पत्नी आणि आई-वडील यांना प्रेमाने आधार देणारे देवद, पनवेल येथील सनातनच्या आश्रमातील श्री. रवींद्र साळोखे (वय ४० वर्षे) !
‘२६.१२.२०१५ या दिवशी श्री. रवींद्र साळोखे यांच्याशी माझा विवाह झाला. आमच्या विवाहाला आठ वर्षे होत आली आहेत. या कालावधीत मला जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.
१. पत्नीला सर्वतोपरी सांभाळणारे प्रेमळ पती श्री. रवींद्र !
१ अ. पत्नीला साहाय्य करणे : मला होणार्या आध्यात्मिक त्रासामुळे माझी प्राणशक्ती अल्प असते. तेव्हा श्री. रवींद्र मला सर्व गोष्टींत साहाय्य करतात, तसेच खोली आवरणे अशा गोष्टीही ते नियमित करतात. यात कधीही खंड पडला नाही.
१ आ. यजमानांमध्ये पुरुषी अहंकार नसल्याने विवाहानंतर ८ वर्षांत पती-पत्नीमध्ये वाद किंवा भांडण न होणे : इतक्या वर्षांत श्री. रवी माझ्याशी कधीही रागाने किंवा अधिकारवाणीने बोलले नाहीत. त्यांनी कधीही कोणतेच निर्णय माझ्यावर लादले नाहीत. त्यांचे कोणतेही निर्णय ते मला विचारून घेतात. आम्ही दोघेही प्रत्येक कृती एकमेकांना विचारून करत असल्यामुळे इतक्या वर्षांत आमच्यात कधी वाद किंवा भांडण झाले नाही.
१ इ. पत्नीची प्रकृती आणि आध्यात्मिक त्रास यांविषयी वेळोवेळी विचारपूस करून रात्री-अपरात्रीही तिच्यासाठी नामजपादी उपाय करणे : श्री. रवी आश्रमात सेवा करत असतांना दिवसभरात मध्ये मध्ये मला संपर्क करून ‘माझी स्थिती कशी आहे ?’, हे समजून घेतात. ‘माझी शारीरिक स्थिती ठीक नाही’, असे जाणवल्यावर ते तत्परतेने मला नामजपादी उपाय करण्यास सांगतात आणि माझ्याजवळ थांबून माझ्यासाठी नामजपही करतात. माझा त्रास न्यून होईपर्यंत ते वेगवेगळे आध्यात्मिक उपाय करतात. कधीकधी रात्री-अपरात्रीही मला त्रास होतो. तेव्हाही ते न थकता आनंदाने सर्व करतात. त्यामुळे माझा आध्यात्मिक त्रास हळूहळू न्यून होऊ लागला आहे.
१ ई. परात्पर गुरु डॉक्टरांचा विश्वास सार्थ ठरवणे : आमच्या विवाहानंतर परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सांगितले होते, ‘‘रवी आहे, त्यामुळे मला तुमची काहीच काळजी नाही.’’ गुरुदेवांचा हा विश्वास श्री. रवी यांनी सार्थ ठरवला आहे.
२. आई-वडिलांप्रती असलेली सर्व कर्तव्ये पार पाडणारे आदर्श पुत्र – श्री. रवी !
२ अ. सासूबाईंना घरकामांत साहाय्य करणे : श्री. रवी घरी असतांनाही सर्व कृती आश्रमाप्रमाणेच करतात. ते सेवाभावी वृत्तीने आईंना (ती.सौ. सासूबाईंना) सर्व कामांत साहाय्य करतात. कचरा काढणे, घर आवरणे, पाणी भरणे, स्वयंपाकात साहाय्य करणे आदी सर्व गोष्टी ते स्वतःहून करतात. त्यामुळे आधीपासून त्यांच्या आईला त्यांचा आधार वाटतो. हे करतांना त्यांची कधीही चिडचिड होत नाही, तसेच ते कर्तेपणाही घेत नाहीत. या गोष्टी ते अगदी सहजतेने साधना म्हणून करतात.
