भाजपचे आमदार नीतेश राणे यांनी जितेंद्र आव्हाड यांना पाठवली औरंगजेबाने तोडलेल्या मंदिरांची सूची !
मुंबई – औरंगजेब क्रूर आणि हिंद्वद्वेषी नव्हता, हे पटवून देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ‘औरंगजेब क्रूर असता, तर त्याने विष्णूचे मंदिर तोडले असते’, असे विधान केले होते. यावर भाजपचे आमदार नीतेश राणे यांनी औरंगजेबाने पाडलेल्या हिंदूंच्या मंदिरांची सूची आमदार जितेंद्र आव्हाड यांना पाठवली आहे.
आमदार नीतेश राणे यांनी जितेंद्र आव्हाड यांच्या नावे हे पत्र लिहिले आहे. हे पत्र राणे यांनी ‘ट्वीट’ करून प्रसारित केले आहे. यामध्ये औरंगजेबाने पाडलेले सोमनाथ मंदिर, कृष्ण जन्मभूमी मंदिर, काशी विश्वनाथ मंदिर, विश्वेश्वर मंदिर, गोविंददेव मंदिर, विजय मंदिर, भीमादेवी मंदिर, मदन मोहन मंदिर, चौषष्ठ योगिनी मंदिर, एलोरो मंदिर, त्र्यंबकेश्वर मंदिर, नरसिंगपूर मंदिर आणि पंढरपूरचे विठ्ठल मंदिर अशी १३ मुख्य मंदिरांची नावे दिली आहेत. ‘औरंगजेबाने त्याच्या आयुष्यात अनेक लहान मंदिरेही तोडली; मात्र प्रामुख्याने मोठ्या मंदिरांची सूची देत आहे. मला खात्री आहे की, आपण हे तथ्य मोगलशाहीच्या आस्थेपोटी स्वीकारणार नाही’, असे राणे यांनी पत्रात नमूद केले आहे. या पत्रात नीतेश राणे यांनी लिहिले आहे की, आपण औरंगजेबाविषयी केलेले वक्तव्य स्वाभाविकच आहे. उभ्या आयुष्यात कधीही आमच्या हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधीवर एकदाही नतमस्तक झाले नाहीत. किंवा रायगडाच्या दिशेने कधी पाय वळले नाहीत यावरून आपली श्रद्धा औरंगजेबावर आहे, हे सिद्ध झाले.