‘तमिळनाडू’, ‘मानस सरोवर’ आणि अन्य शब्द
सनातनचे संस्कृतवर आधारलेले नाविन्यपूर्ण मराठी व्याकरण !
‘संस्कृत भाषेपासून मराठी, हिंदी, गुजराती आदी भाषांची निर्मिती झाली. या संस्कृतोद़्भव भाषांच्या व्याकरणाचा पाया साहजिकच भाषाजननी संस्कृतचे व्याकरण हाच राहिला. परिणामी या भाषांचे व्याकरण शिकण्यासाठी संस्कृतचे व्याकरण ठाऊक असणे अनिवार्य बनले. आधुनिक काळात इंग्रजीच्या आक्रमणामुळे नव्या पिढीला संस्कृतवर आधारित स्वभाषेचे व्याकरण शिकणे अवघड बनले. या पार्श्वभूमीवर या लेखमालेमध्ये मराठीची स्वायत्तता आणि तिचे संस्कृतशी असलेले आध्यात्मिक नाते जपत व्याकरणाचे नियम मांडण्यात आले आहेत.
३१ डिसेंबर २०२२ या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘हत्या’, ‘पिंडी’ आणि ‘पिंड’ यांतील भेद अन् काही शब्दांची स्त्रीलिंगी रूपे लिहिण्याची पद्धत’, यांविषयी माहिती पाहिली. आजच्या लेखात आणखी काही शब्दांच्या व्याकरणाविषयी जाणून घेऊ.
(लेखांक १६ – भाग ६)
(टीप : ‘विविध शब्दांचे व्याकरण’ या विषयातील ‘२ अ’ ते ‘२ घ’ ही सूत्रे दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये यापूर्वी प्रसिद्ध करण्यात आलेल्या लेखांत देण्यात आली आहेत.)
२ च. ‘तामिळनाडू’ नव्हे, तर ‘तमिळनाडू’ हा शब्द योग्य असणे : ‘तमिळ’ ही भाषा आहे. ‘नाडू’ या शब्दाचा अर्थ ‘प्रदेश’ असा आहे. ‘ज्या प्रदेशात तमिळ भाषा बोलली जाते, तो प्रदेश म्हणजे ‘तमिळनाडू’. त्यामुळे ‘तामिळनाडू’ असे लिहिण्याऐवजी ‘तमिळनाडू’ असे लिहावे. याप्रमाणे अन्य काही शहरांची नावे लिहिण्याची अयोग्य आणि योग्य पद्धत पुढे दिली आहे.
२ छ. ‘तत्त्वन्यास विधी’ आणि ‘तत्त्वोत्तारण विधी’ : देवतेच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करतांना काही विधींद्वारे त्या मूर्तीमध्ये संबंधित देवतेचे तत्त्व चढवण्यात (आणण्यात) येते. या विधींना ‘तत्त्वन्यास विधी’ असे म्हणतात. काही प्रसंगी, विशेषतः श्री गणेशचतुर्थीचे व्रत पूर्ण झाल्यानंतर मूर्तीचे विसर्जन करण्यासाठी ती हालवण्यापूर्वी काही विधी करून तिच्यात स्थापित केलेले श्री गणेशतत्त्व उतरवण्यात येते. या विधींना ‘तत्त्वोत्तारण विधी’ असे म्हणतात. लेखकांना मंदिरांचे जीर्णोद्धार, त्यांतील जुन्या मूर्ती पालटून नवीन मूर्तींची प्रतिष्ठापना करणे, नूतन मंदिरांची स्थापना इत्यादी विविध विषयांवर लिहावे लागते. त्यासाठी हे दोन शब्द ठाऊक असणे आवश्यक आहे.
२ ज. ‘मान सरोवर’ हा प्रचलित, तर ‘मानस सरोवर’ हा योग्य शब्द असणे : अलीकडे विविध नियतकालिकांमध्ये प्रसिद्ध होणार्या लेखनात तिबेटमधील कैलास पर्वताच्या दक्षिणेस असलेल्या प्रसिद्ध ‘मानस सरोवरा’विषयी लिहितांना ‘मान सरोवर’ असा शब्द लिहिला जातो. वास्तविक ‘मान सरोवर’ हा ‘मानस सरोवर’ या शब्दाचे अपभ्रंशित रूप आहे. पुराणांमध्ये सर्वत्र ‘मानस सरोवर’ हा शब्द वापरलेला आहे. त्यामुळे आपणही ‘मानस सरोवर’ हा शब्द वापरावा.
२ झ. क्रियापदांची ‘करूयात’, ‘पाहूयात’ इत्यादी अयोग्य रूपे टाळून ‘करूया’, ‘पाहूया’ इत्यादी योग्य रूपे वापरणे : सध्या मराठी बोलणारे अनेक जण ‘करूयात’, ‘पाहूयात’, ‘घेऊयात’, ‘जाऊयात’, ‘थांबूयात’ इत्यादी व्याकरणदृष्ट्या योग्य नसलेली रूपे सर्रास वापरतांना आढळतात. दूरचित्रवाहिन्यांवरील वृत्तनिवेदक, मनोरंजन मालिकांमधील कलाकार इत्यादींच्या तोंडून अशी रूपे सातत्याने ऐकायला मिळतात. ही रूपे अयोग्य आहेत. या शब्दांना ‘त’ हे अक्षर जोडण्याची आवश्यकता नाही. हे शब्द ‘करूया’, ‘पाहूया’, ‘घेऊया’, ‘जाऊया’, ‘थांबूया’ या प्रकारे लिहावेत.’ (समाप्त)
– सुश्री (कुमारी) सुप्रिया शरद नवरंगे, एम्.ए. (मराठी), बी.एड., सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३.१.२०२३)