बलशाली प्रजा निर्मितीसाठी सप्तपदीतील पाचवे पाऊल !
सर्व वेदवेत्या गुरुजनांना वंदन करुन सप्तपदी या लेखमालेत हे ५ वे पुष्प गुंफत आहे. विवाह हा संस्कार दोन जिवांचे मीलन करतो. तसेच तो दोन कुटुंबांचेही मीलन करतो. आज सप्तपदीतील ५ वे पाऊल, हे विशेष महत्त्वाचे आहे. अन्नदात्री, ऊर्जादात्री, धनदात्री आणि भव्य बनवणारी या ४ कामना आपण अभ्यासल्या. आज विवाहातील ५ वे पद पाहूया.
१. देवऋण आणि पितृऋण यांतून मुक्त होणे, तसेच धर्म अन् न्याय मार्गांनी प्रजा निर्माण करणे, हा विवाह संस्काराचा उद्देश !
‘प्रजाभ्य: पञ्चपदी भव ।’ म्हणजे ‘तू माझ्यासमवेत पाचवे पाऊल टाक, तू संतती वाढवणारी हो.’ प्रत्येक मनुष्य जन्माला येतांना देवऋण, ऋषिऋण आणि पितृऋण अशी ३ ऋणे घेऊनच जन्मास येत असतो. विवाह संस्काराचा संकल्पच मुळी देवऋण आणि पितृऋण यांतून मुक्त होणे, तसेच धर्म आणि न्याय मार्गांनी प्रजा निर्माण करणे, हा आहे. पत्नीच्या सहकार्याने केलेल्या देवकृत्यांमुळे (व्रतवैकल्ये, यज्ञयाग आणि दानधर्म) देवांच्या ऋणातून आपली मुक्तता होते.
आपल्यापर्यंत आलेली विद्या स्वत: शिकणे, त्या विद्येचे संवर्धन करणे आणि पुढील पिढीकडे ती सुपुर्द करणे यांमुळे ऋषींच्या ऋणातून मुक्तता होते. अथर्वशीर्षामध्ये आपण म्हणतोच, ‘अशिष्याय न देयम् ।’ म्हणजे ‘कुपात्र व्यक्तीस देऊ नये’, म्हणजेच ज्याचा कुणी शिष्य नसेल आणि जो शिष्य होण्याच्या पात्रतेचा नसेल, त्याला विद्या शिकवू नये; कारण विद्या हे दुधारी शस्त्र आहे. त्याचा वापर सत्कर्मासाठी करण्यातच हित आहे. तेव्हा ते योग्य व्यक्तीजवळच हवे. पितृऋणातून मुक्ती हवी असेल, तर दांपत्याने सुप्रजा निर्माण करणे आणि श्राद्धकर्म वगैरे करणे आवश्यक आहे. आज नेमके हेच होतांना दिसत नाही, ही खंत आहे. थोडेसे कठोर; पण सत्य मांडणार आहे.
२. नवदांपत्यांच्या सृजनतेसाठी योग्य स्थळ, काळ आणि आहार यांचे महत्त्व
२ अ. सात्त्विक स्थळ : ‘शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी’ म्हणजे ‘बीज शुद्ध असेल, तर येणारी फळे रसाळ अन् मधुर असतात’, हे जगद़्गुरु संत तुकाराम महाराज यांनी सहज सोप्या भाषेत सांगितले आहे. ते आपण नेमके विसरत चाललो आहोत. लग्न झाल्यानंतर ‘मधुचंद्र’ (हनीमून) ही संकल्पना आपल्याकडे रुजत चालली आहे. ती फार घातक आहे. नवदांपत्य ज्या ठिकाणी एकत्र येणार (सृजन होणार) आणि ज्या ठिकाणी नवजिवाची निर्मिती होणार, ते हॉटेल किंवा लॉज यांचे ठिकाण असते. तेथे कितीतरी ‘वासनांध जोडपे’ (अविवाहितही) येऊन मजा करून गेलेली असतात. काहींनी तर प्रेमभंगामुळे आत्महत्याही केलेल्या असतात. अशा वासनायुक्त खोल्यांमध्ये आपण एका नवजिवाचे स्वप्न रंगवत असणार.
