आज धुळे येथे चौकाचे ‘वैद्यराज कै. प्रभाकर जोशी (नाना) चौक’ असे नामकरण होणार !
धुळे – वैद्यराज कै. प्रभाकर जोशी (नाना) यांच्या सन्मानार्थ धुळे महानगरपालिकेद्वारे ५ जानेवारी या दिवशी सकाळी १० वाजता येथील वाडीभोकर रोडवरील शनिमंदिराजवळील चौकाचे नामकरण ‘वैद्यराज कै. प्र.ता. जोशी (नाना) चौक’ असे करण्यात येणार आहे.
‘आयुर्वेद महर्षि’ वैद्यराज कै. प्र.ता. जोशी तथा नाना जोशी यांनी आधुनिक वैद्यकशास्त्राच्या प्रखर प्रवाहात राहून ऋषिमुनींनी आजमावलेल्या भारतीय आयुर्वेदाला जनसामान्यांच्या मनात, तसेच प्रत्येक घरात नुसतेच पोचवले नाही, तर ते रुजवण्याचे महान, अद्भुत आणि अद्वितीय कार्य आयुष्यभर केले. पंचकर्म उपचार केवळ सधन वर्गापुरते सीमित राहिले असतांना गरीब रुग्णाला परवडेल अशा पद्धतीने या चिकित्सेचा प्रसार नानांनी केला. सहस्रो रुग्णांना पंचकर्माच्या साहाय्याने व्याधीमुक्त करणार्या या वटवृक्षाने अनेक शिष्य निर्माण करून ही परंपरा अखंड तेवत ठेवली.
धुळ्यातील एक श्रीमंत व्यापारी मरणाच्या दारात होते. सर्व उपचार करून ते नानांकडे आले. त्यांच्या उपचारांनी त्यांना ३ मासांत बरे वाटले. व्यापार्यांनी नानांना १ लाख रुपयांचा एक धनादेश दिला. नानांनी त्यावरील नाव पालटायला लावून तो धुळे नगर परिषदेच्या नावे घेतला. त्या रकमेतून धुळे नगर परिषदेने आयुर्वेद रुग्णालय बांधले. नानांचा संपूर्ण परिवारही आता त्यांचे हे कार्य पुढे नेत आहे. कै. नानांना वंदन करण्यासाठी चौकाच्या नामकरण सोहळ्यात धुळेकरांनी अधिक संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.