व्यष्टी आढावा घेतांना ‘साधकांना कसे समजून घ्यायचे ?’, हे कृतीतून दाखवणारे सद़्गुरु राजेंद्र शिंदे !
आज ९.१.२०२३ (पौष कृष्ण द्वितीया ) या दिवशी सद़्गुरु राजेंद्र शिंदे (वय ६० वर्षे) यांचा ‘उग्ररथ शांत विधी’ आहे. त्यानिमित्त त्यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम !
‘सद़्गुरु राजेंद्रदादा यांच्याकडे वेगवेगळ्या वयोगटांचे, क्षमतेचे आणि प्रकृतीचे साधक व्यष्टी साधनेच्या आढाव्यासाठी जोडलेले आहेत. आढावा घेतांना ते साधकांना त्यांच्या स्तराला जाऊन समजून घेतात. त्यामुळे सद़्गुरु दादा साधकांच्या समस्यांवर अचूक उपाययोजना सांगू शकतात आणि साधक ती सहजपणे स्वीकारू शकतात. साधकांना सद़्गुरु दादांंचा आधार वाटतो आणि साधकांचे व्यष्टी साधनेचे प्रयत्न अल्प-अधिक झाले, तरी निराशा न येता त्यांचा उत्साह टिकून रहातो. ‘सद़्गुरु दादा अशा साधकांचा आढावा घेतांना कसा दृष्टीकोन ठेवतात ?’, याविषयी त्यांना विचारल्यावर त्यांनी साधकांची स्थिती आणि ते ठेवत असलेला दृष्टीकोन, तसेच साधकांना ते करत असलेले साहाय्य यांविषयी सांगितले. यातून मला सद़्गुरु दादांमध्ये साधकांप्रती असणारी प्रीती अनुभवता आली. त्यांच्या समवेत झालेले संभाषण त्यांच्या चरणी अर्पण करत आहे.
९.१.२०२३ (पौष कृष्ण द्वितीया) या दिवशी सद़्गुरु राजेंद्र शिंदे यांचा ‘उग्ररथ शांत विधी’ आहे. त्यानिमित्त हे लिखाण प्रसिद्ध करत आहोत.
(‘उग्ररथ शांत विधी’ कधी केला जातो ? : वयाच्या ५० वर्षांनंतर व्यक्तीच्या इंद्रियांची क्षमता अल्प होत जाते. ती पूर्ववत् व्हावी आणि उर्वरित आयुष्य सुखा-समाधानाने जगता यावे, यासाठी वयाच्या ५० वर्षांनंतर प्रत्येक ५ वर्षांनी विधी केले जातात. त्यातील वयाच्या ६० व्या वर्षी ‘उग्ररथ शांत विधी’ केला जातो.)
१. साधकांना आढाव्याचा येणारा ताण, त्यांच्या मनातील नकारात्मक विचार आणि ‘मला अधिक कळते’, हा तीव्र अहंचा विचार, यांचा विचार करून त्यांना आवश्यकतेनुसार मार्गदर्शन करणे
मी (वैद्या (कु.) माया पाटील) : सर्व साधकांना हाताळतांना कसा दृष्टीकोन ठेवता ?
सद़्गुरु दादा : ‘माझ्याकडे व्यष्टी साधनेच्या आढाव्यासाठी बर्याचदा व्यष्टी साधनेची आवड नसलेलेच साधक येतात. ‘साधकांनी बनवलेल्या स्वयंसूचना ९० टक्के चुकीच्या असतात. त्यामुळे स्वयंसूचनांच्या माध्यमातून साधक मनावर चुकीचाच संस्कार करत आहेत’, असे माझ्या लक्षात आले. माझा आढावा म्हणजे साधकांना ताणही असतो आणि आनंदही असतो. आरंभी काही साधकांच्या मनात ‘मी सांगत असलेले व्यष्टी साधनेचे प्रयत्न आपल्याला करायला जमणार नाहीत’, असा नकारात्मक विचारही असतो. ‘सर्वांच्याच मनामध्ये पुष्कळ सकारात्मकता असते’, असे नाही.
मी : अशा स्थितीत वेगवेगळ्या प्रकृतीच्या साधकांना कशा प्रकारे समजून घेता आणि साहाय्य करता ?
