कुटुंबियांचे एकमेकांशी पटणे किंवा न पटणे, हे त्यांच्यातील स्वभावदोष, अहं, पूर्वजांचा त्रास आणि प्रारब्ध यांवर अवलंबून असणे
कुटुंबियांचे एकमेकांशी पटणे किंवा न पटणे, हे त्यांच्यातील स्वभावदोष, अहं, पूर्वजांचा त्रास आणि प्रारब्ध यांवर अवलंबून असल्यामुळे साधकांनी स्थिर राहून साधना करणे आवश्यक असणे
‘मागील ५ – ७ वर्षांपासून आम्ही दोघे पूर्णवेळ साधना करत आहोत. पूर्णवेळ साधना करण्यासाठी आम्हा दोघांच्याही कुटुंबांतून काही जणांचा अल्पाधिक विरोध होता किंवा अजून त्यांना ते रुचलेले नाही. आम्ही दोघांनीही पूर्णवेळ साधना करण्याचा निर्णय घेतला, तेव्हा आम्ही दोघेही चांगल्या पदावर नोकरी करत होतो. तेव्हापासून दोघांच्याही कुटुंबियांना, ‘आम्ही व्यवहार आणि कुटुंबीय यांना सांभाळून साधना करायला हवी’, असे वाटते. आम्हा दोघांच्या घरची आर्थिक अन् सामाजिक परिस्थिती भिन्न आहे. आमच्या कुटुंबियांचे एकमेकांशी पटत नाही, तसेच दोघांच्याही कुटुंबियांना अन्य कौटुंबिक समस्याही भेडसावत आहेत. ‘या परिस्थितीकडे आध्यात्मिक दृष्टीने पाहून साधनारत कसे रहायचे ?’, हे एकमेकांशी बोलतांना श्री गुरूंनी आमच्या लक्षात आणून दिले आणि त्यांनीच आमच्याकडून तसे प्रयत्न करवून घेतले, त्याबद्दल आम्ही कृतज्ञतापूर्वक हे लिखाण श्री गुरुचरणी अर्पण करत आहोत.
१. कुटुंबियांविषयी असलेली विवंचना आणि त्यांना होणारा आध्यात्मिक त्रास यांमुळे साधकांच्या साधनेत अडथळा निर्माण होणे; पण एकमेकांशी बोलल्याने स्थिर रहाता येणे
मागील १ – २ मासात आमच्या (मी आणि माझे आध्यात्मिक मित्र यांच्या) कुटुंबियांच्या शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक त्रासांत वाढ झाली आहे. आम्हा दोघांच्या घरची आर्थिक परिस्थिती भिन्न असली, तरी ‘कुटुंबियांविषयी असलेली विवंचना आणि त्यांना होणारा आध्यात्मिक त्रास’, यांमुळे आमच्या साधनेत अडथळा निर्माण झाला आहे’, हेे देवाने आमच्या लक्षात आणून दिले. याविषयी एकमेकांशी बोलल्यामुळे आम्हाला या परिस्थितीत स्थिर रहाता आले.
२. कुटुंबियांच्या साधकाकडून असलेल्या अपेक्षा
२ अ. दोघांपैकी एकाचे कुटुंबीय सधन असूनही त्यांचे एकमेकांशी न पटल्याने ते वेगळे रहाणे आणि ‘कुटुंबियांनी एकत्र रहावे’, यासाठी ‘साधकाने प्रयत्न करावे’, अशी त्यांची अपेक्षा असणे : आम्हा दोघांपैकी एकाच्या घरची आर्थिक स्थिती चांगली असून मोठी घरे, गाडी, असे सर्वकाही आहे; परंतु कुटुंबियांचे एकमेकांशी पटत नसल्यामुळे ते वेगळे रहातात. ‘त्यांच्यातील कटुता दूर होऊन सर्वांनी एकत्र रहावे’, यासाठी ‘साधकाने प्रयत्न करावे’, अशी कुटुंबियांची अपेक्षा असते.
२ आ. दोघांपैकी एकाच्या घरची कठीण आर्थिक स्थिती आणि आध्यात्मिक त्रास यांमुळे कुटुंबियांचे एकमेकांशी न पटणे अन् ‘साधकाने घरी राहून त्यांचा सांभाळ करून साधना करावी’, अशी त्यांची अपेक्षा असणे : याउलट दुसर्या साधकाच्या घरची आर्थिक स्थिती नाजूक आहे. ते आर्थिक संकटातून जात आहेत. कुटुंबियांंचे आजारपण, तीव्र आध्यात्मिक त्रास आणि एकमेकांशी असलेले मतभेद, यामुळे ते दुःखी आहेत. त्यामुळे ‘साधकाने घरी राहून त्यांचा सांभाळ करत साधना करावी’, असे त्यांना वाटते.
३. देवाने सुचवलेले विचार !
३ अ. आर्थिक स्थिती कशीही असली, तरी कुटुंबियांचे स्वभावदोष, अहं, एकमेकांशी असलेले देवाण-घेवाण आणि पूर्वजांचा त्रास यांमुळे त्यांचे एकमेकांशी न पटणे : घरातील परिस्थितीविषयी आम्ही दोघे एकमेकांशी बोलतांना ‘आर्थिकदृष्ट्या सुबत्ता किंवा आर्थिक विवंचना असणे’, या भिन्न परिस्थितीतही ‘कुटुंबियांचे एकमेकांशी न पटणे, इतरांकडून अपेक्षा ठेवून स्वतःला त्रास करून घेणे’, हे त्यांचे देवाण-घेवाण, प्रारब्धभोग, त्यांच्यामध्ये असलेले स्वभावदोष, अहं आणि पूर्वजांचा त्रास यांवर अवलंबून आहे’, असे देवाच्या कृपेने आमच्या लक्षात आले.
३ आ. समोर आलेली परिस्थिती स्वीकारून स्थिर राहून साधनेचे प्रयत्न केल्यास आपत्काळात साधक स्थिर राहून साधना करू शकणे : ‘आम्ही साधकांनी कुटुंबियांच्या व्यावहारिक किंवा भौतिक सुविधा यांचा विचार न करता गुरुदेवांना शरण जाऊन ‘साधनेसाठी पूरक कृती कशी करता येईल ? कुठल्याही स्थितीत मन स्थिर आणि खंबीर कसे राहील ?’, यांकडे लक्ष दिल्यास साधक येणार्या आपत्काळामध्ये स्थिर राहून गुरुदेवांना अपेक्षित असे साधनेचे प्रयत्न करू शकतील’, असे देवाच्या कृपेने आमच्या लक्षात आले.
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी हे लक्षात आणून देऊन आमच्याकडून तसे प्रयत्न करून घेतल्याबद्दल त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’
– आपल्या चरणी एकरूप होण्यासाठी आतुर असलेले,
दोन आध्यात्मिक मित्र, महाराष्ट्र (२०.११.२०२२)
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |