शंकराचार्य माधव आश्रम मंदिरातील शिवलिंगालही गेले तडे !

जोशीमठ (उत्तराखंड) येथील भूस्खलन !

डेहराडून (उत्तराखंड) – येथील जोशीमठ क्षेत्रात भूस्खलन होत असल्याने ६०० कुटुंबांचे स्थलांतर करण्यात आले आहे. येथील प्राचीन ज्योतिर्मठ परिसरामधील घरांच्या भिंतींना तडे गेल्यानंतर येथील शंकराचार्य माधव आश्रम मंदिरातील शिवलिंगालाही तडे गेले आहेत. ज्योतिर्मठचे प्रमुख ब्रह्मचारी मुकुंदानंद यांनी सांगितले, ‘मठाचे प्रवेशद्वार, लक्ष्मीनारायण मंदिर आणि त्याचे सभागृह यांना तडे गेले आहेत.’ या परिसरातच तोटकाचार्य गुफा, त्रिपुर सुंदरी राजराजेश्‍वरी मंदिर आणि ज्योतिष पीठाच्या शंकराचार्य यांची गादी आहे.

ज्योतिष पीठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्‍वरानंद सरस्वती यांनी जोशीमठातील भूस्खलनाविषयी चिंता व्यक्त केली आहे. शंकराचार्य म्हणाले की, ज्योतिर्मठही या भूस्खलनाच्या संकटात सापडले आहे. सरकारने भूस्खलनामुळे बाधित होणार्‍यांना त्वरित साहाय्य करण्यासह त्यांच्या पुनर्वसनाची व्यवस्था केली पाहिजे. गेल्या वर्षभरापासून भूस्खलनाचे संकेत मिळत असतांना त्याच वेळी त्याकडे लक्ष देण्यात आले नाही.

भूस्खलनाला उत्तरदायी असणार्‍या बोगद्याचे काम बंद करण्याचा आदेश असतांनाही काम चालू !

जोशीमठ भागातील भूस्खलनामुळे ५६१ घरांना तडे गेले आहेत. त्यांचे स्थलांतर करण्यात येणार आहे. या भूस्खलनामागील अनेक कारणांपैकी एक कारण असणार्‍या येथील नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशनच्या जलविद्युत् प्रकल्पाच्या बोगद्याचे आणि ‘चार धाम ऑल-वेदर रोड’चे (हेलंग-मारवाडी बायपास) काम थांबवण्याचा आदेश देण्यात आला असला, तरी हे काम अद्याप थांबलेले नाही. येथे मोठमोठे यंत्र सातत्याने डोंगर खोदण्याचे काम करत आहेत. येथील परिस्थिती दिवसेंदिवस अधिक बिकट होत आहे. सुमारे ५० सहस्र लोकसंख्या असलेल्या या शहरात भीतीमुळे रात्रीच्या वेळी कडाक्याच्या थंडीतही लोकांना घर कोसळण्याच्या भीतीने घराबाहेर रहावे लागत आहे. प्रशासन आणि राज्य आपत्ती व्यवस्थापनाच्या अधिकार्‍यांसह तज्ञांच्या पथकाने जोशीमठमधील बाधित भागांचे घरोघरी जाऊन सर्वेक्षण चालू केले आहे.

मुख्यमंत्री पुष्कर धामी यांनी केला जोशीमठाचा दौरा !

उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर धामी यांनी ७ जानेवारी या दिवशी जोशीमठाचा दौरा केला. त्यांनी यापूर्वीच धोक्याचे क्षेत्र तातडीने रिकामे करण्याचे आणि बाधित कुटुंबांसाठी सुरक्षित ठिकाणी मोठे पुनर्वसन केंद्र बांधण्याचे आदेश दिले. ज्या कुटुंबांची घरे रहाण्यास योग्य नाहीत अशा कुटुंबांना सरकारने भाड्याच्या घरात जाण्यास सांगितले आहे. सरकार त्यांना प्रतिमहा ४ सहस्र रुपये भाडे देणार आहे.

कर्णप्रयाग येथेही भूस्खलन

राज्यातील कर्णप्रयाग येथील घरांनाही तडे जात असल्याचे समोर आले आहे. येथील बहुगुणानगर, सीएम्पी बँड आणि सब्जी मंडी या भागांत रहाणार्‍या ५० हून अधिक घरांना तडे गेले आहेत. यापूर्वी पावसाळ्यात येथे भूस्खलनाच्या घटना घडल्या होत्या.

येथील २५ घरांना २ फूट तडे गेले आहेत. त्यामुळे अनेकांनी घर सोडून स्थलांतर केले आहे; मात्र काही जणांना पर्याय नसल्याने ते भीतीच्या सावटाखाली येथे रहात आहेत.  या भागाचे तज्ञांकडून सर्वेक्षण करण्यात आले आहे. यावर उपाययोजना करण्याचाही प्रस्ताव बनवण्यात आला आहे. यासाठी निधी संमत झाल्यावर काम चालू होणार आहे.