आमदार गोपीचंद पडळकर यांच्या भावासह १०० जणांवर मिरज शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद !
मिरज – शहर बसस्थानकाजवळ असलेली १० दुकाने जेसीबी यंत्राच्या साहाय्याने जमावाने उद़्ध्वस्त केली. जागा मालकीच्या प्रकरणावरून हा प्रकार घडला असून या प्रकरणी आमदार गोपीचंद पडळकर यांचे भाऊ ब्रह्मानंद पडळकर यांच्यासह १०० जणांवर मिरज शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ‘ही जागा आमच्या नावावर असून महापालिकेने अतिक्रमण पाडण्याची नोटीस दिल्यानंतरच आम्ही कायदेशीररित्या हे बांधकाम पाडले आहे’, असे पडळकर यांनी सांगितले.
मिरज शहर बसस्थानकाजवळ काही दुकाने, उपाहारगृह असून ही जागा पडळकर यांनी विकत घेतल्याचा दावा केला आहे. यातून काही दिवस हा वाद चालू होता. यातूनच अचानक जेसीबी आणून ही दुकाने पाडण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी ४ जेसीबी जप्त केले असून पुढील अन्वेषण करत आहेत. या प्रकरणी उद्धव ठाकरे गटाचे शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख शंभोराज काटकर यांनी दोषींवर तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.