लाखो भाविकांच्या उपस्थितीत श्रीक्षेत्र पाल (जिल्हा सातारा) येथे श्री खंडेराया आणि श्री म्हाळसादेवी यांचा विवाह सोहळा पार पडला !
सातारा, ६ जानेवारी (वार्ता.) – महाराष्ट्रासह कर्नाटक आणि आंध्रप्रदेश या राज्यांतील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या कराड तालुक्यातील श्री क्षेत्र पाल येथील यात्रा पार पडली. लाखो भाविकांच्या उपस्थितीत श्री खंडेराया आणि श्री म्हाळसादेवी यांचा विवाह सोहळा ‘येळकोट येळकोट जय मल्हार’, ‘सदानंदाचा येळकोट’, ‘खंडोबाच्या नावानं चांगभलं’, या जयघोषांमध्ये पार पडला. गोरज मुहूर्तावर झालेल्या या शाही विवाह सोहळ्यास लाखो भाविक उपस्थित होते.
श्री खंडेराया आणि श्री म्हाळसादेवी यांच्या शाही विवाह सोहळ्यासाठी राज्यासह परराज्यातून आलेले मानकरी, मानाच्या सासनकाठ्या, मानाचे गाडे, पालख्या यांसह दुपारी २ वाजता देवाची शाही मिरवणूक निघाली. नंतर देवाचे मुख्य मानकरी देवराज पाटील यांचे रथातून मंदिरात आगमन झाले. मंदिरातील सर्व धार्मिक विधी पार पडल्यानंतर दुपारी ४ वाजता देवराज पाटील देवाला पोटाला बांधून अंधार दरवाज्याजवळ आले आणि रथामध्ये विराजमान होऊन मुख्य मिरवणुकीला प्रारंभ झाला. या वेळी भंडारा-खोबरे उधळण्यासाठी भाविकांनी प्रचंड गर्दी केली. मिरवणूक तारळी नदीपात्रातून मारुति मंदिर मार्गे बोहल्याजवळ आली. देव मंडपात आल्यानंतर मानकरी देवराज पाटील यांनी देवाला बोहल्यावर चढवले आणि पारंपरिक पद्धतीने लाखो भाविकांच्या साक्षीने श्री खंडेराया आणि श्री म्हाळसादेवी यांचा विवाह सोहळा थाटात पार पडला.