घुसखोर बांगलादेशींना हटवण्यासाठी दादर (मुंबई) येथे भाजपचे आंदोलन !
मुंबई – ‘घुसखोर बांगलादेशी रोहिंग्याना हटवा, दादर वाचवा’, ‘दादरकरांच्या पैशांवर रोहिंग्यांना पोसणार्या जमालला अटक करा’, अशा घोषणा देत बांगलादेशी घुसखोरांना हटवण्यासाठी ७ जानेवारी या दिवशी दादर (पश्चिम) रेल्वेस्थानकाजवळ भाजपकडून धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात भाजपचे मुंबई अध्यक्ष आमदार आशिष शेलार, सचिव जितेंद्र राऊत, माहीम विधानसभा मतदारसंघाच्या अध्यक्षा अक्षता तेंडुलकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.
बांगलादेशी रोहिंगे दादागिरी करून जागा बळकावत आहेत. मराठी माणसाच्या जिवावर पैसे कमवायचे आणि ते बांगलादेशी घुसखोरांसाठी वापरायचे, हे आम्ही कदापी खपवून घेणार नाही. स्थानिक भूमीपुत्राला त्यांचा हक्क मिळालाच पाहिजे. बांगलादेशी घुसखोरांवर महापालिका आणि पोलीस प्रशासन यांनी कारवाई करावी. ‘बांगलादेशी घुसखोरांना आसरा देणार्या शमशुद्दीन याला अटक केली नाही, तर आम्ही त्याला आमच्या पद्धतीने धडा शिकवू’, अशी चेतावणी या वेळी अधिवक्ता आशिष शेलार यांनी दिली.