प.पू. दास महाराज यांच्या भेटीनंतर आणि त्यांच्या सहस्रचंद्रदर्शन शांतीविधी सोहळ्याच्या वेळी एका साधिकेला आलेल्या अनुभूती अन् जाणवलेली सूत्रे
प.पू. दास महाराज यांच्या भेटीनंतर आणि त्यांच्या सहस्रचंद्रदर्शन शांतीविधी सोहळ्याच्या वेळी बेळगाव येथील ६२ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. शुभांगी कंग्राळकर यांना आलेल्या अनुभूती अन् जाणवलेली सूत्रे
‘वर्ष २०१५ मध्ये मारुतीच्या अंशरूपात धर्मकार्य करणार्या प.पू. दास महाराज यांच्याशी माझी प्रथम भेट झाली. त्यांची भेट झाल्यावर आणि वर्ष २०२१ मध्ये प.पू. दास महाराज यांचा ‘सहस्रचंद्रदर्शन शांतीविधी’ हा सोहळा अनुभवतांना मला आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.
१. कौटुंबिक आणि नोकरीतील अडथळे दूर होणे
प.पू. दास महाराज यांच्या भेटीनंतर माझ्या सेवानिवृत्तीतील अडथळे दूर झाले. माझा मुलगा श्री. स्वराज कंग्राळकर याच्या नोकरीधंद्यातील अडथळे दूर झाले आणि माझ्या मुलाचे लग्न ठरले.
२. परात्पर गुरु डॉ. आठवले, प.पू. दास महाराज आणि पू. (सौ.) माई (पू. (सौ.) लक्ष्मी नाईक, प.पू. दास महाराज यांच्या पत्नी) यांच्या कृपेने मुलाच्या लग्नातील अडथळे दूर होऊन लग्न निर्विघ्नपणे अन् आनंदात पार पडणे
माझ्या मुलाच्या लग्नामध्ये माझ्या सासर आणि माहेर येथील लोकांनी अडथळे आणण्याचा प्रयत्न केला; पण गुरुदेवांच्या (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या) रूपाने साक्षात् प्रभु रामचंद्र समवेत असतांना आणि मारुतिरायाचे अंश असलेल्या प.पू. दास महाराज यांची कृपा असतांना अडथळे कसे येणार ?
प.पू. दास महाराज यांनी लग्न निर्विघ्नपणे पार पडण्यासाठी प्रभु श्रीरामचंद्रांना साकडे (गार्हाणे) घातले. लग्न निर्विघ्नपणे पार पडले. सगळ्यांना वाटले, ‘मी हे सर्व एकटीनेच केले.’ त्यामुळे सर्व जण माझी पाठ थोपटून कौतुक करत होते; पण मला अंतर्मनात पूर्ण जाणीव होती, ‘ही सर्व अद़्भुत कृपा माझा भगवंत, गुरुमाऊली आणि या पती-पत्नी रूपात असलेल्या संतद्वयींची (प.पू. दास महाराज आणि पू. (सौ.) माई यांची) होती. ‘प.पू. दास महाराज अन् देवीरूप असलेल्या पू. माई यांच्या रूपात देव माझ्या पाठीशी उभा होता’, यात काही शंकाच नाही.
३. प.पू. दास महाराज यांच्या आध्यात्मिक सामर्थ्याची आलेली प्रचीती !
एकदा प.पू. दास महाराज यांनी माझ्या सुनेची नारळाने दृष्ट काढली. तिचा जो त्रास औषधाने न्यून होत नव्हता, तो प.पू. दास महाराज यांनी तिची नारळाने दृष्ट काढल्यावर न्यून झाला.
