पिंपरी येथे पार पडत आहे १८ वे जागतिक मराठी संमेलन !
पिंपरी – जागतिक मराठी अकादमी आणि डॉ. डी.वाय. पाटील विद्यापीठ, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने ६ ते ८ जानेवारी २०२३ या कालावधीत ‘शोध मराठी मनाचा’ हे १८ वे जागतिक मराठी संमेलन आयोजित केले आहे. डॉ. डी.वाय. पाटील विद्यापीठ प्रेक्षागृह, संत तुकारामनगर, पिंपरी येथे हे ३ दिवसांचे संमेलन होणार आहे. संमेलनाचे अध्यक्षस्थान राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य आणि ज्येष्ठ साहित्यिक डॉ. ज्ञानेश्वर मुळे भूषवणार असून संमेलनाचे स्वागताध्यक्ष डॉ. डी.वाय. पाटील विद्यापिठाचे कुलपती डॉ. पी.डी. पाटील हे आहेत. या संमेलनामध्ये आजी माजी राजकीय नेते, चित्रपट, नाट्य, कला, साहित्य, कृषी, शिक्षण आणि आरोग्य आदी क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणारे भारतीय मान्यवर, तसेच विविध देशांतील मराठी मान्यवर सहभागी होणार आहेत.
या वेळी ज्येष्ठ उद्योजक आणि प्राज इंडस्ट्रीजचे संस्थापक डॉ. प्रमोद चौधरी यांना ‘जागतिक मराठी भूषण पुरस्कार २०२३’ आणि जेष्ठ अभिनेते मोहन आगाशे यांना ‘विवा चॅरिटेबल ट्रस्ट वसई’च्या वतीने ‘जागतिक मराठी गौरव’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्नेहल दामले करणार आहेत, अशी माहिती जागतिक मराठी अकादमीचे अध्यक्ष रामदास फुटाणे यांनी दिली.