जैन समाजाचे यश !
जैन समाजासाठी ५ जानेवारी २०२३ हा दिवस आनंदाचा ठरला. केंद्रशासनाच्या वतीने केंद्रीय पर्यावरणमंत्री भूपेंद्र यादव यांनी जैन समाजाचे तीर्थक्षेत्र असणार्या सम्मेद शिखरजी येथे पर्यटन किंवा ‘इको-टूरिझम’ यांवर बंदी घालण्याचे निर्देश दिले आहेत. यादव यांनी जैन समाजाच्या प्रतिनिधींसमवेत देहली येथे बैठक घेऊन ‘सम्मेद शिखरजीसह जैन समाजाच्या सर्व धार्मिक स्थळांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार त्यांच्या हक्कांचे संरक्षण आणि जतन करण्यासाठी कटीबद्ध आहे’, असे आश्वासन दिले. अर्थात् हे केवळ आश्वासन आहे. अजून हे स्थळ जैन समाजाचे तीर्थस्थळ म्हणून १०० टक्के घोषित करण्यात आलेले नाही. त्यामुळे केंद्रशासनाचा निर्णय म्हणजे जैनांसाठी काही अंशी ठरलेले विजयी पाऊल म्हणावे लागेल. हा निर्णय घेतला; म्हणून अनेकांनी शासनाचे अभिनंदन केले. सम्मेद शिखरजी हे पर्यटनस्थळ होऊ नये, यासाठी जैन समाजाने इतके दिवस विविध माध्यमांतून निकराचा लढा दिला. पर्यटनस्थळाच्या मागणीला विरोध करण्यासाठी भारतात ठिकठिकाणी जैन समाजाला रस्त्यावर उतरावे लागले. त्यांनी आंदोलने, निदर्शने केली, तसेच भव्य मोर्चेही काढले. याचा परिणाम म्हणून सरकारला नमते घेऊन जैनांच्या बाजूने निर्णय घेणे भाग पडले. अर्थात् सरकारने हा निर्णय वेळीच घेतला असता, तर एका जैन मुनींना प्राणत्याग करण्यापासून वाचवता आले असते. २० तीर्थंकरांना या ठिकाणी साधना करून निर्वाण म्हणजे मोक्षप्राप्ती झाली. त्यामुळे जैनांसाठी हे तीर्थस्थळ अतिशय पवित्र आहे. अशा पवित्र ठिकाणाला पर्यटनस्थळ करण्याची घाई सरकारने का केली ? पर्यटनाच्या माध्यमातून विकासाचे स्वप्न अवश्य बाळगावे; पण त्यात कुणाच्याही धार्मिक भावना दुखावल्या जाऊ नयेत, याची काळजी घेण्याचे दायित्व सरकारचे आहे.
हिंदूंनो, जैनांकडून शिका !
‘सरकारचा हा निर्णय म्हणजे रडणार्या एखाद्या लहान मुलाच्या हातात चॉकलेट देऊन त्याला गप्प बसवल्यासारखे आहे. जोपर्यंत सम्मेद शिखरजीला तीर्थस्थळ म्हणून कायमस्वरूपीसाठी घोषित करण्यात येत नाही, तोपर्यंत आमचा लढा चालूच रहाणार आहे. आम्ही शांत बसणार नाही’, असे जैन समाजाचे म्हणणे आहे. जैन समाज अल्पसंतुष्ट नाही. त्यामुळेच सरकारच्या या निर्णयामुळे तो हुरळून गेला नाही. हिंदूंनी हीच गोष्ट त्याच्याकडून शिकायला हवी. ‘केवळ प्रतापगडावरील अतिक्रमण हटवल्याने अल्पसंतुष्ट न रहाता सर्वच गडदुर्गांवरील अतिक्रमणे हटवण्यासाठी सिद्ध व्हा’, ‘वक्फ कायद्याच्या तरतुदी आणि त्या माध्यमातून वक्फ बोर्डाला मिळालेले अमर्याद अधिकार पहाता हिंदूंनी बेसावध राहून चालणार नाही. हिंदूंनी अल्पसंतुष्ट न रहाता ‘वक्फ कायदा’ रहित होईपर्यंत वैध मार्गाने संघटितपणे लढा चालू ठेवायला हवा’, असे हिंदूंना सतत सांगत रहावे लागते. अयोध्येत राममंदिराची उभारणी १ जानेवारी २०२४ पर्यंत पूर्ण होणार आहे; पण ‘देशातील पुढील ५०-१०० वर्षांत मुसलमानांचे राज्य आल्यावर राममंदिर तोडून पुन्हा मशीद बांधली जाईल !’ या ‘ऑल इंडिया इमाम असोसिएशन’चे अध्यक्ष मौलाना साजिद रशिदी यांच्या वक्तव्याच्या विरोधात संघटित व्हायला हवे का ?’, याचा गांभीर्याने विचार हिंदूंनी करायला हवा.
