पू. (श्रीमती) निर्मला दातेआजी वयाच्या ८९ व्या वर्षी रुग्णाईत झाल्यावर दाते कुटुंबियांनी अनुभवलेली अपार गुरुकृपा !
पू. (श्रीमती) निर्मला दातेआजी (सनातनच्या ४८ व्या व्यष्टी संत) वयाच्या ८९ व्या वर्षी रुग्णाईत झाल्यावर दाते कुटुंबियांनी अनुभवलेली अपार गुरुकृपा !
‘वर्ष २०२२ च्या ऑक्टोबर मासात पू. (श्रीमती) निर्मला दातेआजी (सनातनच्या ४८ व्या व्यष्टी संत, वय ८९ वर्षे) आणि आम्ही कुटुंबीय (मोठा मुलगा श्री. नरेंद्र (आध्यात्मिक पातळी ६४ टक्के), मोठी सून सौ. ज्योती (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के), धाकटा मुलगा श्री. निरंजन आणि धाकटी सून सौ. नेहा पुण्याला घरी गेलो होतो. २२.१०.२०२२ या दिवशी अकस्मात् सकाळी उठल्यावर पू. आजींना बोलता येईना, तसेच ‘काय होत आहे ?’, हे त्यांना सांगताही येत नव्हते.
१. पू. दातेआजींचे बोलणे अकस्मात् बंद झाल्यामुळे त्यांना तपासणीसाठी रुग्णालयात नेतांना त्या गाडीपर्यंत आणि रुग्णालयात नेल्यावर उद़्वाहनातून जाऊ शकणे
आधुनिक वैद्यांना पू. आजींना अकस्मात् बोलता न येण्याविषयी सांगितल्यावर त्यांनी पू. आजींची ‘एम्.आर्.आय.’ (MRI) चाचणी करायला सांगितली. त्यासाठी चारचाकीपर्यंत चालत जाणे आणि नंतर उद़्वाहनामधून जाणे, या कृती देवानेच त्यांच्याकडून करून घेतल्या. ‘एम.आर.आय.’ चाचणीमध्ये ‘मेंदूत पूर्वी रक्तस्त्राव झाला आहे’, असे कळले. लगेचच त्यांच्यावर वैद्यकीय उपचार चालू केले.
२. संतांची अनुभवलेली अपार कृपा !
२ अ. पू. आजींची स्थिती रामनाथी (गोवा) येथे सद़्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांना कळवल्यानंतर त्यांनी लगेचच त्यांच्यासाठी नामजप करण्यास आरंभ केला.
२ आ. श्रीसत्शक्ती (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी भ्रमणभाषवरून पू. आजींना ‘नारायण, नारायण’, असा नामजप करायला सांगून तो म्हणून दाखवायला सांगितल्यावर दिवसभरात प्रथमच पू. आजींनी तो नामजप म्हणून दाखवणे : आरंभी पू. आजींच्या स्थितीत पुष्कळशी सुधारणा झाली नाही. सायंकाळी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ पू. आजींशी भ्रमणभाषवर बोलल्या. त्या पू. आजींना म्हणाल्या, ‘‘नारायण, नारायण,’ असा नामजप करा आणि आता मला हा नामजप म्हणून दाखवा.’’ तेव्हा पू. आजींनी ‘नारायण, नारायण’, असा नामजप ७ – ८ वेळा सुस्पष्टपणे केला. तेव्हा आम्हा सर्वांची पुष्कळ भावजागृती झाली. भगवंताच्या कृपेने दिवसभरात प्रथमच त्या बोलल्या. त्यानंतर हळूहळू पू. आजींना बोलता येऊ लागले आणि १२ घंट्यांतच त्या व्यवस्थित बोलू लागल्या.
३. गुरुदेवांच्या (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या) कृपेने पू. आजींची प्रकृती सुधारली आणि ३१.१०.२०२२ या दिवशी विमान प्रवास करून त्या रामनाथी आश्रमात येऊ शकल्या.