२ आ. आई-वडिलांची काळजी घेणे : आश्रमात रहातांना आई-वडिलांना नियमित संपर्क करणे, त्यांच्या अडचणी सोडवणे आणि त्यांची काळजी घेणे, हे सर्व ते स्वतःहून करतात. याविषयी त्यांना कधीही आठवण करून द्यावी लागत नाही. आई-वडिलांनी अनुमती दिल्यामुळे आपण पूर्णवेळ साधना करू शकतो, याबद्दल त्यांच्या मनात पुष्कळ कृतज्ञताभाव आहे.
श्री. रवी हे सर्वार्थांनी ‘आदर्श मुलगा’ आणि ‘आदर्श पती’ आहेत.
३. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या प्रती भाव
श्री. रवी यांच्यामध्ये परात्पर गुरु डॉक्टरांप्रती पुष्कळ भाव आहे. ते सतत परात्पर गुरुदेवांचे अस्तित्व अनुभवण्याचा प्रयत्न करतात.
श्री. रवींमध्ये असलेले हे गुण माझ्यातही येऊ देत, तसेच त्यांची शीघ्र गतीने आध्यात्मिक उन्नती होऊ दे’, अशी गुरुमाऊलींच्या चरणी प्रार्थना ! ‘परात्पर गुरुदेवांच्या आशीर्वादामुळे असे ‘आदर्श पती’ मला लाभले’, याबद्दल मी त्यांच्या चरणी कृतज्ञ आहे.’
– सौ. राधा रवींद्र साळोखे (पत्नी), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१९.१०.२०२२)
आदर्श पती आणि पुत्र असलेले श्री. रवींद्र साळोखे !‘सेवेमुळे वेळ मिळत नाही’, असे कारण सांगून अनेक साधक सांसारिक, तसेच आई-वडिलांप्रती असलेली कर्तव्ये नीट पार पाडत नाहीत. या पार्श्वभूमीवर श्री. रवींद्र यांचे उदाहरण विरळा आहे. सेवा करण्यासमवेतच ते कुटुंबियांच्या प्रती असलेली कर्तव्येही उत्तम प्रकारे पार पाडत आहेत. ‘पत्नीशी अधिकारवाणीने न बोलणे’ आणि ‘विवाहानंतर ८ वर्षांत पती-पत्नीमध्ये वाद किंवा भांडण न होणे’, हे श्री. रवींद्र यांचा अहं अल्प असल्याचे दर्शक आहे. त्यांची साधना चांगल्या प्रकारे चालू असून आध्यात्मिक उन्नतीही जलद गतीने होत आहे !’ – (सच्चिदानंद परब्रह्म) डॉ. आठवले (१२.११.२०२२) |
पत्नीची काळजी घेणारे आणि तिची मनोभावे सेवा करणारे श्री. रवींद्र साळोखे !
‘वर्ष २०२० मध्ये मी आणि श्री. रवींद्र साळोखे देवद, पनवेल येथील सनातन संकुल परिसरात एकाच सदनिकेत रहात होतो. तेव्हा मी रवीदादांमधील सेवाभावी वृत्ती जवळून पाहिली. त्यांना स्वतःला शारीरिक त्रास असूनही ते त्यांच्या पत्नीची (सौ. राधा यांची) सर्वतोपरी काळजी घ्यायचे. राधाताईंना त्रास चालू झाल्यावर दादा त्यांच्या समवेत दिवसभर खोलीत थांबून नामजप करायचे. बर्याच वेळेला राधाताईंजवळ थांबावे लागत असल्याने त्यांना स्वतःकडील सेवा करायला जमायचे नाही, तरीही ते आनंदाने परिस्थिती स्वीकारायचे. खरेतर ‘पत्नी पतीची मनोभावे सेवा करते’, असे आपण अनेक ठिकाणी पहातो. मी येथे पहिल्यांदाच ‘पती पत्नीची मनोभावे आणि भावपूर्ण रीतीने सेवा करत आहे’, याविषयीचे दुर्मिळ प्रसंग मी पाहिले.’
– श्री. सचिन कौलकर (साधक), मुंबई (१९.१०.२०२२)
आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात. |