नूतन इंग्रजी वर्षाचे उत्सवगान कि आधुनिकांचे मद्यपान ?
देहलीतील धक्कादायक अंजली मृत्यू प्रकरण
३१ डिसेंबरच्या रात्री नवीन इंग्रजी वर्षाच्या मेजवानीनंतर १ जानेवारी २०२३ या दिवशीच्या पहाटे, देहलीतील सुलतानपुरी भागात अंजली नामक युवती कारचे चाक आणि बोनेट यांमध्ये अडकली होती अन् सलग १२ किलोमीटरपर्यंत ओढली गेली होती. ती ओढली जात असतांना तिच्या देहाच्या मागील बाजूस आग लागली. तिच्या देहाचा मागचा भाग छिन्नविच्छिन्न झाला होता. तिचे अवयव रस्त्यावर इकडे तिकडे विखुरलेले होते. तिची शरिराची सर्व हाडे जवळपास मोडली होती. एवढे रक्त सांडलेले होते की, मृतदेह सापडला, तेव्हा शरिरात रक्ताचा थेंबही नव्हता. ही संतापजनक घटना ऐकून संपूर्ण देश हादरला. एवढेच नव्हे, तर देहलीतील अंजली मृत्यू प्रकरणात जे नवे खुलासे होत आहेत, ते धक्कादायक आहेत.
हे कोणत्या प्रकारचे इंग्रजी नवीन वर्षाचे उत्सवगान आहे, ज्यामध्ये ‘शराब’ (मद्य), ‘कबाब’ (मांसाहार) आणि ‘शबाब’ (यौवन) आवश्यक आहेत अन् आधुनिकतेचे प्रतीक मानली जाणारी ही कोणती हास्यास्पद संस्कृती आहे.
१. ३१ डिसेंबरच्या मध्यरात्री मद्यपी युवकांनी काय केले ?
सध्या प्रतिदिन जे या मृत्यू प्रकरणात खुलासे होत आहेत, ते भीषण आहेत. मृत युवती अंजली हिने तिची मैत्रीण निधीसमवेत देहलीतील एका हॉटेलमध्ये खोली (ओयो रूम) आरक्षित केली होती. हॉटेलची खोली रात्री ७ वाजता आरक्षित केली गेली. मध्यरात्री १२ च्या सुमारास या दोघींचे दोन पुरुष मित्र हॉटेलच्या खोलीत आले. यानंतर दोन्ही मुलींमध्ये मोठ्या आवाजात भांडण झाले. हॉटेल व्यवस्थापक आणि कर्मचारी यांनी दिलेल्या माहितीनुसार दोन्ही मुली म्हणजेच निधी अन् मृत युवती अंजली या पुष्कळ दारूच्या नशेत होत्या. त्यांना भांडताना आणि आई-बहिणीच्या नावाने अश्लाघ्य शिवीगाळ करतांना पाहून हॉटेलच्या कर्मचार्यांनी दोघींना हॉटेलमधून बाहेर काढले. हॉटेलच्या बाहेर येऊनही दोन्ही मुली रस्त्यावर भांडत राहिल्या; पण नंतर अंजली तिच्या स्कूटीवर निघून गेली. त्यावेळी निधीही तिच्या मागे बसली होती.
सध्या समोर आलेल्या घटनेच्या माहितीनुसार स्कूटीवर असलेल्या मद्यधुंद अंजली आणि निधी यांचा ‘बलेनो’ कारसमवेत अपघात झाला. निधीला फारशी दुखापत झाली नाही आणि ती पळून गेली. या अपघातात बलेनो गाडीची चाके आणि बोनेट यांमध्ये अडकलेल्या अंजलीला १२ किलोमीटरपर्यंत ओढत नेण्यात आले. वाहनचालकांना अपघात होऊन आपल्या चाकात काही तरी अडकले आहे, याची कल्पनाच नव्हती ! अर्थात् अजून बरेच खुलासे व्हायचे आहेत. ज्या कारसमवेत हा अपघात झाला, त्या गाडीतील प्रवाशांशी अंजलीची कोणतीही पूर्वओळख नव्हती, हे स्पष्ट झाले आहे; मात्र घटनेच्या तपशीलात गेल्यास दोन्ही पक्ष म्हणजेच स्कूटीस्वार अंजली आणि कार चालवणारे युवक मद्यधुंद अवस्थेत होते, त्यामुळेच हा अपघात आणि भीषण मृत्यू झाल्याचे स्पष्ट होते. मद्याची धुंद युवकांना कुठल्या दिशेला घेऊन जात आहे, हे सांगणारी ही संतापजनक घटना आहे.
२. मृत्यूचे खरे गुन्हेगार कोण ?
दोन्ही पक्षांपैकी एकानेही मद्यपान टाळले असते, तर कदाचित अंजलीचा मृत्यू झाला नसता ! खरे तर असे बोलणे, हा आधुनिकतावाद्यांच्या राज्यात गुन्हा आहे. मद्यपान हा आधुनिकतावाद आहे. समकालीन सर्वच चित्रपट, दूरचित्रवाहिन्या, वृत्तपत्रे आदी माध्यमे मद्यपानाचे उदात्तीकरण करतात. अलीकडेच एका प्रथितयश मराठी वृत्तपत्रामध्ये एक लघुस्तंभ प्रसिद्ध झाला होते, त्याचे शीर्षक होते, ‘मद्यपान केल्यानंतर तोंडाला वास येऊ नये, यासाठी युवकांनी घ्यावयाची दक्षता !’ प्रसारमाध्यमे खरोखरच कुठले समाजप्रबोधन करत आहेत ? याविषयी जाब विचारणारी एकही ‘सरकारी यंत्रणा’ या देशात नाही ! याउलट दुर्भाग्याने आपल्या देशात दारूची प्रथा बंद करण्याऐवजी दारूपासून लाभ कमावण्याची ‘सरकारी’ संस्कृती आहे. बिहार आणि गुजरात राज्यांत केवळ नाममात्र ‘दारूबंदी’ आहे. खरोखर ‘राजा कालस्य कारणम् ।’ या वचनानुसार प्रशासनच मद्यप्यांच्या राज्याला आणि त्यांच्या मृत्यूंना कारणीभूत आहे ! जेव्हा सामाजिक संस्था इंग्रजी नववर्ष साजरे करण्यास आणि दारू पिण्यास नकार देतात, तेव्हा या संघटनांना ‘परंपरावादी’ म्हणून हिणवले जाते; पण संस्कृतीचा अभाव, म्हणजेच विकृती हे गुन्हेगारीचे प्रमुख कारण असते. त्याकडे कुणीही लक्ष द्यायला सिद्ध नाही.
सरकारने दारूमधून म्हणजेच जीर्ण झालेल्या जुन्या मॉडेलमधून लाभ गोळा करण्याची सवय सोडली पाहिजे. अंजलीचा मृत्यू हे तिच्या कर्माचे फळ आहे ? कि सरकार प्रायोजित मद्यसंस्कृतीचे फळ आहे ? याचा शोध देशबांधणीच्या गप्पा मारणार्यांनी घेतला पाहिजे !
– श्री. चेतन राजहंस, राष्ट्रीय प्रवक्ते, सनातन संस्था. (५.१.२०२२)