सद़्गुरु दादा : काही साधकांमध्ये पुष्कळ अहंभाव असतो. त्यातील अनेक साधक १५ ते २० वर्षांपासून साधना करणारे असतात. त्यामुळे त्यांच्यामध्ये ‘मला अधिक कळते’, हा अहंचा पैलूही तीव्र असतो. अशा साधकांना मी प्रारंभी काहीच सांगत नाही. ‘त्यांना जे जमते, ते प्रयत्न करू देत’, असा मी विचार करतो. बर्याचदा सारणीमध्ये प्रसंग चुकीचा लिहिलेला असतो, तसेच त्यांची प्रसंगाच्या खोलात जाण्याची इच्छा नसते. ते त्यांच्याकडून झालेल्या चुकांचे चिंतनही व्यवस्थित सांगत नाहीत, तरीही मी त्यांचे सर्व ऐकतो. त्यांची स्वीकारण्याची स्थिती नसेल, तर त्या वेळी त्यांना मी काही सांगत नाही. त्याच समवेत एखादीची स्थिती ठीक नसेल आणि त्याला ‘काहीतरी सांगितले, तर त्याची स्थिती आणखी बिघडेल’, असे मला वाटले, तरी मी त्याला काही सांगत नाही.
२. साधकांना सकारात्मक करण्यासाठी त्यांच्या कलेकलेने घेऊन आणि त्यांच्यात व्यष्टी साधनेची गोडी निर्माण करण्यासाठी सतत प्रोत्साहन देत प्रयत्न करणे
सद़्गुरु दादा : प्रारंभी साधारण ३ मास साधकांची स्थिती सकारात्मक कशी होईल, याकडेच मी लक्ष देतो, तसेच त्यांच्यामध्ये व्यष्टी साधनेविषयी गोडी निर्माण करण्याचा प्रयत्न करतो; कारण त्यांच्यामध्ये गोडी निर्माण झाली की, त्यांना काहीतरी सांगता येते. ‘त्यांना काय सांगितले की, आवड निर्माण होईल’, असा सतत विचार केल्यामुळे देवच त्यांच्यासाठी आवश्यक असणार्या गोष्टी मला सुचवतो किंवा पूर्वी वाचलेल्या काही प्रसंगांची आठवण करून देतो, तसेच अनुभूती सांगायला सुचवतो.
व्यष्टी आढावा घेतांना मी जराही घाई करत नाही; कारण व्यक्तीमध्ये पालट होण्यासाठी कालावधी लागतो. ‘कुणामध्ये २ मासांत पालट होत नाहीत, तसेच तसा विचार करणे अयोग्य आणि अशक्यही आहे’, असे मला वाटते. साधकांना त्यांच्यामध्ये पालट करण्यासाठी कालावधी द्यायला हवा. मी आढावा प्रकृतीनुसार घेतो; कारण एखाद्याची आकलनक्षमता चांगली असते, तर एखाद्याची स्वीकारण्याची स्थिती चांगली असते. त्यानुसार त्यांच्या स्थितीवर प्रयत्न सोडून देतो.
‘सर्वांना सतत प्रोत्साहन कसे देता येईल ?’, असे मी बघतो. हे एक प्रकारचे युद्धच आहे. सेनापती जसे युद्धात सर्वांना प्रोत्साहन देतो, तसेच मी करतो. प्रोत्साहन देण्याची कला देवाने मला साधनेत येण्यापूर्वीच दिलेली आहे.
३. साधकाच्या मनात ‘मला समजून घेणारे कुणीतरी आहे’, हा विश्वास निर्माण होईपर्यंत त्याला साहाय्य करत रहाणे
सद़्गुरु दादा : साधकाची स्थिती कशीही असली, तरी त्याला समजून घ्यायचे. ‘साधकाला आपल्याला कुणीतरी समजून घेतो’, असा विश्वास झाला की, तो मनातील सर्व बोलू शकतो. तो मोकळा व्हायला लागतो. ‘मला कुणी समजून घेत नाही’, हा त्याच्या मनातील भाग जाईपर्यंत त्याला समजून घेण्याचा प्रयत्न करतो. त्यानंतर ‘आपल्या अडचणी कुणाला समजणार नाहीत’, हे त्याच्या मनातून पूर्णपणे काढून टाकण्याचा प्रयत्न करतो. ‘मला समजून घेणारे कुणीतरी आहे आणि माझ्या अडचणींवर मार्ग सांगणारेही कुणीतरी आहे’, असे साधकाला वाटायला हवे.
