सातारा येथील श्री नटराज मंदिरात वार्षिक रथोत्सव उत्साहात संपन्न !
सातारा, ६ जानेवारी (वार्ता.) – येथील श्री श्री उत्तर चिदंबरम नटराज मंदिराचा वार्षिक रथोत्सव ५ जानेवारी या दिवशी मोठ्या उत्साहात आणि धार्मिक वातावरणात पार पडला.
जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, सातारा विभागाचे साहाय्यक धर्मादाय आयुक्त सौ. ढबाले आणि इतर मान्यवर यांच्या हस्ते रथपूजन झाले. वेदमूर्ती दत्तात्रय शास्त्री जोशी आणि वेदमूर्ती जगदीश भट यांच्या मार्गदर्शनाखाली रथपूजन झाल्यानंतर मिरवणुकीला प्रारंभ झाला. रथाच्या अग्रभागी डोक्यावर पाण्याचे कलश आणि श्रीफळ घेऊन ५१ सुवासिनींनी स्तोत्र आणि मंत्र यांचे पठण केले. शिंग, तुतार्या, सनई, चौघडे आणि भजनांच्या सुमधुर संगीतामध्ये रथ शहराच्या दिशेने मार्गस्थ झाला. रथयात्रा बाँबे रेस्टॉरंट चौक, जिल्हा परिषद अध्यक्ष निवासस्थान, श्री साईबाबा मंदिर गोडोलीमार्गे शिवतीर्थावर आली. तेथून पुढे शाहू चौक, राजपथमार्गे मोती चौक, राजवाडा येथे भाविकांना दर्शनासाठी काही काळ विसावली. पुढे मोती चौक, शेटे चौक, पोलीस मुख्यालयमार्गे शिवतीर्थ, श्री कुबेर गणपति, जिल्हा पोलीस अधीक्षक निवासस्थान, विश्रामभवनमार्गे रथयात्रा सायंकाळी श्री नटराज मंदिरात पोचली. सायंकाळी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये महामंगल आरती झाली.
रथयात्रा शहरातील देवी चौक येथे आल्यानंतर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने श्री नटराज आणि शिवकामसुंदरी देवींचे औक्षण करण्यात आले. या वेळी हिंदु जनजागृती समितीच्या सौ. रूपाली महाडिक, सौ. दयावती साबळे, सौ. छाया जाधव, श्री. हेमंत सोनवणे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.