४. रामनाथी आश्रमात आल्यावर काही दिवसांनी पू. आजींना पुन्हा बोलता न येणे, तेव्हा एका संतांनी त्यांना पहायला येऊन कुटुंबियांना एक नामजप अखंड करायला सांगणे
१९.११.२०२२ या दिवशी रामनाथी आश्रमात असतांना पू. आजींना पुन्हा बोलता येईना. लगेचच त्यांच्यावर औषधोपचार चालू केले; पण त्यांची स्थिती सुधारत नव्हती. त्यांना पुष्कळ अशक्तपणा जाणवत होता. त्यांना अन्न गिळता येत नव्हते आणि काही समजतही नव्हते; म्हणून त्यांना रुग्णालयात न्यायचा निर्णय झाल्यावर एक संत त्यांना भेटण्यासाठी आले. त्यांनी
पू. आजींसाठी नामजपादी उपाय करून ‘शरिरात कुठे अडथळा आहे ?’, ते सांगितले. त्यांनी पू. आजींकडून ‘ॐ’ आणि ‘श्री नारायणाय नमः’, असा एक आड एक नामजप करून घेतला; पण पू. आजींना नामजप म्हणायला जमत नव्हता; म्हणून संतांनी आम्हा कुटुंबियांना सांगितले, ‘‘थोडा वेळ एकाने, थोडा वेळ दुसर्याने, असे करून हा नामजप अखंड चालू ठेवा.’’ तेव्हा ‘भगवंत भक्तासाठी कसा धावून येतो ?’, हे आम्ही प्रत्यक्ष अनुभवले.
५. देवाची अनुभवलेली अपार कृपा !
अ. पू. आजींना ५ दिवस रुग्णालयात ठेवावे लागले. ज्या रुग्णालयामध्ये पू. आजींना ठेवले होते, त्या रुग्णालयामधील सनातनच्या एका साधिकेचे यजमान आधुनिक वैद्य राकेश देशमाने यांनी आम्हाला सर्व प्रकारे साहाय्य केले.
आ. आम्ही रुग्णालयात रहात असतांना स्थानिक साधकांनी आमच्या जेवणाची पुष्कळ चांगली व्यवस्था केली.
६. औषधोपचार आणि संतांनी सांगितलेले नामजप यांमुळे पू. आजींची प्रकृती लवकर सुधारणे
या सर्व कालावधीत पू. आजींच्या प्रकृतीची दैनंदिन स्थिती जाणून घेऊन ‘कोणता नामजप करायला हवा ?’, हे सद़्गुरु गाडगीळकाका आम्हाला कळवत होते. पू. आजींच्या मेंदूत रक्ताची गुठळी झाल्याने त्यांना त्रास होत होता. सद़्गुरु गाडगीळकाका ‘ती गुठळी आता कुठे सरकली आहे ?’, हे सूक्ष्मातून पाहून मुद्रा, न्यासस्थान आणि नामजप सांगत होते. आम्ही त्यांनी सांगितलेले आणि एका संतांनी सांगितलेले नामजप करत होतो, तशी पू. आजींच्या त्रासाची तीव्रता न्यून होत होती. आता पू. आजी बर्या होऊन पूर्वीप्रमाणे बोलू आणि चालू शकत आहेत. या प्रसंगात आम्ही जे अनुभवले ते अद़्भुत आणि दैवी आहे.
या सर्व समन्वयाच्या प्रक्रियेत साधकांनीही पुष्कळ तत्परतेने सेवा केली. संत आणि साधक यांच्या माध्यमातून आम्ही श्री गुरूंची अपार प्रीती अनुभवली.
७. कृतज्ञता
‘वयाच्या ८९ व्या वर्षी एवढ्या गंभीर रुग्णाइत होऊनही अल्प कालावधीत पुन्हा सुस्थितीत येणे’, ही केवळ आणि केवळ गुरुकृपाच आहे. ‘आमच्याकडून भगवंताला अपेक्षित असे साधनेचे प्रयत्न होत नसतांनाही त्याचे आमच्याकडे किती लक्ष आहे ? तोच सर्वकाही करून आम्हाला सांभाळत आहे’, हे क्षणोक्षणी आम्हाला अनुभवता आलेे. सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांची असीम प्रीती आणि कृपा, श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ अन् सद़्गुरु गाडगीळकाका यांच्या अपार कृपेनेच पू. आजींची प्रकृती सुधारली. याबद्दल सच्चिदानंद परब्रह्म गुरुमाऊलीच्या चरणी कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरी ती अल्पच आहे.’
– अत्यंत शरणागत भावाने श्री गुरुचरणी अर्पण, डॉ. नरेंद्र दाते, सौ. ज्योती नरेंद्र दाते, आणि श्री. विनायक (निरंजन) दाते, सौ. नेहा विनायक दाते, फोंडा, गोवा. (१२.१२.२०२२)
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |