ इत्यादी अनेक विषयांशी संबंधित विशेषांक प्रकाशित झाले आहेत. त्यासंबंधी सेवा करत असतांना मला अनेक गोष्टींची माहिती मिळाली. माझ्या विचारांत व्यापकता आली.
२. हिंदी साहित्याची ओळख होऊन ‘हिंदी भाषा किती समृद्ध आहे !’, हे लक्षात येणे
ही सेवा करतांना माझी हिंदी भाषेशी मुळापासून ओळख झाली. मी हिंदी व्याकरण शिकले. या निमित्ताने मी हिंदी लिखाणाचे संकलन करायला शिकले. ‘हिंदी भाषा किती समृद्ध आहे !’, हे माझ्या लक्षात आले. मी संकलनाची सेवा केल्यामुळे ‘पाल्हाळिक न बोलता मोजके आणि अर्थपूर्ण बोलायला हवे’, हे माझ्या लक्षात आले. हिंदी पाक्षिक ‘सनातन प्रभात’मध्ये शुद्ध हिंदी भाषेत लिहिण्याचा प्रयत्न केला जातो. त्यामुळे वाचकाला त्यातील लिखाण समजायला आरंभी कठीण जाऊ शकते; मात्र कालांतराने शुद्ध हिंदी भाषा त्याच्या अंगवळणी पडते. हिंदी भाषेतील ‘परकीय शब्द कोणते ?’, हे माझ्या लक्षात येऊन मला संस्कृतनिष्ठ हिंदी शब्द बोलण्याची सवय लागली.
३. आरंभी वृत्तांसंबंधी सेवा करतांना राष्ट्र आणि धर्म यांवर होणारे आघात वाचून मन विचलित होणे; मात्र नंतर ‘सर्व समस्यांवर ‘साधना करणे आणि हिंदु राष्ट्राची स्थापना करणे’ हीच उपाययोजना आहे’, हे लक्षात येऊन मन स्थिर होणे
माझ्याकडे हिंदी पाक्षिक ‘सनातन प्रभात’साठी वृत्ते संकलित करण्याची सेवा असायची. त्या वेळी राष्ट्र आणि धर्म यांवर होणारे आघात वाचून मला चीड यायची. मला उदास वाटायचे. त्यानंतर मला त्या वृत्तांकडे साक्षीभावाने पहाता येऊ लागले. ‘सर्व समस्यांवर ‘हिंदु राष्ट्राची स्थापना करणे’ आणि ‘साधना करणे’, हीच उपाययोजना आहे’, हे माझ्या लक्षात आले. त्यामुळे माझे मन स्थिर झाले.
४. ‘हिंदी पाक्षिक ‘सनातन प्रभात’च्या संदर्भातील सेवा अंतर्मनाची प्रक्रिया होण्यासाठी आणि स्वतःत आमूलाग्र पालट करण्यासाठी मिळाली आहे’, हे लक्षात येणे
मला मिळालेली ‘हिंदी पाक्षिक ‘सनातन प्रभात’शी संबंधित सेवा माझ्या अंतर्मनाची प्रक्रिया होण्यासाठी आणि माझ्यात आमूलाग्र पालट करण्यासाठी आहे’, हे माझ्या लक्षात आले. या सेवेच्या निमित्ताने आणि उत्तरदायी साधकांचे मार्गदर्शन लाभल्यामुळे मी काही गोष्टी शिकले.
४ अ. सेवेचे पूर्वनियोजन करणे : हिंदी पाक्षिक ‘सनातन प्रभात’ छपाईला पाठवण्यासाठी समयमर्यादा असते. त्यापूर्वी पाक्षिकाच्या सर्व पानांवरील लिखाण निश्चित करणे, हिंदी भाषेतील लिखाण शुद्ध करणे, पानांची रचना पूर्ण करणे इत्यादी सेवा असतात. पाक्षिकाचे प्रत्येक पान अंतिम करण्यासाठी समयमर्यादा ठरवलेली असते. मी उत्तरदायी साधकांकडून सेवेचे पूर्वनियोजन करायला शिकले. पूर्वी नियोजनात त्रुटी राहिल्याने आणि माझे सेवेविषयी गांभीर्य अल्प असल्याने माझ्या सेवेत अनेक चुका होत असत, परिणामी मला पाक्षिकाच्या संबंधी सेवा करण्यासाठी अनेक घंटे लागत असत. उत्तरदायी साधिकांनी मला वेळोवेळी चुकांची जाणीव करून दिल्याने नंतर अल्प कालावधीत माझी पाक्षिकाच्या संबंधी सेवा पूर्ण होऊ लागली. ‘पूर्वनियोजन अन्य सेवांमध्ये, तसेच वैयक्तिक जीवनातही करायला हवे’, हे माझ्या लक्षात आले.
४ आ. साधकांशी योग्य प्रकारे समन्वय करायला शिकणे : साधकांशी समन्वय योग्य प्रकारे झाला नाही, तर साधकाला अयोग्य किंवा अर्धवट माहिती मिळते आणि सेवा प्रलंबित रहाते. माझ्याकडून समन्वय करण्यात चुका व्हायच्या. तेव्हा उत्तरदायी साधिकेने मला ‘सेवेचा समन्वय करतांना ‘मनात अनावश्यक विचार असतात का ? सेवेचा विषय स्पष्ट असतो ना ?’, याचे चिंतन करायला सांगितले. सेवेच्या संदर्भांतील समन्वय तोंडी केला, तर आपल्या सांगण्यात आणि समोरच्या साधकाच्या ऐकण्यात काही त्रुटी राहू शकतात. त्यामुळे उत्तरदायी साधिकेने मला साधकांना निरोप सांगण्यासह लघुसंदेश किंवा संपत्र यांद्वारेही कळवण्यास सांगितले.
(क्रमशः)
– कु. रेणुका कुलकर्णी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१६.१२.२०२२)
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |