संभाजीराजे ‘धर्मवीर’ असल्याचे १०५ वर्षांपासूनचे पुरावे आहेत ! – विश्वास पाटील, लेखक आणि साहित्यिक
|
मुंबई – छत्रपती संभाजीराजांचा ‘धर्मवीर’ असाच उल्लेख होत असल्याचे १०५ वर्षांपासूनचे पुरावे आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी स्वतःच्या मालिकेसाठी ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ हे ‘विक्रीयोग्य शीर्षक’ (मार्केटेबल टायटल) वापरले आहे. त्याआधी या शब्दाचा कुठेही उल्लेख झालेला नाही. मतांच्या आशेने राजकारण पालटता येईल; पण सत्य इतिहास कुणालाही पालटता येणार नाही, असे परखड मत प्रसिद्ध साहित्यिक आणि ‘संभाजी’ या प्रसिद्ध कादंबरीचे लेखक विश्वास पाटील यांनी व्यक्त केेले.
छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाआधी ‘धर्मवीर’ उपाधी लावायची कि स्वराज्यरक्षक ?, यावरून महाराष्ट्रात वाद निर्माण झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी सर्वप्रथम ‘संभाजीराजे धर्मवीर नव्हे, तर स्वराज्यरक्षक होते’, असा दावा केला. त्याला भाजपसह हिंदुत्ववादी संघटनांनी तीव्र विरोध केला आहे.
लेखक विश्वास पाटील यांनी दिलेले पुरावेे –१. वर्ष १९१७ मध्ये नाटककार आणि कादंबरीकार नाथमाधव यांनी संभाजीराजे यांच्यावर ‘मराठ्यांचा आत्मयज्ञ’ हे नाटक लिहिले. त्यात सर्वप्रथम त्यांनी राजांसाठी ‘धर्मवीर’ या उपाधीचा उल्लेख केला आहे. २. वर्ष १९२९ मध्ये कृ.बा. भोसले यांनी ‘रक्तरंगण’ नाटक लिहिले. त्यातही त्यांनी संभाजीराजांचा ‘धर्मवीर’ उपाधीनेच सन्मानपूर्वक उल्लेख केला. ३. वर्ष १९२९ मध्ये प्रसिद्ध शाहीर पांडुरंग खाडिलकर यांनी ‘धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज’ या शीर्षकानेच पोवाडा लिहिला होता. तोही त्या काळी महाराष्ट्रातील गावागावांत गाजला. ४. वर्ष १९४१ मध्ये ग.कृ. बोडस यांनी ‘धर्मवीर संभाजी’ हे नाटक लिहिले. त्याचे गावागावांत प्रयोग झाले, तेव्हापासून राजांची ही उपाधी महाराष्ट्रभर पसरली. |