‘पीपल्स अँटी फॅसिस्ट फ्रंट’ या आतंकवादी संघटनेवर केंद्र सरकारकडून बंदी !
नवी देहली – केंद्रीय गृहमंत्रालयाने जम्मू-काश्मीरमध्ये आतंकवादी कारवायांमध्ये गुंतलेल्या ‘पीपल्स अँटी फॅसिस्ट फ्रंट’ (पी.ए.एफ्.एफ्.) या संघटनेसह तिच्या उपशाखा असलेल्या इतर संघटनांवरही बंदी घातली आहे. या संघटनांना ‘अवैध कारवाया प्रतिबंधक कायदा (यूएपीए ), १९६७’ च्या अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे. ‘पीपल्स अँटी फॅसिस्ट फ्रंट’ ही आतंकवादी संघटना ‘जैश-ए-महंमद’ची उपशाखा म्हणून ओळखली जाते.
Centre bans People’s Anti-Fascist Front, a proxy of #JaisheMohammed https://t.co/NczjV28GBO
— The Tribune (@thetribunechd) January 7, 2023
‘पीपल्स अँटी फॅसिस्ट फ्रंट’ ही संघटना नियमितपणे भारतीय सुरक्षादल, राजकीय नेते, तसेच जम्मू-काश्मीरमध्ये काम करणारे इतर राज्यांतील लोक यांना धमक्या देत होती. या संघटनेचा जम्मू-काश्मीर, तसेच भारतातील इतर प्रमुख शहरे येथे आतंकवादी कृत्ये घडवून आणण्याच्या कटात हात आहे. ती तरुणांना बंदुका, दारूगोळा आणि स्फोटके हाताळण्याचे प्रशिक्षण देत होती’, अशी माहिती गृहमंत्रालयाने दिली.
काही दिवसांपूर्वीच केंद्र सरकारने ‘लष्कर-ए-तोयबा’ची उपशाखा असलेल्या ‘टी.आर्.एफ्.’ या आतंकवादी संघटनेवर बंदी घातली होती.