(‘दृष्ट काढणे’, हा एक आध्यात्मिक स्तरावरील उपाय आहे. येथे प.पू. दास महाराज यांच्यासारख्या मारुतीचे भक्त असलेल्या संतांनी दृष्ट काढली. त्यामुळे साधिकेच्या सुनेचा त्रास न्यून झाला. मनुष्याला होणार्या अनेक व्याधींमागे केवळ शारीरिक कारण नसून त्यामागे काही आध्यात्मिक कारणही असू शकते. दृष्ट काढल्यानंतर साधिकेच्या सुनेचा आध्यात्मिक स्तरावरील त्रास न्यून झाल्याने तिचा शारीरिक त्रासही न्यून झाला.’ – संकलक)
४. प.पू. दास महाराज यांच्या ‘सहस्रचंद्रदर्शन शांतीविधी’ सोहळ्याच्या वेळी जाणवलेली सूत्रे
४ अ. ‘न भूतो न भविष्यति ।’ असा झालेला सोहळा ! : २०.१२.२०२१ या दिवशी प.पू. दास महाराज यांचा झालेला ‘सहस्रचंद्रदर्शन शांतीविधी’ हा सोहळा झाला. हा सोहळा ‘न भूतो न भविष्यति ।’ म्हणजे ‘पूर्वी कधी झाले नाही आणि पुढे कधी होणार नाही.’ असा होता. तेव्हा मला परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अमृत महोत्सवी जन्मोत्सव सोहळ्याची (७५ व्या वाढदिवसाची) आठवण झाली. मला हा सोहळा ‘याची देही, याची डोळा’ अनुभवण्याचे भाग्य मिळाले. मी कृतकृत्य झाले.
४ आ. मंडप, सजावट, रांगोळी आणि सर्व नियोजन पाहून साधकांचे अपार परिश्रम, त्यांची साधना आणि भाव-भक्ती लक्षात आली.
४ इ. संतदर्शन : पुष्कळ वर्षांनी मला सद़्गुरु सत्यवान कदम यांचे दर्शन झाले. मी पू. (श्रीमती) सुमन मावशींनाही भेटले. थोडा वेळ का असेना, देवाने मला हा दुर्लभ संतसहवास घडवला. ही माझी पुण्याईच आहे !
४ ई. वर्ष २०१७ मधील परात्पर गुरु डॉक्टरांच्या तुलाभार सोहळ्याप्रमाणेच प.पू. दास महाराज यांचा तुलाभार सोहळाही अपूर्व होणे : वर्ष २०१७ मधील परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अमृत महोत्सव सोहळ्याच्या वेळी केलेला तुलाभार हा साक्षात् रामकाळात नेणारा होता. प.पू. दास महाराज यांचा तुलाभार पहातांना ‘देव (परात्पर गुरु डॉक्टर) आपल्या भक्ताची हौसही स्वतःची हौस म्हणून कशी पार पाडतो ? कशातही उणे पडू देत नाही’, हे माझ्या लक्षात आले.
४ उ. अवीट गोडीच्या महाप्रसादाने तृप्तता अनुभवणे : संत आणि गुरु यांच्या कृपेने मला तेथे महाप्रसाद मिळाला. अवीट गोडीच्या या महाप्रसादाने मला आध्यात्मिक स्तरावरील लाभ झाला आणि मी तृप्तता अनुभवली. ‘असा महाप्रसाद लाभणे’, हे ही नशिबी असावे लागते.
४ ऊ. आनंद आणि शांती देणारा सोहळा : हा सोहळा शांततेत आणि संथ गतीने चालू होता. कुठेही गडबड नाही कि गोंधळ नाही. तो भाव आणि चैतन्य यांच्या स्तरावर होत होता. हा सोहळा डोळ्यांचे पारणे फेडणारा आणि आनंद अन् शांती यांचा अनुभव देणारा होता. ‘असा हा देवदुर्लभ सोहळा आम्हाला अनुभवण्यास दिला’, यासाठी मी परात्पर गुरु डॉक्टर आणि संतद्वयी यांची शतशः ऋणी आहे.
‘हे भगवंता, हे गुरुमाऊली, आमच्यावर तुमची अपार कृपा आहे. मला प.पू. दास महाराज आणि पू. माई माझ्या घरातील वडीलधारी व्यक्ती वाटतात. हे आपलेपण आणि हे नाते बाहेरच्या जगात मिळणार नाही. भगवंता, यांच्या सहवासात या जन्माचे सार्थक झाल्याचे महत्भाग्य तूच मला देत आहेस. कृतज्ञता !’
– सौ. शुभांगी कंग्राळकर (वय ६७ वर्षे), बेळगाव, कर्नाटक. (२३.१२.२०२१)
या अंकात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |