कोपरगाव (नगर) येथील शिवभक्त अरविंद महाराज अनंतात विलीन !
सहस्रो भाविक आणि भक्त यांच्या उपस्थितीत शेवटचा निरोप
कोपरगाव (जिल्हा नगर) – येथील बालब्रह्मचारी शिवभक्त अरविंद महाराज यांचे २ जानेवारी या दिवशी दुपारी ३.२५ मिनिटांनी महानिर्वाण झाले. त्यांच्या पार्थिवावर ३ जानेवारीला दुपारी १ वाजता बाजारतळ भागातील श्री लक्ष्मीआई मंदिराजवळील मैदानात अंत्यसंस्कार करण्यात आले. सहस्रो भाविक आणि भक्त यांच्या उपस्थितीत साश्रू नयनांनी त्यांना शेवटचा निरोप देण्यात आला. अरविंद महाराजांचे बंधू दीपक नारायण नवाथे यांनी त्र्यंबकेश्वर येथील ब्रह्मवृंदांच्या वेदमंत्रोच्चारात पार्थिवाला मुखाग्नी दिला. महाराजांची अंत्ययात्रा सोमेश्वर महादेव देवस्थान कोपरगाव वेस येथून काढण्यात आली. त्यांच्या पार्थिवावर पुष्पहार अर्पण करून पुष्पवृष्टी करण्यात आली. या प्रसंगी परिसरातील संत, महंत, साधू, भक्तगण, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिवभक्त अरविंद महाराज यांचा परिचयबालब्रह्मचारी परमपूज्य शिवभक्त संत अरविंदजी महाराज (वय ७९ वर्षे) लक्ष्मीनगर येथे श्री. संदीप पवार यांच्या निवासस्थानी वास्तव्यास होते. अरविंद महाराजांचा जन्म वर्ष १९४४ मध्ये जबलपूरमध्ये झाला. त्यांनी नागपूर येथे ‘सायन्स कॉलेज’मधून बी.एस्.सी.चे शिक्षण घेतले. ‘मला देव कुठे भेटू शकेल का ?’, हा त्यांचा ध्यास होता. त्यामुळे ते वर्ष १९६४ मध्ये घराबाहेर पडले. त्यानंतर ते पुणे येथे आले. पहिल्यापासून धार्मिक आणि अध्यात्म यांची आवड असल्याने त्यांनी अनेक वेळा पुणे ते काशी पदयात्रा केल्या. त्यांची भगवान शंकरावर प्रचंड भक्ती असल्याने त्यांनी अनेकदा शिवमहापुराण वाचले असून भगवान शंकराविषयी अनेक हस्तलिखिते लिहिली आहेत. |