२ आ. सात्त्विक आहार :
कृते चास्थिगता: प्राणास्त्रेतायां मांससंस्थिता ।
द्वापरेे रुधिरंं यावत् कलावन्नादिषु स्थिताः ॥ – पाराशरस्मृति, अध्याय १, श्लोक ३२
अर्थ : सत्ययुगात प्राण जिवांच्या अस्थींमध्ये होता, त्रेतायुगात मांसामध्ये होता, द्वापरयुगात रक्तात होता आणि कलियुगात अन्नाच्या आश्रयाने आहे.
प्रतिदिन उपाहारगृहातील अन्न, जंकफूड, फास्टफूड खाल्ल्यावर जो नवीन जीव आपल्या माध्यमातून सृजन होणार, त्याचे प्राण या अन्नाने मलिन होणारच. मन, बुद्धी आणि विचार सर्व आपोआपच मलिन होणार. त्यामुळे अन्नशुद्धी ही महत्त्वाची आहे. घरचे जेवण हे सुसंततीसाठी आवश्यक आहे.
२ इ. योग्य काळ : आज मुलींचे विवाह ३० वर्षांनंतर होतात. (मुलगी ऋतुमती १२ व्या वर्षी होते आणि रजोनिवृत्ती ४० वर्षांनंतर होते.) कायद्याने ‘१८ वर्षांनंतर विवाह करा’, असे सांगितले आहे. ३० वर्षांनी विवाह झाल्यानंतर पुढे २ वर्षे ‘प्लॅनिंग’ (कुटुंब नियोजन) करतांना औषधी गोळ्यांचे सेवन होते. असे करत वयाची ३२ वर्षे झाली. त्यानंतर संतती होण्यासाठी परत औषधे गोळ्या खा. मग वयाच्या ३५ नंतर संतती होते. (ही बालके जन्मत: मधुमेह, चष्मा, आजार घेऊनच जन्माला येत आहेत.)
सशक्त राष्ट्र आणि समाज या पिढीने बनणार नाही. ज्या वेळी झाडाला ‘बहर’ असतो. त्या वेळीच त्याची फळेही मधुर असतात. आपण बहर असतांना ‘फळे’ येऊ नये; म्हणून प्रयत्न करतो आणि झाडाचा बहर ओसरतांना (३५ वर्षांनंतर रजोनिवृत्ती जवळ येतांना) फळांची आशा करतो.
३. भावी पिढीला धार्मिक कथा आणि थोर राष्ट्रपुरुषांचे चरित्र सांगितल्यास सुप्रजा निर्माण होईल !
अ. सकाळ झाली की, आपण लहान मुलांना दूरचित्रवाणीसंचावर ‘छोटा भीम’, ‘टॉम अँड जेरी’ हे कार्टून कार्यक्रम लावून देतो. त्यांना ‘सूर्यनमस्कार घाल’, ‘कपाळाला टिळा लाव’, ‘देवाचे स्तोत्र म्हण’, अशा प्रकारचा कोणताही आग्रह करत नाही. त्यांना छत्रपती शिवराय, संत ज्ञानोबा, संत तुकोबा, क्रांतीकारक यांचे चरित्र शिकवत नाही. त्यांना भजन, कीर्तन, प्रवचन, व्याख्यान यांना जाण्यासाठी आग्रह करत नाही. सलमान आणि शाहरूख यांचे चित्रपट मात्र आवडीने सहकुटुंब पहातो.
आ. त्यांनी पब आणि डिस्को यांमध्ये गेेलेले चालते; पण कधी नाट्यसंगीत, शास्त्रीय संगीत, भरतनाट्यम् पहायला नेणे, हे कमीपणाचे वाटते. रामायण आणि महाभारत कधी आपण वाचून दाखवले का मुलांना ? नीट आठवा. अफझलखानाचा कोथळा काढणारे छत्रपती शिवराय शिकवले का मुलांना ?
‘इंग्रजांचे डोके ठिकाणावर आहे का ?’, असे उघडपणे विचारणारे लोकमान्य टिळक शिकवले का? बायको गरोदर असतांना सहस्रो स्त्रियांचा सन्मान राखण्यासाठी चापेकर बंधूंनी केलेला रँडचा वध शिकवला का ? एडनचे कारागृह फोडणारे वासुदेव बळवंत फडके शिकवले आहेत का? ‘आधी लग्न कोंढाण्याचे…’ असे सांगणारे महापराक्रमी तानाजी मालुसरे शिकवले आहेत का ? ‘दुरितांचे तिमिर जावो…’ ही विश्व प्रार्थना शिकवणारे संत ज्ञानोबा शिकवले का ?
