अन्‍नपदार्थ बनवतांना अन्‍नपदार्थ बनवणार्‍या व्‍यक्‍तीतील स्‍वभावदोषांचा आणि तिच्‍या मनःस्‍थितीचा अन्‍नपदार्थांवर होणारा परिणाम

अन्‍नपदार्थ बनवतांना अन्‍नपदार्थ बनवणार्‍या व्‍यक्‍तीतील स्‍वभावदोषांचा आणि तिच्‍या मनःस्‍थितीचा परिणाम अन्‍नपदार्थांवर होऊन अन्‍नपदार्थांमध्‍ये त्रासदायक स्‍पंदने येणे

श्री. अपूर्व ढगे

१. पंचतारांकित उपाहारगृहाच्‍या स्‍वयंपाकघरातील कुशल आचार्‍याने चांगले पदार्थ बनवणे; पण ते बनवत असतांना त्‍याची चिडचिड होणे

‘मी एका पंचतारांकित उपाहारगृहात काम करत होतो. तेथे पुष्‍कळ लोक जेवायला यायचे. तेथे अनेक भारतीय आणि विदेशी पदार्थ बनवण्‍यासाठी आचारी (शेफ) होते. आचार्‍यांना पुष्‍कळ पदार्थ बनवावे लागत असत.

तेथील एक आचारी चांगले आणि स्‍वादिष्‍ट पदार्थ बनवत असत; पण पदार्थ बनवतांना बर्‍याच वेळा ते अपशब्‍द बोलत असत. उपाहारगृहात ‘मेनूकार्ड’ (उपाहारगृहात मिळणार्‍या पदार्थांची सूची) प्रमाणे काही ठरलेले पदार्थ मिळतात. त्‍या व्‍यतिरिक्‍त कुणी वेगळे पदार्थ मागवल्‍यास त्‍या आचार्‍यांची पुष्‍कळ चिडचिड होत असे. ते आचारी पदार्थ बनवतांना पुष्‍कळ बोलत असत. पदार्थ पटलावर (काउंटरवर) ठेवतांना ते म्‍हणायचे, ‘‘गेस्‍ट’ (उपाहारगृहात जेवायला आलेल्‍या व्‍यक्‍ती) ये खाके मर जाना चाहिए ।’’

२. आचार्‍यांनी अपशब्‍द वापरत स्‍वयंपाक केल्‍याने अन्‍नपदार्थांमध्‍ये त्रासदायक स्‍पंदने येणे, उपाहारगृहाच्‍या व्‍यवस्‍थापकांनी अशा आचार्‍यांकडे लक्ष ठेवणे आवश्‍यक असणे

मी त्‍या आचार्‍यांच्‍या शेजारीच उभा राहून काम करत असे. मला त्‍यांचे बोलणे ऐकून पुष्‍कळ वाईट वाटायचे आणि त्रास होत असे. त्‍यांनी बनवलेल्‍या पदार्थाकडे नुसते बघितले, तरीही मला पुष्‍कळ त्रासदायक स्‍पंदने जाणवायची. ‘त्‍याचे नुसते बोलणे ऐकूनच मला इतका त्रास व्‍हायचा, तर त्‍यांनी बनवलेले अन्‍नपदार्थ खाणार्‍या व्‍यक्‍तींवर त्‍याचा किती वाईट परिणाम होत असेल ?’, याचा विचारही करवत नाही. ‘प्रत्‍येक उपाहारगृहात असे होत असेल किंवा तेथे पदार्थ बनवणार्‍यांकडून वाईट बोलणे होत असेल’, असे नाही; पण ज्‍या ठिकाणी मी काम केले आहे, त्‍या बर्‍याच ठिकाणी मला अशा प्रकारचा अनुभव आला आहे. उपाहारगृहाच्‍या व्‍यवस्‍थापकांनी ‘आचारी अन्‍नपदार्थ बनवतांना कसे वागतात आणि बोलतात ?’, याकडे लक्ष द्यायला हवे’, असे वाटते.

३. घरी नामजप करत स्‍वयंपाक बनवल्‍यास अन्‍नग्रहण करणार्‍या व्‍यक्‍तींना लाभ होत असणे

घरी ‘आपण मनापासून आणि शांत चित्ताने स्‍वयंपाक करत आहोत ना ?’, हे पहायला हवे. आपण नामजप करत जेवण बनवल्‍यास आपल्‍याला आणि अन्‍नपदार्थ ग्रहण करणार्‍या व्‍यक्‍तींना लाभ होतो. स्‍वयंपाक करणार्‍या प्रत्‍येक व्‍यक्‍तीने मन स्‍थिर ठेवण्‍यासाठी प्रयत्न करायला हवेत.’

– श्री. अपूर्व ढगे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२८.१०.२०२२)

• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक