संभाजीनगर येथे स्वसंरक्षणासाठी इयत्ता ८ वी आणि ९ वीच्या विद्यार्थिनींना लाठीकाठीचे प्रशिक्षण !
शारदा मंदिर कन्या प्रशालेत विद्यार्थिनींचा स्वसंरक्षणासाठी पुढाकार !
संभाजीनगर – गेल्या काही मासांमध्ये विद्यार्थिनींविषयी घडणार्या शहरातील घटना पहाता मुलींना वाईट प्रसंगात विरोध करता यावा. त्यांनी वेळप्रसंगी स्वत:चे रक्षण स्वत: करावे, या उद्देशाने सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त शहरातील शारदा मंदिर कन्या प्रशालेत ३ जानेवारीपासून विद्यार्थिनींसाठी लाठी-काठी प्रशिक्षणास प्रारंभ करण्यात आला आहे.
मुलींना आता काळानुरूप शिक्षणासमवेत स्वत:चे रक्षण करण्याचे शिक्षण घेणे आवश्यक होत चालले आहे. सध्या शहरातील शालेय आणि महाविद्यालयीन मुलींच्या छेडछाडीच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आहेत.
१. विद्यार्थिनींना स्वसंरक्षणाचे महत्त्व पटवून त्यांना सक्षम बनवण्याच्या अनुषंगाने ‘जनहित कक्षाच्या विधी विभागा’चे उपशहरसंघटक अमित जयस्वाल आणि स्वामी समर्थ केंद्र, बजाजनगरचे किशोर पांढरे यांनी प्रायोगिक तत्त्वावर माध्यमिक शालेय विद्यार्थिनींसाठी कराटे, लाठीकाठी आणि दंडसाखळी यांचे प्रशिक्षण प्रशालेत चालू केले आहे.
२. यात इयत्ता ८ वी आणि ९ वीच्या ७० विद्यार्थिनींनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. लाठीकाठी आणि दंड साखळी यांचे प्रशिक्षण अत्यंत उत्साहाने घेतले. त्यांचा उत्साह पहाता शाळेच्या मुख्याध्यापिका डॉ. सविता मुळे आणि क्रीडा शिक्षिका हेमलता पवार यांनी ‘प्रशालेच्या सर्व मुलींना हे प्रशिक्षण देण्यात येईल’, असे सांगितले.
३. शिक्षिका वंदना रसाळ म्हणाल्या की, मुलींना सक्षम करणे आणि वेळप्रसंगी त्यांना प्रतिकार करता यावा. आपले संरक्षण स्वत:च करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम चालू करण्यात आला आहे. प्रत्येक वर्गाला १ मास हे प्रशिक्षण दिले जाणार आहे.