स्त्रियांनी कपाळावर कुंकू लावल्याने त्यांना आध्यात्मिक स्तरावरील लाभ होणे
‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ने ‘यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ उपकरणाद्वारे केलेली वैज्ञानिक चाचणी
‘कुंकू हे पावित्र्याचे आणि मांगल्याचे प्रतीक आहे. कुंकवामध्ये देवतेचे चैतन्य ग्रहण अन् प्रक्षेपण करण्याची क्षमता आहे. स्त्रियांनी स्वतःच्या भ्रूमध्यावर (कपाळावर) अनामिकेने (करंगळीच्या बाजूच्या बोटाने) कुंकू लावावे. ‘स्त्रियांनी कपाळावर कुंकू लावल्याने त्यांना आध्यात्मिकदृष्ट्या काय लाभ होतो ?’, हे विज्ञानाद्वारे अभ्यासण्यासाठी ‘यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ या उपकरणाद्वारे चाचणी करण्यात आली. या चाचणीतील निरीक्षणांचे विवेचन आणि अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण पुढे दिले आहे.
१. चाचणीतील निरीक्षणांचे विवेचन
या चाचणीत आध्यात्मिक त्रास असलेल्या २ साधिका आणि आध्यात्मिक त्रास नसलेल्या २ साधिका यांनी कपाळावर कुंकू लावण्यापूर्वी अन् कुंकू लावल्यानंतर त्यांच्या ‘यू.ए.एस्.’ उपकरणाद्वारे चाचण्या करण्यात आल्या.
१ अ. कपाळावर कुंकू लावल्याने आध्यात्मिक त्रास असलेल्या आणि नसलेल्या साधिका यांच्यावर सकारात्मक परिणाम होणे : हे पुढे दिलेल्या सारणीतून लक्षात येते.
बाजूच्या सारणीतून पुढील सूत्रे लक्षात येतात.
१. कुंकवामध्ये नकारात्मक ऊर्जा काहीच नसून पुष्कळ प्रमाणात सकारात्मक ऊर्जा आहे.
२. कुंकू लावल्यानंतर आध्यात्मिक त्रास असलेल्या दोन्ही साधिकांतील नकारात्मक ऊर्जा अल्प किंवा नाहीशी होऊन त्यांच्यातील सकारात्मक ऊर्जा वाढली.
३. आध्यात्मिक त्रास नसलेल्या दोन्ही साधिकांमध्ये नकारात्मक ऊर्जा आढळली नाही. कुंकू लावल्यानंतर त्यांच्यातील सकारात्मक ऊर्जा पुष्कळ वाढली.
२. निष्कर्ष
स्त्रियांनी कपाळावर कुंकू लावल्याने त्यांना आध्यात्मिक स्तरावरील लाभ होतात.
३. चाचणीतील निरीक्षणांचे अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण
३ अ. स्त्रियांनी कपाळावर कुंकू लावल्याने त्यांच्याभोवती संरक्षक-कवच निर्माण होऊन त्यांचे वाईट शक्तींपासून रक्षण होणे : कुंकवातून प्रक्षेपित होणार्या तारक-मारक चैतन्यामुळे वाईट शक्तींना स्त्रियांच्या आज्ञाचक्रातून शरिरात प्रवेश करण्यात अडथळा निर्माण होतो. कुंकवामुळे स्त्रियांच्या भोवती चैतन्याचे कवच निर्माण होत असल्याने त्यांचे वाईट शक्तींपासून रक्षण होते.
३ आ. कुंकवातील चैतन्यामुळे आध्यात्मिक त्रास असलेल्या साधिकांतील नकारात्मक ऊर्जा अल्प किंवा नाहीशी होऊन त्यांच्यातील सकारात्मक ऊर्जेत वाढ होणे : या दोन्ही साधिकांनी कपाळावर कुंकू लावल्याने त्यांना चैतन्य मिळाले. त्यामुळे त्यांंच्या भोवतीचे त्रासदायक स्पंदनांचे आवरण अल्प किंवा नाहीसे होऊन त्यांची सात्त्विकता वाढली.
३ इ. कुंकवातील चैतन्यामुळे आध्यात्मिक त्रास नसलेल्या साधिकांतील सकारात्मक ऊर्जेत पुष्कळ वाढ होणे : या दोन्ही साधिकांनी कपाळावर कुंकू लावल्याने त्यांना चैतन्य मिळाले. त्यामुळे त्यांची सात्त्विकता पुष्कळ वाढली.
स्त्रियांनी कपाळावर कुंकू लावल्याने त्यांना आध्यात्मिक स्तरावरील लाभ होतात, हे यातून सिद्ध झाले.’
– सौ. मधुरा धनंजय कर्वे, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (२७.१२.२०२२)
ई-मेल : mav.research2014@gmail.com
कुंकू लावल्यामुळे स्त्रियांना होणारा आध्यात्मिक लाभ ते लावण्यास विरोध करणारे जाणून घेतील का ? |
वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत. |