पंढरपूर येथील श्री विठ्ठलाच्‍या गाभार्‍यातील ग्रॅनाईटच्‍या लाद्या हटवणार !

पंढरपूर (जिल्‍हा सोलापूर) – पंढरपूरच्‍या श्री विठ्ठल मंदिरातील विठ्ठल-रुक्‍मिणी गाभार्‍यातील ग्रॅनाईटच्‍या लाद्या श्री विठ्ठल मूर्तीला अपायकारक ठरत असल्‍यामुळे हटवण्‍यात येणार आहेत. ७३ कोटी रुपयांच्‍या आराखड्यातील पहिला टप्‍पा आषाढीवारीच्‍या पूर्वी पूर्ण करण्‍यात येणार आहे, असे मंदिर समितीचे अध्‍यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी सांगितले.

विठ्ठल मंदिर गाभार्‍यात लावण्‍यात आलेल्‍या या लाद्यांमुळे गाभार्‍यात उष्‍णता वाढून श्री विठ्ठलाच्‍या मूर्तीची झीज होत असल्‍याचे पुरातत्‍व विभागाने सांगितले होते; मात्र अनेक वर्षे यावर कोणतेही काम करण्‍यात आले नाही. याविषयी नुकतीच मंदिर समितीची बैठक पार पडली. या बैठकीत हा निर्णय झाला असल्‍याची माहिती मंदिर समितीकडून देण्‍यात आली. श्री विठ्ठल मंदिराला ७०० वर्षांपूर्वीचे मूळ रूप देण्‍यासाठी सिद्ध करण्‍यात आलेल्‍या ७३ कोटी रुपयांच्‍या आराखड्याचे काम चालू करतांना पहिल्‍या टप्‍प्‍यात विठ्ठल रुक्‍मिणी यांचे गाभारे, चौखांबी, सोळखांबी याला मूळ रूप दिले जाणार आहे. गाभार्‍यात अधिकाधिक हवा खेळती ठेवण्‍यासाठी मूळ मंदिरात जी उपाययोजना होती, तीच पुन्‍हा पूर्ववत् केली जाणार असल्‍याचे औसेकर यांनी सांगितले.