आहार-विहारातील चुकीच्या सवयी सोडण्याचे महत्त्व
आरोग्याविषयी शंकानिरसन
प्रश्न
सुश्री (कु.) युवराज्ञी शिंदे : ‘अनेक वर्षे दिवसभरात अनेक वेळा खाऊनही काही अपाय होत नाही’, असे पुष्कळ जण आपल्या अवती भोवती पहायला मिळतात. तरीही आयुर्वेदामध्ये ‘दिवसातून दोन वेळाच खावे’, असे का सांगितले आहे ?
उत्तर
१. भगवंताने दिलेल्या शक्तीमुळे मानवी शरीर निरोगी राहू शकत असणे : ‘मानवी शरीर हे भगवंताने बनवलेले उत्तम आणि स्वयंचलित यंत्र आहे. ‘हे यंत्र १०० वर्षे काहीही त्रास न होता सुरळीत चालावे’, यासाठी बाह्य पालटांशी जुळवून घेण्याची शक्ती भगवंतानेच शरिरात निर्माण केली आहे. यामुळे कधीतरी होणार्या आहार-विहारातील चुकांचा शरिरावर सहसा वाईट परिणाम होतांना दिसत नाही. (‘विहार’ म्हणजे ‘स्वतःकडून घडणार्या विविध कृती’) या शक्तीमुळेच काही वेळा नियमित दारू, सिगारेट इत्यादी व्यसने असूनही आरोग्य उत्तम असणारी माणसे आपल्याला पहायला मिळतात. ही क्षमता ‘आनुवंशिकतेने चालत आलेली असते’, म्हणजे ‘एखाद्याचे आईवडील अत्यंत निरोगी आणि धडधाकट असतील, तर मुलेही तशीच पहायला मिळू शकतात.’
२. शक्तीच्या मर्यादा : असे असले, तरी या शक्तीच्याही मर्यादा आहेत. आहार-विहारातील चुका चालूच राहिल्या, तर कधी ना कधीतरी त्या शरिराला त्रास देणारच. शिशुपालाचे ९९ अपराध झाले, तरी त्याला काही झाले नाही; परंतु १०० वा अपराध घडताच भगवंताने त्याचे शिर धडावेगळे केले. असे आपल्या संदर्भातही होत असते. ‘सर्व काही चांगले चालू असतांना एकाएकी रक्तातील साखर वाढल्याचे समजते आणि मधुमेह झाल्याचे निदान होते. शरीर धडधाकट असतांनाही उच्च रक्तदाब चालू होतो. एकाएकी हृदयविकाराचा झटका येतो आणि जागच्या जागी प्राण जातो. अशी उदाहरणे आपण पाहिली किंवा ऐकली असतील. असे होऊनही काही जण जागे होत नाहीत आणि ‘मला काही होत नाही किंवा होणार नाही’, या विचाराने चुकीच्या कृती करतच रहातात.
३. आहार-विहारातील चुकांमुळे आयुष्यमान घटणे : मधुमेह, उच्च रक्तदाब इत्यादी विकार एकदा झाले की, जन्मभर ॲलोपॅथीच्या गोळ्या चालू रहातात. या गोळ्यांमुळे रोग मुळापासून बरा होत नाही. केवळ रोगाचे परिणाम आपल्याला जाणवत नाहीत आणि त्याची तीव्रता न्यून होते; परंतु यामुळे जे शरीर १०० वर्षे निरोगी रहायला हवे होते, ते झरत मरत कसेबसे ६० ते ७० वर्षे जगते. यावरून ‘मला काही होत नाही. मी वाट्टेल ते करीन’, असे म्हणणे निश्चितच शहाणपणाचे नाही’, हे लक्षात आले असेल.
४. शरीररूपी यंत्र आयुर्वेदरूपी माहितीपुस्तकात दिल्यानुसार चालवणे महत्त्वाचे : एखादे उपकरण नीट चालण्यासाठी सोबत ‘उपयोगकर्त्यासाठी माहितीपुस्तक (युझर मॅन्युअल)’ दिलेले असते. त्यात दिल्याप्रमाणे उपकरण वापरले, तर ते दीर्घकाळ टिकते. माहितीपुस्तक न वाचता स्वतःच्या मनाने ते उपकरण कसेतरी वापरले आणि ते बंद पडले, तर त्याची निर्मिती करणारे आस्थापन त्याचे दायित्व (गॅरेंटी) घेत नाही. ‘आयुर्वेद’ हे शरीर नावाचे यंत्र १०० वर्षे निरोगी कसे ठेवावे, यासाठी ऋषिमुनींनी लिहिलेले उपयोगकर्त्यासाठीचे माहितीपुस्तकच आहे. यात असे सांगितले आहे की,
उचितात् अहितात् धीमान् क्रमशो विरमेत् नरः। – चरकसंहिता, सूत्रस्थान, अध्याय ७, सूत्र ३६
अर्थ : चुकीच्या सवयी अंगवळणी पडल्या असतील, तरी बुद्धीमान माणसाने टप्प्याटप्प्याने त्या सोडून चांगल्या सवयी अंगी बाणवण्याचा प्रयत्न करावा.
५. शरीर निरोगी रहाण्यासाठी २ वेळाच आहार घ्यावा आणि भरपूर व्यायाम करावा : वारंवार खाण्याची सवय लागली असेल, तर ती हळूहळू सोडावी आणि आयुर्वेदाचा गाभा असलेल्या ‘दिवसातून २ वेळाच आहार घेणे आणि सकाळी स्वतःच्या क्षमतेनुसार भरपूर व्यायाम करणे’, या दोन चांगल्या सवयी अंगी बाणवाव्यात.’
– वैद्य मेघराज माधव पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१.१.२०२३)