गोवा राज्यात आत्महत्या करणार्यांचे प्रमाण राष्ट्रीय सरासरीपेक्षा अधिक !
पणजी – नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोने केलेल्या सर्वेक्षणानुसार गोव्यात आत्महत्या करणार्यांचे प्रमाण वाढत असल्याचे दिसून आले आहे. वर्ष २०२१ मध्ये गोव्यात आत्महत्यांची सरासरी ही राष्ट्रीय सरासरीहून अधिक असल्याचे दिसून आले. प्रतिवर्षी हे प्रमाण वाढतच असून गोवेकरांच्या दृष्टीने ही धोक्याची घंटा आहे.
१. वर्ष २०१७ मध्ये गोवा राज्यात आत्महत्या केलेल्यांची संख्या २६६ होती. वर्ष २०१८ आणि २०१९ मध्ये ही संख्या अनुक्रमे २४९ अन् २५९ होती. त्यानंतर वर्ष २०२० मध्ये म्हणजे कोरोना महामारीच्या काळात ही संख्या ३०३ वर गेली, तर वर्ष २०२१ मध्ये ३११ आत्महत्या केली. वर्ष २०२२ च्या जानेवारी ते जून या ६ मासांत १५० जणांनी आत्महत्या केल्याची नोंद झाली आहे.
२. गोव्यात आत्महत्या करणार्यांची सरासरी १९.५ टक्के आहे, तर राष्ट्रीय स्तरावर ही सरासरी १२ टक्के आहे.
३. याविषयी गोव्यातील ‘सांगात’ या संस्थेच्या मानसोपचार तज्ञ मिरीयम सिक्वेरा म्हणाल्या, ‘‘बेरोजगारी आणि मद्य किंवा अमली पदार्थांचे सेवन ही आत्महत्यांमागील मुख्य कारणे आहेत. त्यासह कोरोना महामारी हेही एक प्रमुख कारण आहे.’’
४. उत्तर गोवा जिल्हा रुग्णालयातील मानसोपचार तज्ञ डॉ. तन्वी पेडणेकर म्हणाल्या, ‘‘मानसिक साहाय्याची आवश्यकता असलेल्यांच्या संख्येचे प्रमाण गोव्यात पुष्कळ अल्प आहे. जर आत्महत्या करण्यासाठी साहित्य मिळण्यापासून एखाद्याला रोखले, तर आत्महत्या करणे टळू शकते.’’
५. गोवा सिविक कंझ्युमर ॲक्शन नेटवर्क या संस्थेचे समन्वयक रोलंड मार्टीन्स म्हणाले, ‘‘गोवा राज्यात आत्महत्या रोखण्यासाठी पुरेशा पायाभूत सुविधा नाहीत. त्यामुळे गोव्यासारख्या पर्यटनस्थळामध्ये आत्महत्यांचे प्रमाण वाढत आहे.’’
संपादकीय भूमिका
|