मनाला १०० टक्के विचारून स्वत:लाच उत्तर द्या. मुलांना वेळप्रसंगी कर्ज घेऊन आणि घरदार विकून आधुनिक वैद्य (डॉक्टर), अधिवक्ता, अभियंते, संगणक तज्ञ असे सर्व बनवले; पण ‘भारतीय संस्कृतीचा पाईक’ बनवले का ?
४. पुढील पिढी सशक्त, बलवान, धैर्यवान आणि पुण्यश्लोक होण्यासाठी त्यांना धर्मशिक्षण देणे काळाची आवश्यकता !
आज तरुण पिढीला गणपति, गोकुळाष्टमी, नवरात्र असे सण केवळ नाचण्यासाठी हवेत. गणपतीने दुष्ट राक्षसांचा केलेला संहार, कृष्णनीती आणि देवीचे रणचंडी रूप यांविषयी त्यांना माहितीच नाही. कपाळाला कुंकू नाही, कानात, नाकात आणि गळ्यात काहीच नाही, हातात बांगड्या नाहीत. अशी आमची भगिनी वेशभूषेवरून ५० टक्के धर्मांतरित झालेलीच आहे. मग केवळ नाव पालटायचे शेष आहे. (त्यासाठी रहेमान, सुलेमान सिद्धच आहेत !)
सर्वप्रथम नवदांपत्यांनी हे लक्षात ठेवले पाहिजे की, प.प. (परमहंस परिव्राजकाचार्य) वासुदेवानंद सरस्वती (टेंब्ये स्वामी) आद्यशंकराचार्य, नृसिंह सरस्वती या सर्वांच्या माता-पित्यांनी जे तपाचरण कले, त्याची ही मधुर फलनिष्पत्ती आहे.
गोपाळकृष्ण जन्माला येण्यापूर्वी वसुदेव-देवकीला अपार कष्ट भोगावे लागले. तेव्हा या सर्व चरित्रांचा नीट अभ्यास करणे आवश्यक आहे. सानेगुरुजींचे ‘शामची आई’ वाचा. आई कशी हवी ? याचे ते सर्वोत्तम उदाहरण आहे.
आर्य सनातन वैदिक हिंदु धर्मियांचे पराक्रम आपल्या मुलाबाळांना शिकवा. शक, हुण, कुशाण, ग्रीक अशा कितीतरी परकीय आक्रमकांना ज्या धैर्याने आपण नेस्तनाबूत केले, त्या पराक्रमी लोकांचे आम्ही ‘वंशज’ आहोत. ‘वसुधैव कुटुम्बकम् ।’ म्हणजे ‘संपूर्ण पृथ्वी हेच कुटुंब’ ही शिकवण देणार्या ऋषींचे आम्ही ‘वंशज’ आहोत. बायकोच्या पदराला हात लावणार्या ‘कौरवांना’ समूळ नष्ट करणार्या पांडवांचे आम्ही वंशज आहोत. ही धैर्यशौर्याची परपंरा आपली आहे. ती पुढच्या पिढीकडे संक्रमित करणे, हे आपले दायित्व असून ती टाळू नये. यासाठी हा लेखनप्रपंच.
‘संघटित व्हा, सामर्थ्यवान व्हा’, हे लक्षात येण्यासाठी एक सुभाषित सांगतो,
वनानि दहतो वह्नेः सखा भवति मारुत: ।
स एव दीपनाशाय कृशे कस्यास्ति सौहृदम् ॥ – पञ्चतन्त्र, काकोलूकीयम्, श्लोक ५७
अर्थ : जेव्हा जंगलाला आग लागते, तेव्हा वारा अग्नीला साहाय्य करतो; परंतु एखादा लहान दिवा पेटत असतांना वारा आला, तर तो मात्र विझून जातो. बलहिनाला कुणी वाली (मित्र) नसतो.
आपली पुढची पिढी ही सशक्त, बलवान, धैर्यवान आणि पुण्यश्लोक व्हावी यांसाठी प्रयत्न करा, तरच सप्तपदीतील पाचवे पाऊल सार्थकी लागेल.’
– वेदमूर्ती भूषण दिगंबर जोशी, वेंगुर्ला, सिंधुदुर्ग (६.१२.२०२२)