अनेक वेळा साधकांना वैयक्तिक अडचणी आणि समष्टीतील अडचणी असतात. तेथेही मी लक्ष घालून सोडवतो. ‘त्यांना काय साहाय्य करता येईल ?’, हे मी पहातो.
४. आवश्यकता वाटल्यास कठोरपणे जाणीव करून देणे
काही कालावधी झाल्यानंतरही ज्यांचे प्रयत्न अपेक्षित असे होत नसतील, तर त्यांना थोडी कठोर शब्दांत जाणीव करून देतो. साधक अतिशय चुकीचे वागत असतील, त्या वेळीही त्यांना कठोर शब्दांत सांगतो.
५. साधकांना नवीन उदाहरण देऊन आकलन होईपर्यंत सांगणे आणि साधकांना घडवणे ही सेवाच असणे
मी : बर्याचदा साधकांना तेच तेच सूत्र सांगावे लागते, त्या वेळी तुम्ही कसा दृष्टीकोन ठेवता ?
सद़्गुरु दादा : ‘साधकांना घडवणे’, ही माझी सेवा आहे. दैनिक ‘सनातन प्रभात’ परिपूर्ण काढण्यासाठी सतत प्रयत्न करत रहातो. आज प्रयत्न केले, तरी उद्याचे दैनिक ‘सनातन प्रभात’ उत्तम होण्यासाठी प्रयत्न करावेच लागतात, तसेच हे आहे. ‘पहिल्यांदा आकलन होण्यासाठी प्रयत्न, नंतर कृती करण्यासाठी प्रयत्न आणि त्यानंतर त्याची कृती योग्य होण्यासाठी प्रयत्न करणे’, असा विचार असतो. त्याला आकलन होईपर्यंत सांगत रहायचे. त्यासाठी नवीन उदाहरण शोधायचे. देवाच्या कृपेने मी कधी हतबल होत नाही.
६. साधकाला साहाय्य करण्यासाठी त्याच्या संपर्कातील साधक आणि कुटुंबीय यांना संपर्क करून त्यांच्याविषयी विचारून त्यांना साहाय्य करणे
मी : काही साधकांना त्यांच्या अडचणी सांगता येत नाहीत, तेव्हा त्यांना कसे साहाय्य करता ?
सद़्गुरु दादा : प्रत्येकाला मनातील सर्व विचार मांडता येत नाहीत आणि साधकांना स्वतःचे अहंचे पैलू लक्षात येत नाहीत. त्या वेळी ‘साधकांना साहाय्य करणे आवश्यक आहे’, हे लक्षात येते. अशा वेळी त्या साधकाला साहाय्य करण्यासाठी त्याच्या संपर्कातील साधक आणि कुटुंबीय यांना संपर्क करून त्यांच्याविषयी विचारून घेतो. साधक संपर्कात आले की, त्यांच्या अहंचे पैलू लक्षात येतात. अशा वेळी त्यांच्या कुटुंबियांना विचारून घेतो; कारण प्रसंग सांगितला की, अहंचा पैलू समजून सांगणे सोपे जाते. साधक कुटुंबीय किंवा सेवेशी संबंधित साधक यांना प्रसंग विचारल्यावर तीव्रता लक्षात येते. ते सर्व प्रसंग सांगितले की, साधकालाही त्याच्या अहंच्या पैलूची तीव्रता लक्षात येते. अशा रितीने त्या साधकाला साहाय्य करण्याचा प्रयत्न करतो.
७. साधकांची चुकीची मानसिकता पालटण्यासाठी प्रयत्न करणे
व्यष्टी आढाव्यामध्ये मी साधकांच्या चुकीच्या मानसिकतेवरच अधिक आघात करतो. चुकीची मानसिकता पालटली की, ५० टक्के पालट तेथेच होतो. यातून पूर्ण निराश झालेल्या जीवनात हार पत्करलेल्या साधकांमध्येही पालट झालेले आहेत.
८. सद़्गुरु राजेंद्रदादांचा कृतज्ञताभाव !
‘साधकांसाठी काहीतरी करायला हवे’, असा विचारही देव देतो आणि तो पूर्ण होण्यासाठी सर्व पूरक परिस्थिती तोच निर्माण करतो. जुनी उदाहरणे किंवा वाचलेले प्रसंग साधकांना ज्या वेळी सांगणे आवश्यक असते, त्या वेळी ते मला आठवतात.’
– वैद्या सुश्री (कु.) माया पाटील, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (वर्ष २०२१)