‘गुरुदेवांची दत्तरूपात मानसपूजा करणे आणि दत्तगुरूंना प्रार्थना करणे’, हे प्रयत्न केल्याने साधिकेची तीव्र टाचदुखी न्यून होण्याच्या संदर्भात आलेली अनुभूती !
१. टाचदुखीच्या तीव्र वेदनांमुळे रडू येऊन मनात अनेक निरर्थक आणि नकारात्मक विचार येणे
‘गेल्या २ वर्षांपासून माझ्या पायांच्या टाचा दुखत आहेत. आरंभी हा त्रास अल्प होता; परंतु गेल्या ६ मासांत मला तीव्र वेदना होऊ लागल्या. खाली बसल्यानंतर मला लवकर उठून उभे रहाता येत नव्हते. तीव्र वेदनांमुळे मला रडू येत असे. या वेदनांमुळे ‘मी लंगडी होणार का ? मी उभ्याने सेवा केल्याने वेदना होत आहेत का ? आता मी सेवा कशी करणार ?’, असे अनेक निरर्थक आणि नकारात्मक विचार माझ्या मनात येऊ लागले.
२. घरी राहून विश्रांती घेऊनही टाचदुखी न थांबणे
काही दिवसांनी माझे जळगाव सेवाकेंद्रातून घरी जाण्याचे नियोजन झाले. ‘घरी गेल्यावर विश्रांती घेऊया आणि टाचेच्या वेदना थांबतात का ?’, ते बघूया’, असे मी ठरवले. मी अधिकोषाच्या कामांमुळे साधारण ३ मास घरी राहिले आणि विश्रांती घेतली, तरीसुद्धा टाचा दुखणे थांबले नाही. वेदनांची तीव्रता तेवढीच होती.
३. सद्गुरु नंदकुमार जाधव यांनी सांगितल्यानुसार नियमितपणे मानसपूजा करणे
जळगाव सेवाकेंद्रात आल्यावर मला सद्गुरु नंदकुमार जाधवकाका (वय ७० वर्षे) यांचा सत्संग मिळाला. त्या सत्संगात सद्गुरु काकांनी ‘मानसपूजा नियमित करायला पाहिजे’, असे सांगितले. त्याप्रमाणे मी गुरुदेवांची विविध रूपे डोळ्यांसमोर आणून नियमित मानसपूजा करत असे.
४. गुरुपौर्णिमेपासून गुरुदेवांची मानसपूजा दत्तरूपात होऊ लागणे आणि त्या वेळी ‘स्वतःचा एक हात श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ अन् दुसरा हात श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांचा आहे’, असा भाव ठेवल्याने आनंद मिळणे
गुरुपौर्णिमेच्या दिवशी दाखवण्यात आलेल्या ‘ऑनलाईन’ भावसोहळ्यामध्ये गुरुदेवांनी सर्व साधकांना दत्तरूपात दर्शन दिले. गुरुपौर्णिमेपासून माझ्याकडून गुरुदेवांची मानसपूजा दत्ताच्या रूपात आपोआप होऊ लागली. मानसपूजेच्या वेळी ‘माझा एक हात श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांचा आणि दुसरा हात श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांचा आहे’, असा भाव ठेवल्यामुळे मला पुष्कळ आनंद मिळू लागला. ‘या मानसपूजेचे चैतन्य दिवसभर टिकून रहाते’, असे मला जाणवू लागले.
५. मानसपूजेनंतर दिवसभर दत्तगुरूंना सर्व प्रकारचे त्रास दूर करण्यासाठी प्रार्थना करणे
त्यानंतर दिवसभर माझ्याकडून प्रार्थना होऊ लागल्या, ‘हे दत्तात्रेया, तू गुरुदेवांच्या रूपात प्रकटलेला आहेस. ज्याप्रमाणे भक्त प्रल्हाद सतत नारायणाला शरण जात असे, त्याप्रमाणे आम्ही सर्व साधक तुला शरण आलो आहोत. हे गुरुदत्ता, आमचे शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक, तसेच पूर्वजांचे त्रास दूर होऊ देत.’
६. ‘मानसपूजा आणि दत्तगुरूंना प्रार्थना करणे’, हे प्रयत्न ४ आठवडे नियमितपणे केल्याने टाचदुखी न्यून होणे
माझ्याकडून हे प्रयत्न ४ आठवडे नियमित होत होते. त्यानंतर मला माझ्या टाचांच्या वेदना पुष्कळ उणावल्याचे जाणवले. ‘टाचांच्या वेदना कशामुळे न्यून झाल्या ?’, असा प्रश्न मला पडला. त्या वेळी ‘मी दत्तरूपातील गुरुदेवांना गेले ४ आठवडे सतत प्रार्थना करत असल्याने माझ्या वेदना न्यून झाल्या आहेत’, असे माझ्या लक्षात आले.
७. ‘देवावर श्रद्धा असेल, तर आपले प्रारब्धही नष्ट होते’, हे या प्रसंगातून शिकायला मिळणे
या प्रसंगातून मला शिकायला मिळाले, ‘आपली हाक जर तळमळीची असेल, तर गुरुदेव खरोखरच धावून येतात. आपणच आपले स्वभावदोष आणि अहं यांच्या आहारी न जाता आणि कुठल्याही प्रसंगात न अडकता भगवंताला शरण गेले पाहिजे. कुठल्याही आजारपणात न अडकता ‘हे आपले प्रारब्ध आहे’, हे स्वीकारून श्रद्धेने प्रयत्न करत रहावे. ‘देवावर श्रद्धा असेल, तर आपले प्रारब्धही नष्ट होते.’
‘हे सर्व गुरुदेवांनी माझ्याकडून लिहून घेतले’, याविषयी मी गुरुदेवांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते.’
– सौ. रंजना नारायण काकड (आध्यात्मिक पातळी ६४ टक्के), जळगाव (१६.८.२०२२)
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |