नवी मुंबई येथे ए.पी.एम्.सी. परिसरातील फेरीवाल्यांवर महापालिकेची धडक कारवाई !
नवी मुंबई – ए.पी.एम्.सी. परिसरामध्ये गेल्या अनेक मासांपासून वाढलेल्या फेरीवाल्यांवर तुर्भे विभाग कार्यालयाच्या अतिक्रमणविरोधी पथकाने धडक कारवाई केली आहे. पादचार्यांनी या कारवाईचे स्वागत करत चालण्यासाठी ‘फेरीवालामुक्त’ पदपथ उपलब्ध करून दिल्याविषयी पालिकेचे आभार मानले आहेत.
तुर्भे विभाग कार्यालयाच्या अंतर्गत तुर्भे (ए.पी.एम्.सी.) येथे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती ही आशिया खंडातील सर्वांत मोठी बाजारपेठ असल्याने तेथे दिवसभर पुष्कळ वर्दळ असते. येथील रस्ते आणि पदपथ यांवर ठिकठिकाणी अनधिकृत फेरीवाल्यांनी ठाण मांडले आहे; मात्र त्यांच्यावर ठोस कारवाई केली जात नाही. ते त्यांचा खराब झालेला माल पदपथ आणि रस्ता, तसेच जवळील गटार, नाला यांमध्ये टाकून देतात. यामुळे तेथे घाण निर्माण होऊन दुर्गंधी पसरते.