सर्वत्रच्या वाहनचालकांसाठी महत्त्वाची माहिती !
‘जगभरात वाहनांचे अपघात होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामध्ये वाहनांचे ‘टायर’ फुटून अपघात होणे, हेसुद्धा एक कारण आहे. हे टाळण्यासाठी वाहनाचा वेग नियंत्रित ठेवणे, ‘टायर’मध्ये योग्य प्रमाणात हवा असणे आणि वाहनांच्या ‘टायर’ची योग्य ती काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. ‘टायर’ फुटण्यामागील कारणे आणि ‘टायर’ची काळजी कशी घेऊ शकतो ?’ या संदर्भातील मार्गदर्शक सूत्रे पुढे दिली आहेत.
१. वाहनांचे ‘टायर’ फुटण्यामागील कारणे
१ अ. वाहनचालकांनी वेगमर्यादेचे पालन न करणे : ‘अतीवेगाने वाहने चालवणे’ हे ‘टायर’ फुटण्याचे मुख्य कारण आहे. अनेकदा अपघातानंतर ‘संबंधित वाहनचालक पुष्कळ वेगात वाहन चालवत होता’, असे प्रत्यक्षदर्शी सांगतात. त्यामुळे वाहनचालकांनी वेगमर्यादेचे पालन करणे अत्यावश्यक आहे.
२. ‘टायर’ फुटू नयेत, यासाठी घ्यावयाची काळजी
२ अ. ‘आय.एस्.आय.’ मार्क असलेले ‘टायर’ वापरावेत ! : सध्या बाजारात ‘चायना मेड टायर’ उपलब्ध आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने हे ‘टायर’ मजबूत आणि टिकाऊ नसतात. या ‘टायर’चे मूल्य अल्प असल्याने बरेच वाहनचालक हे ‘टायर’ वापरतात; मात्र ‘आय्.एस्.आय्.’ मार्क असलेले ‘टायर’ वापरणे आवश्यक आहे.
२ आ. वाहनातील हवा तपासण्याच्या संदर्भात : सध्या बहुतेक पेट्रोल पंपांवर ‘डिजिटल’ यंत्रे (मशिन्स) उपलब्ध आहेत. अशा ‘डिजिटल मशिन’वर हवा तपासावी. प्रवासाला निघाल्यानंतर ५ किलोमीटर अंतर जाण्यापूर्वीच हवा तपासायला हवी. तेव्हा ‘टायर’मधील हवा थंड असल्याने ‘इंडिकेटर’ हवेचे प्रमाण योग्य दाखवते. काही जण प्रवासाला निघाल्यानंतर ३० ते ४० किलोमीटर अंतर पार झाल्यावर हवा तपासतात. तेव्हा ‘टायर’मधील हवा गरम झालेली असते.
२ इ. ‘टायर’ ‘पंक्चर’ झाल्यास व्यवस्थित ‘पंक्चर’ काढावे ! : सध्या बहुतेक वाहनांना ‘ट्यूबलेस टायर’ असतात. हे ‘टायर पंक्चर’ झाल्यावर त्यातील हवा लगेचच न्यून होत नाही. ‘टायर’ला लहानसे छिद्र पडल्यास ८ ते १० दिवसांनंतरही ‘टायर’ची हवा अल्प होत नाही. ‘ट्यूब’ असलेले टायर पंक्चर झाल्यास गाडी चालू स्थितीत असल्यास हालते (झटका मारते.) किंवा चालू करतांनाही ती हालते. त्या वेळी लगेच ‘टायर’ तपासावेत.
अनेकदा ‘टायर’ पूर्ण न उघडता वरवर ‘पंक्चर’ काढले जाते. असे न करता ‘टायर’ काढूनच ‘पंक्चर’ काढायला हवे.
२ ई. विनावापर असलेले वाहन आठवड्यातून १० ते २० किलोमीटर चालवणे : काही वाहने अनेक दिवस वापरली जात नाहीत. त्यामुळे टायर कडक होतो आणि नंतर त्यावर सुरकुत्या येतात. असे वाहन प्रवासाला नेतांना त्याचे ‘टायर’ फुटण्याचा धोका वाढतो. त्यामुळे अल्प वापर असणारी वाहने आठवड्यातून १० ते २० किलोमीटर अंतरापर्यंत चालवावीत. यामुळे ‘टायर’चे आयुष्य वाढते आणि अपघातही टाळता येतात.
२ उ. ‘टायर’चे आयुष्य संपल्यानंतर ते त्वरित पालटणे आवश्यक ! : प्रत्येक ‘टायर’वर ‘ट्रेड वेअर इंडिकेटर’ (TWI) असते. या ‘इंडिकेटर’पर्यंत ‘टायर’ घासले गेल्यास त्याचे आयुष्य संपलेले असते; पण काही वाहनचालक त्या ‘इंडिकेटर’च्या खाली घासेपर्यंत ‘टायर’ वापरतात. ‘टायर’च्या तारा दिसत असल्या, तरीही ते ‘टायर’ पालटत नाहीत. अशा चुकांमुळे अपघातांचे प्रमाण वाढते. वाहनचालकाचे ‘ट्रेड वेअर इंडिकेटर’कडे सतत लक्ष असायला हवे. भाडेकराराने घेतलेल्या वाहनाचे ‘टायर’ प्रवासाला निघण्यापूर्वी तपासून घ्यावे.
वाहनचालकहो, वाहनांच्या ‘टायर’ची योग्य ती काळजी घेऊन सुरक्षितरित्या प्रवास करा !’ (२९.१२.२०२२)