चित्रपट, मालिका आदींद्वारे होणारा धर्माचा अवमान रोखण्यासाठी ‘धर्म सेन्सॉर बोर्ड’ची स्थापना
द्वारका आणि ज्योतिष पीठाचे शंकराचार्य जगद्गुरु स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी केली स्थापना !
नवी देहली – चित्रपट, सामाजिक माध्यमे आणि दूरचित्रवाणी यांद्वारे होणारा हिंदूंच्या देवतांचा, धर्माचा अवमान रोखण्यासाठी आता ‘धर्म सेन्सॉर बोर्ड’ची स्थापना करण्यात आली आहे. द्वारका आणि ज्योतिष पीठाचे शंकराचार्य जगद्गुरु स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी याची स्थापना केली आहे. हे बोर्ड चित्रपटांतील धार्मिक गोष्टींवर लक्ष ठेवेल आणि त्यांना संमती देईल.
#DharmaCensorBoard: टीवी, ओटीटी और फ़िल्मों से जुड़े धार्मिक कंटेट की रिव्यू के लिए धर्म सेंसर बोर्ड का गठनhttps://t.co/hhKcko6mU9
— Hindi Filmibeat (@HindiFilmibeat) January 4, 2023
१. शंकराचार्य यांनी सांगितले की, काही मोजके लोक विविध माध्यमांतून जगभरातील कोट्यवधी प्रेक्षकांचे मनोरंजन करतात; मात्र यातून ते संस्कृती, परंपरा, धर्म आणि समाजातील संवेदनशील सूत्रांना ठेच पोचवतात. समाजात द्वेष पसरवतात; म्हणूनच लोकांच्या आग्रहास्तव आम्ही ‘धर्म सेन्सॉर बोर्ड’ स्थापन केले आहे, जे चित्रपट, मालिका आणि वेबसिरीज यातील दृश्ये, संवाद, कथा आदींवर लक्ष ठेवेल. जेणेकरून समाजात द्वेष परवणार्या गोष्टी कोट्यवधी लोकांपर्यंत पोचणार नाहीत.
२. याविषयी ‘उत्तरप्रदेश फिल्म डेव्हलपमेंट काऊन्सिल’चे उपाध्यक्ष तरुण राठी यांनी सांगितले, कोणताही चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी ‘धर्म सेन्सॉर बोर्ड’ त्यातील धार्मिक बाजू बघेल आणि मगच अशा चित्रपटांना संमती देईल. या बोर्डकडे तो अधिकार असेल. चित्रपट बनल्यानंतर जर त्यात धार्मिक भावना दुखावल्याचे आढळले, तर निर्मात्यांना चित्रपटात पालट करावे लागतील. कोट्यवधी रुपये खर्च करून जर चित्रपट तयार झाल्यानंतर पालट करावे लागणार असतील, तर यात निर्मात्यांचीच हानी आहे.
संपादकीय भूमिकाहिंदु धर्माचा अवमान रोखण्यासाठी पुढाकार घेतल्यासाठी शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांच्याविषयी कितीही कृतज्ञता व्यक्ती केली, तरी अल्पच ठरेल ! आता सर्वच संतांनी एकत्र येऊन धर्माचा होणारा अवमान कायमस्वरूपी रोखण्यासाठी सिद्ध झाले पाहिजे, असेच धर्मप्रेमी हिंदूंना वाटते ! |