उत्तरप्रदेशात महाराष्ट्र भवनासाठी जागा देण्याचे योगी आदित्यनाथ यांचे आश्वासन !
मुंबई – उत्तरप्रदेश येथे १० ते १२ जानेवारी या कालावधीत होणार्या ‘ग्लोबल इन्व्हेस्टर समिट’साठी गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ मुंबईच्या दौर्यावर आले आहेत.
५ जानेवारी या दिवशी त्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उत्तरप्रदेशचे माजी राज्यपाल गणेश नाईक यांची भेट घेतली. या वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी योगी आदित्यनाथ यांना उत्तरप्रदेश येथे महाराष्ट्र भवनासाठी जागा उपलब्ध करून देण्याची विनंती केली. ही विनंती योगी आदित्यनाथ यांनी तत्त्वत: मान्य केली.
योगी आदित्यनाथ यांच्यासमवेत अभिनेते रवीकिशन असल्यामुळे मुंबईतील हिंदी चित्रपटसृष्टी उत्तरप्रदेश येथे नेण्याचा प्रयत्न होत असल्याची टीका विरोधकांकडून करण्यात येत आहे. यावर योगी आदित्यनाथ यांनी मुंबईतील एका कार्यक्रमात म्हटले की, मुंबई ही अर्थभूमी आहे आणि उत्तरप्रदेश ही धर्मभूमी आहे. या दोन्हींचा चांगला संगम होऊ शकतो. मुंबईतील चित्रपटसृष्टी आम्ही घेऊन जाणार नसून आमची वेगळी चित्रपटसृष्टी सिद्ध करत आहोत. उत्तरप्रदेशात १ सहस्र २०० एकर जागेवर चित्रपटसृष्टी सिद्ध करण्यात येत आहे. महाराष्ट्राने ५ ट्रिलियन डॉलरच्या अर्थव्यवस्थेचे लक्ष ठेवले आहे. त्यात उत्तरप्रदेश महत्त्वाचे योगदान देईल. उत्तरप्रदेशची अर्थव्यवस्था १ ट्रिलियन डॉलर होण्यासाठी आम्ही प्रयत्न करू, असे म्हटले. या दौर्यात योगी आदित्यनाथ ‘आदित्य बिर्ला समूहा’चे अध्यक्ष कुमार मंगलम बिर्ला, ‘पिरामल एंटरप्राइझ लिमिटेड’चे अध्यक्ष अजय पिरामल, ‘जे.एस्.डब्ल्यू. ग्रुप’चे व्यवस्थापकीय संचालक सज्जन जिंदाल, ‘टोरेंट पॉवर’चे व्यवस्थापकीय संचालक जिनल मेहता आणि ‘हिरानंदानी ग्रुप’चे मुख्य कार्यकारी अधिकारी दर्शन हिरानंदानी यांची भेट घेणार आहेत.