म्हादईवर विशेष चर्चेसाठी प्रस्ताव आल्यास विचार करणार ! – सभापती रमेश तवडकर
म्हादई जलवाटप तंटा
पणजी, ८ जानेवारी (वार्ता.) – म्हादई प्रश्नावर आगामी हिवाळी अधिवेशनात चर्चा करण्यासाठी सरकार किंवा आमदार यांच्याकडून विशेष प्रस्ताव आल्यास त्यावर योग्य निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन विधानसभेचे सभापती रमेश तवडकर यांनी दिली. केंद्रीय जल आयोगाने कर्नाटकच्या ‘सविस्तर प्रकल्प अहवाला’ला (डी.पी.आर्.ला) मान्यता दिल्याने म्हादई वाचवण्यासाठी विरोधी पक्षांनी विधानसभेच्या आगामी हिवाळी अधिवेशनात विशेष चर्चा घडवून आणण्याची मागणी केली आहे. या पार्श्वभूमीवर पणजी येथे आयोजित एका कार्यक्रमात सभापती रमेश तवडकर यांनी ही माहिती दिली. गोवा विधानसभेचे ४ दिवसीय हिवाळी अधिवेशन १६ जानेवारीपासून चालू होणार आहे.
‘Mhadei debate in house if govt recommends’ https://t.co/4i5A9E6zpU
— TOI Goa (@TOIGoaNews) January 8, 2023
ते पुढे म्हणाले, ‘‘गोव्याचे हित जपण्यासाठी सर्व ४० आमदार आणि सरकार कटीबद्ध आहे. सरकारनेही म्हादईप्रश्नी त्यांची भूमिका वेळोवेळी स्पष्ट करून त्या दृष्टीने पावलेही उचलली आहेत. जनतेने निवडून दिलेले आमदार गोव्याच्या हितासाठीच काम करत आहेत. म्हादई हा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. सध्या म्हादईवर विशेष चर्चा करण्यासाठी कुठलाही प्रस्ताव अजून आलेला नाही.’’
#Goa #Politics #Mhadei @VijaiSardesai pic.twitter.com/i9yNHmWOrC
— Prudent Media (@prudentgoa) January 8, 2023
म्हादईप्रश्नी बोलतांना ‘गोवा फॉरवर्ड’चे आमदार विजय सरदेसाई म्हणाले, ‘‘म्हादईप्रश्नी राजकीय नेते न्याय देण्यासाठी अपयशी ठरल्याने आता गोमंतकियांनीच या प्रश्नी योग्य न्याय दिला पाहिजे. भाजप आणि काँग्रेस हे दोन्ही पक्ष कर्नाटकमधील विधानसभा निवडणुकीवर डोळा ठेवून आहेत आणि कर्नाटकमध्ये खासदारांची एकूण संख्या २८ आहे.’’