भारतात हिंदूंच्या तुलनेत जैनांची संख्या अल्प असतांनाही त्यांच्या संघटनापुढे काही प्रमाणात का होईना, सरकारला माघार घ्यावी लागते, हेच त्यांच्या संघटनाचे सामर्थ्य आहे. संघटन आणि धर्मनिष्ठा असेल, तर धर्मरक्षण करणे शक्य होते. या दोन्ही गोष्टी आज दुर्दैवाने हिंदूंकडे नाहीत. संघटनासाठी वेळ नाही आणि धर्मनिष्ठेसाठी धर्मशिक्षणच घेतलेले नाही. त्यामुळे हिंदू दिशाहीन झाले आहेत. जैन समाजामधील अनेक जण तरुण वयात मोहमाया आणि शिक्षण यांचा त्याग करून संन्यास किंवा दीक्षा घेतात. अशांना एकही जैन ना विरोध करतो, ना त्यांच्यावर टीकाटिपणी केली जाते. अशा तरुणांना डोक्यावर घेऊन त्यांचा कौतुक सोहळा आयोजित केला जातो; पण हिंदूंच्या संदर्भात उलटच घडते. ‘धर्माच्या मार्गाने जाणे म्हणजे शुद्ध वेडेपणा आहे’, अशा स्वरूपात हिंदूंची टर उडवली जाते. अशाने धर्मनिष्ठा कशी रुजणार ? जैन धर्मियांच्या व्रताचरणातसुद्धा ही निष्ठा दिसून येते. हिंदू केवळ म्हणतात, ‘मी हिंदु आहे.’ प्रत्यक्षात हिंदु म्हणून करावयाच्या कर्तव्यांची त्यांना जाण नसते. स्वतःचेही रक्षण करण्यास असमर्थ असणारे हिंदू धार्मिक प्रतिकांविषयी तितके संवेदनशील कुठे असणार ? हिंदूंच्या अशा स्थितीचा परिणाम हिंदु धर्माच्या अस्तित्वावर होत आहे, हे वास्तव हिंदूंनी लक्षात घ्यायला हवे. सरकारच्या कह्यात गेलेली सर्व मंदिरे भक्तांच्या कह्यात येईपर्यंत सर्वत्रच्या हिंदूंनी मोठा लढा उभारण्याची वेळ आली आहे.
हिंदूंचे संघटन भव्य हवे !
जैनांची धार्मिक स्थळे, त्यांचे हक्क यांचे संरक्षण आणि जतन करणार असल्याचे सरकारने म्हटले आहे; पण ‘असे आश्वासन आम्हाला कधी मिळणार ?’, याची प्रतीक्षा प्रत्येकच हिंदूला आहे. सम्मेद शिखरजी येथे दारू, अमली पदार्थ आणि इतर मादक किंवा मांसाहारी पदार्थांची विक्री, तसेच मोठ्या आवाजात संगीत, पाळीव प्राण्यांसह प्रवेश, अनधिकृत कॅम्पिंग आणि ट्रेकिंग यांवर, तसेच जलस्रोत, वनस्पती, खडक, गुहा आणि मंदिरे यांची हानी करणार्या सर्वच कामांवर बंदी घालण्यात येणार आहे, असे सरकारने सांगितले आहे. मग याच गोष्टी हिंदूंच्या पवित्र स्थळांच्या संदर्भात का लागू केल्या जात नाहीत ? हिंदूंच्या अनेक देवस्थानांच्या ठिकाणी मद्यमांस विक्रीची दुकाने सर्रास थाटली जातात. काही ठिकाणी तर अस्वच्छतेची परिसीमाच गाठली जाते. यांवर बंदी घालून सरकारने हिंदूंनाही लवकरात लवकर आश्वस्त करावे. मंदिरे, तीर्थक्षेत्रे, तसेच गडदुर्ग येथे होणारे अपप्रकार, तेथील अतिक्रमणे हे सर्व दूर करण्यासाठी धर्माविषयी जागरूक असणारे काही हिंदू कृतीशील होत आहेत; पण धर्मरक्षणासाठी तुटपुंजे नव्हे, तर हिंदूंचे भव्य संघटन अपेक्षित आहे. हे भव्य संघटनच हिंदु राष्ट्राची वाट सुकर करेल, हे निश्चित !
धार्मिक स्थळे आणि त्यांचे हक्क यांच्या संरक्षणाचे आश्वासन केंद्र सरकार जैनांप्रमाणे हिंदूंना कधी देणार ? |